उपराजधानीत साकारणार खुला रंगमंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:29 IST2017-09-23T01:28:58+5:302017-09-23T01:29:07+5:30
उपराजधानीत हजारो नागरिकांच्या उपस्थितीत एखादा कार्यक्रम आयोजित करणे आजच्या तारखेत जागेअभावी कठीण गोष्ट आहे.

उपराजधानीत साकारणार खुला रंगमंच
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत हजारो नागरिकांच्या उपस्थितीत एखादा कार्यक्रम आयोजित करणे आजच्या तारखेत जागेअभावी कठीण गोष्ट आहे. अशा स्थितीत शहरात खुला रंगमंच (अॅम्फिथिएटर) असण्याची आत्यंतिक आवश्यकता आहे.
यासंदर्भात पुढाकार घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत रेशीमबागेतील सुरेश भट सभागृहाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. नागपुरात १५-१६ हजार नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या सांस्कृतिक
कार्यक्रमाचे किंवा कलाकृतीचे आयोजन करायचे असेल तर तशी जागा उपलब्ध नाही. यशवंत स्टेडियम किंवा कस्तूरचंद पार्क येथे अशा प्रकारचे आयोजन करण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. अशा स्थितीत शहरात मध्यवर्ती ठिकाणी सांस्कृतिक आयोजनासाठी हक्काचा खुला रंगमंच असणे आवश्यक आहे. यादृष्टीने पावले उचलण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मराठी नाटक देशात सर्वात समृद्ध
महाराष्ट्राने सांस्कृतिक चळवलीला मौलिक योगदान दिले आहे. मराठी नाटक तर देशात सर्वात समृद्ध मानले जाते. कलाकारांनी वेगळी छाप पाडत आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र मुंबई, पुण्याकडे नाटकांची संख्या मोठी असताना नागपुरात जागा मिळत नाही, अशी कलाकारांची तक्रार रहायची. मात्र सुरेश भट सभागृहाने ही तक्रार दूर केली आहे. कुठल्याही महानगरपालिकेने इतके सुंदर व आकर्षक सभागृह बांधलेले नाही, असे कौतुकोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. गडकरी यांनी सभागृहाच्या निर्मितीसाठी घेतलेल्या पुढाकाराची मुख्यमंत्र्यांनी विशेष प्रशंसा केली.