दरवर्षी एक लाख बुबुळांची गरज : विकास महात्मे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 09:21 PM2019-08-29T21:21:56+5:302019-08-29T21:23:35+5:30

देशात मृत्यूच्या एक टक्का जरी नेत्रदान झाले तरी संपूर्ण देशाची बुबुळाची गरज भागविल्या जाऊ शकते. यामुळे प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन पद्मश्री खा. डॉ. विकास महात्मे यांनी केले.

One lakh eyeballs needed every year: Vikas Mahatma | दरवर्षी एक लाख बुबुळांची गरज : विकास महात्मे

दरवर्षी एक लाख बुबुळांची गरज : विकास महात्मे

Next
ठळक मुद्देनेत्रदान जनजागृती रॅली रविवारी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतात दरवर्षी सुमारे ८० लाख लोकांचा मृत्यू होतो. मात्र यातील एक लाख लोकांचेही नेत्रदान होत नाही. यामुळे अनेकांवर अंधत्व जीवन जगण्याची वेळ येते. देशात मृत्यूच्या एक टक्का जरी नेत्रदान झाले तरी संपूर्ण देशाची बुबुळाची गरज भागविल्या जाऊ शकते. यामुळे प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन पद्मश्री खा. डॉ. विकास महात्मे यांनी केले.
महात्मे आय बँक, आय हॉस्पिटलमधील नेत्रपेढीच्यावतीने नेत्रदान पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी ‘एसएमएम आय वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष डॉ. सुनीता महात्मे, डॉ. निखिलेश वैरागडे उपस्थित होते.
डॉ. महात्मे म्हणाले, मोतीबिंदू, काचबिंदू आणि वाढत्या वयामुळे बुबुळाचे अंधत्व वाढत आहे. भारतात याचे प्रमाण १५.४ टक्के आहे. बुबुळ प्रत्यारोपण हाच एकमेव यावर उपचार आहे. यासाठी नेत्रदान होणे गरजेचे आहे. नेत्रदानाचा टक्का वाढविण्यास नेत्रपेढीचा मोलाचा वाटा असतो. गेल्या पाच वर्षात महात्मे आय हॉस्पिटलने ३०० हून अधिक लोकांमध्ये बुबुळ प्रत्यारोपण करून नवी दृष्टी दिली. एका प्रश्नाला उत्तर देताना खा. डॉ. महात्मे म्हणाले, मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र मोहीम चांगल्या गतीने सुरू आहे. यात शासनाचा निधी वाढवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.
डॉ. सुनीता महात्मे म्हणाल्या, नेत्रदानाचा संदेश लोकांपर्यंत पोहचण्यासाठी रविवार १ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली महात्मे आय बँक येथून सुरू होऊन जयप्रकाशनगर, सोमलवाडा होत संस्थेच्या आवारात समारोप होईल. रॅलीत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. डॉ. वैरागडे म्हणाले, नेत्रदानाला वय, लिंग, रक्तगटाचे बंधन नाही. फार कमी अपवाद वगळता कुणीही नेत्रदान करू शकते. नेत्रदानाविषयी गैरसमज दूर व्हायला हवेत, असेही ते म्हणाले. या प्रसंगी नेत्रदानासाठी पुढाकार घेणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

 

Web Title: One lakh eyeballs needed every year: Vikas Mahatma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.