नववर्षाच्या स्वागतासाठी सजतेय संत्रानगरी; बॉयफ्रेन्ड जीन्सची क्रेझ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 01:23 PM2017-12-28T13:23:28+5:302017-12-28T13:23:55+5:30

२०१७ संपायला आता काही दिवस शिल्लक असून २०१८ च्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. निदान सोशल मीडियावर फिरणाऱ्या ‘अ‍ॅडव्हॉन्स’च्या संदेशांनी याची चाहूल लागली आहे.

Orange city get ready for celebration of New Year | नववर्षाच्या स्वागतासाठी सजतेय संत्रानगरी; बॉयफ्रेन्ड जीन्सची क्रेझ

नववर्षाच्या स्वागतासाठी सजतेय संत्रानगरी; बॉयफ्रेन्ड जीन्सची क्रेझ

Next
ठळक मुद्देहॉटेलमध्ये जेवण, मॉकटेल व डान्स पॅकेज

ऑनलाईन लोकमत

नागपूर : २०१७ संपायला आता काही दिवस शिल्लक असून २०१८ च्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. निदान सोशल मीडियावर फिरणाऱ्या ‘अ‍ॅडव्हॉन्स’च्या संदेशांनी याची चाहूल लागली आहे. स्वागत संदेश, अ‍ॅनिमेशन, जोक्स आणि डिजिटल ग्रिटींग कार्ड व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक आदी सोशल मीडियावर पाठविण्याचे सत्र सुरू झाले असून अस्ताच्या वर्षातील आठवणी शेअर करून सरत्या वर्षाला ‘अलविदा’ करण्याची भावना या संदेशातून व्यक्त केली जात आहे. ज्येष्ठांमध्ये याबाबत उत्साह कमी असला तरी कारण शोधणाऱ्या तरुण वर्गाला पार्टी करण्याची संधी मिळणार असल्याने त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. तरुणाईचा माहौल बघता हॉटेल, मॉल, सिनेमागृह आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांनी तयारी सुरू केली आहे.

शोरूममध्ये नवीन वर्षाची आॅफर
शोरूम, मॉल आदी व्यावसायिक प्रतिष्ठानमध्ये नववर्षाची खरेदी लक्षात घेता तयारी केली आहे. कपडे आणि इतर वस्तूंचे नवनवीन कलेक्शन उपलब्ध केले आहेत. एका शोरूमचे अधिकारी करणसिंह छत्रे यांनी सांगितले, तरुणाईची पसंती लक्षात घेता ब्रॅन्डेड उत्पादन आणि नवीन फॅशनचे वस्त्र आणण्यात आले आहेत. ३० ते ५० टक्के सूट देण्याचा दावा करीत तरुणांना आकर्षित केले जात आहे. सॅन्डर्ल्स, हाय हिल्स, शूज आदींची ब्रॅन्डेड शृंखला शोरूममध्ये ठेवण्यात आली आहे. ई-वॅलेट पेमेंट करणाऱ्यांना डिस्काऊंटची सुविधा दिली जात आहे.

आॅफ शोल्डर आणि मॅक्सी गाऊनला मागणी
३१ च्या पार्टीला जायचे आहे, मग नवीन ड्रेस तर असायलाच हवा. त्यामुळे आतापासूनच नवीन ड्रेस खरेदी करण्याला सुरुवात झाली असून पुढचे दोन दिवस खरेदी सत्र चालणार आहे. तरुणीही नवीन ड्रेस खरेदीत व्यस्त असून आॅफ शोल्डर टॉप पॅटर्न, क्रॉप टॉप पॅटर्न, स्लिट ड्रेसेस, मॅक्सी गाऊन आणि बॉयफ्रेन्ड जीन्सला पसंती दिली जात आहे. मुलांमध्ये जीन्स आणि नवनवीन प्रकारच्या जॅकेट्सला पसंती मिळत आहे. तरुणी ड्रेसला अनुसरून नेलपेंट, लिपस्टीक आदींचा शोध घेत आहेत.

हॉटेलमध्ये जेवण, मॉकटेल व डान्स पॅकेज
तरुण वर्ग नववर्ष स्वागताची जशी उत्साहात वाट पाहत आहेत तसे हॉटेल व्यावसायिकही दरवर्षीप्रमाणे यंदाही या संधीची वाट पाहत आहेत. काही हॉटेल्समध्ये ओपन तर काहींमध्ये केवळ कपल्ससाठी पार्टीची तयारी केली आहे. एका हॉटेल व्यावसायिकाने दिलेल्या माहितीनुसार अडीच हजाराच्या पॅकेजमध्ये जेवणासह पार्टी, डान्स तसेच मॉकटेलची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. काहींनी आॅर्केस्ट्राची व्यवस्था केली असून डान्स करणाऱ्यांना आधीच त्यांच्या पसंतीच्या गाण्यांची यादी द्यावी लागणार आहे. हॉटेलमध्ये मद्यधुंद झालेल्यांकडून व्यवस्था बिघडू नये म्हणून मोठ्या संख्येने बाऊन्सर्स तैनात केले असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पार्टी हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

पार्टीसाठी योग्य जागेचा शोध
नवीन वर्षाचा सर्वाधिक उत्साह तरुणांमध्येच असतो. अनेकांनी तर आतापासूनच नववर्षात धूम करण्याचा मनसुबा मनात बाळगला आहे. त्यांच्यासाठी हा दिवस म्हणजे पार्टीची मोठी संधी आहे. मात्र नागपुरात पार्टीसाठी जावे कुठे हा संभ्रम त्यांच्या मनात आहे. पदवी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी अभिनव कुळमेथेने सांगितले, वर्षात कधी पार्टी करण्याची वेळ आली तर लॉन, हॉटेल, किंवा रेस्टॉरंटची व्यवस्था केली जाते. मात्र ३१ डिसेंबरला प्रत्येक हॉटेल, क्लब बुक असतात. सर्वत्र गर्दी राहत असल्याने न्यू इयर पार्टीचा मनसोक्त आनंद घेता येत नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या शहरात योग्य जागा शोधावी कुठे हा प्रश्न आहे. त्यामुळे शहराबाहेर फार्म हाऊसमध्ये जाण्याची तयारी असल्याचे त्याने सांगितले. सर्व मित्रांच्या संमतीने अधिक पैसे गोळा झाले तर पुणे किंवा गोव्याला जाणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले. सध्या फुटाळा चौपाटी, किंवा इतर हॉटेललाच प्राधान्य असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

Web Title: Orange city get ready for celebration of New Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.