आदिवासींच्या आरोग्यासाठी स्वतंत्र व्यवस्थेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 11:06 PM2019-07-01T23:06:26+5:302019-07-01T23:11:28+5:30

ग्रामीण व दुर्गम भागात आजही बहुसंख्य डॉक्टर सेवा देण्यास तयार नाहीत. आरोग्याचे शिक्षण देणाऱ्या आणि धोरणे ठरविणाऱ्या बहुतांश संस्था या शहरकेंद्रित झाल्या आहेत. परिणामी, ग्रामीण भागात आज सार्वजनिक आरोग्याची परिस्थिती बिकट झाली आहे. दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण आणि जमिनीवरची वास्तविकता यात बरेच अंतर निर्माण झाले आहे. ही दरी दूर करायची असेल तर प्रात्यक्षिकावर आधारित वैद्यकीय शिक्षणावर भर दिल्याशिवाय ग्रामीण आरोग्याची बिघडलेली नाडी सुधारता येणे शक्य नाही. विशेषत: आदिवासींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र आरोग्य व्यवस्थेची गरज आहे, असा सूर मेडिकलच्या सामाजिक वैद्यकशास्त्र विभागातर्फे आयोजित प्रकट मुलाखतीतून उमटला.

The need for a separate system for the health of the tribals | आदिवासींच्या आरोग्यासाठी स्वतंत्र व्यवस्थेची गरज

डॉ. डी. के. रामदवार व्याख्यानकक्षाचे उद्घाटन करताना डॉ. बी.जी. सुभेदार, सोबत डॉ. अभय बंग, डॉ. रविंद्र कोल्हे, अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा व डॉ. उदय नारलावार.

Next
ठळक मुद्देमेडिकलमध्ये तज्ज्ञांचा सूर : सामाजिक वैद्यकशास्त्र विभागाच्या वतीने चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्रामीण व दुर्गम भागात आजही बहुसंख्य डॉक्टर सेवा देण्यास तयार नाहीत. आरोग्याचे शिक्षण देणाऱ्या आणि धोरणे ठरविणाऱ्या बहुतांश संस्था या शहरकेंद्रित झाल्या आहेत. परिणामी, ग्रामीण भागात आज सार्वजनिक आरोग्याची परिस्थिती बिकट झाली आहे. दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण आणि जमिनीवरची वास्तविकता यात बरेच अंतर निर्माण झाले आहे. ही दरी दूर करायची असेल तर प्रात्यक्षिकावर आधारित वैद्यकीय शिक्षणावर भर दिल्याशिवाय ग्रामीण आरोग्याची बिघडलेली नाडी सुधारता येणे शक्य नाही. विशेषत: आदिवासींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र आरोग्य व्यवस्थेची गरज आहे, असा सूर मेडिकलच्या सामाजिक वैद्यकशास्त्र विभागातर्फे आयोजित प्रकट मुलाखतीतून उमटला.
‘राष्ट्रीय डॉक्टर्स डे’निमित्त मेडिकलमध्ये ‘आदिवासींचे आरोग्य’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सोबतच याच विषयावर ‘सर्च’चे संस्थापक डॉ. अभय बंग, सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र कोल्हे, मेळघाट येथील महानचे डॉ. आशिष सातव यांची एकाच व्यासपीठावर संयुक्त मुलाखत ‘पीएसएम’ विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अविनाश गावंडे यांनी घेतली. त्यावेळी हा सूर उमटला.
कार्यक्रमाला वरिष्ठ विशेषज्ञ डॉ. बी.जी. सुभेदार, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, डॉ. तेजस्विनी ठोसर, माजी अधिष्ठाता डॉ. एस. डब्ल्यू. कुळकर्णी, पीएचएफआयचे डॉ. संजय झोडपे उपस्थित होते. या कार्यक्रमात मेडिकलचे माजी अधिष्ठाता डॉ. डी. के. रामदवार यांच्या स्मृतिनिमित्त जनऔषधी विभागाच्या लेक्चर्स हॉलला त्यांचे नाव देण्यात आले. प्रास्ताविक ‘पीएसएम’ विभागप्रमुख डॉ. उदय नारलावार यांनी केले. डॉ. कुळकर्णी यांनी डॉ. रामदवार यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
आरोग्याचे प्रश्न स्थानिक पातळीवरच सोडवावे लागतात - डॉ. कोल्हे
डॉ. रवींद्र कोल्हे म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण आणि तळागाळातली आरोग्याची गुंतागुंत यात बरेच अंतर असते. ग्रामीण व दुर्गम भागातल्या आजाराला सामाजिक, भौगोलिक, आर्थिक, कौटुंबिकदेखील इतिहास चिकटलेला असतो. ‘इन्टर्नशीप’दरम्यान मेळघाट भागात काम करताना हे प्रकर्षाने जाणवले. त्यामुळे तेथील आरोग्याचे प्रश्नही स्थानिक परिस्थितीची सांगड घालूनच सोडवावे लागतात.
आरोग्याच्या सोयीच पोहचायला उशीर-डॉ. सातव
डॉ. आशिष सातव म्हणाले, कुपोषण, बालमृत्यू आणि मातामृत्यूमुळे मेळघाट नेहमीच चर्चेत राहिले आहे. आजही मेळघाटात जन्माला येणाऱ्या दर हजार बालकांपैकी ६० बालके उपजत मृत्यूला कवटाळतात. कुपोषणाचा दर १४ टक्के तर तरुणांचा मृत्यूदर हजारी ४०० वर पोहचला आहे. याकडे आरोग्य धोरण ठरविणाऱ्यांचे लक्ष गेलेले नाही. सरासरी लोकसंख्येच्या १० टक्के लोकसंख्या आदिवासी असली तरी यातील ९० टक्क्यांपर्यंत आरोग्याच्या सोयी पोहचत नाही, हे दाहक वास्तव आहे.
तळागळात जाऊन प्रात्यक्षिकावर भर द्यायला हवा-डॉ. बंग
डॉ. अभय बंग म्हणाले, वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण आणि प्रत्यक्षातील ग्रामीण भागातील आव्हाने, यात बरेच अंतर असते. त्यामुळे आरोग्य शिक्षणाने वर्गाचा उंबरठा ओलांडून तळागळात जाऊन प्रात्यक्षिकावर भर द्यायला हवा.

 

Web Title: The need for a separate system for the health of the tribals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.