सिंचन घोटाळ्यात आणखी दणका

By admin | Published: March 31, 2016 03:10 AM2016-03-31T03:10:03+5:302016-03-31T03:10:03+5:30

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळअंतर्गत सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहाराची चौकशी करीत असलेल्या अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने (लाच लुचपत प्रतिबंधक विभाग)..

More bump in irrigation scandal | सिंचन घोटाळ्यात आणखी दणका

सिंचन घोटाळ्यात आणखी दणका

Next

नागपूर : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळअंतर्गत सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहाराची चौकशी करीत असलेल्या अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने (लाच लुचपत प्रतिबंधक विभाग) मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याचे मातीकाम व बांधकामाच्या निविदा प्रक्रियेदरम्यान झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात तीन अधिकारी व कंत्राटदार कंपनीचे संचालक आणि त्यांचे भागीदार यांचा समावेश आहे.

सेवानिवृत्त मुख्य अभियंता सोपान रामराव सूर्यवंशी (६५) रा. मल्हार प्लॉट नं.२१ सहकारनगर उस्मानपुरा औरंगाबाद, गोसीखुर्द डावा कालवा वाही पवनीचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उमाशंकर वासुदेव पर्वते (५९) रा. सरस्वतीनगर मानेवाडा रिंगरोड, वरिष्ठ विभागीय लेखाधिकारी चंदन तुळशीराम जिभकाटे (५७) रा. आयुर्वेदिक ले-आऊट उमरेड रोड अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. तर कंत्राटदार आर.जे शाह अ‍ॅण्ड कंपनी लि. मुंबईच्या संचालिका कालिंदी राजेंद्र शाह (६७), तेजस्विनी राजेंद्र शाह (६४), त्यांचे भागीदार डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीचे संचालक विशाल प्रवीण ठक्कर (३६), प्रवीण नाथालाल ठक्कर (६७), जिगर प्रवीण ठक्कर (३८), अरुण कुमार गुप्ता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याच्या गृहविभागाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरअंतर्गत सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहारासंदर्भात उघड चौकशी करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) दिले होते. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या नेतृत्त्वाखाली ही चौकशी सुरूआहे.

गैरकायदेशीर कृत्यावर शिक्कामोर्तब
नागपूर : दराडे यांनी पोलीस उपअधीक्षक मिलिंद तोतरे यांना मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याचे मातीकाम व बांधकाम या कामातील निविदा प्रक्रियेदरम्यान झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यास सांगितले होते. या चौकशीमध्ये नमूद कालव्याच्या कामाचे कंत्राटदार आर.जे. शाह अ‍ॅण्ड कंपनी आणि डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा. लि. (जे.व्ही.) तसेच जलसंपदा विभागातील अधिकारी यांचा गैरव्यवहारामध्ये सहभाग असल्याचे दिसून आले. याबाबत चौकशी अधिकारी यांनी बुधवारी सदर पोलीस स्टेशन येथे अप. क्र. ३३०९,/२०१६ कलम १३ (१) (क), १३ (१) (ड), सह कलम १३ (२), लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ सह कलम ४२०, ४६८, ४७१, १०९, १२० (ब) भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
एसीबीचे अधीक्षक संजय दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याच्या निविदा प्रक्रियेदरम्यान विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांनी सन २००९ मध्ये निविदा मागविल्या होत्या. त्यावेळी चार कंत्राटदार कंपन्यांनी या निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेतला, असे दाखविण्यात आले होते. त्यात आर. जे. शाह अ‍ॅण्ड कंपनी आणि डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा.लि. (जे.व्ही) या फर्मला सदर कालव्याच्या कामाचे कंत्राट देण्यात आले. चौकशीमध्ये आर.जे. शाह अ‍ॅण्ड कंपनी लि. आणि डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा. लि. (जे.व्ही) व इतरांनी ही निविदा प्रक्रिया स्पर्धात्मक झाल्याचे दाखविण्याकरिता ठक्कर परिवाराचेच एस. एन. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा.लि. या कंपनीने निविदा प्रक्रियेत भाग घेतला. तसेच अन्य प्रतिस्पर्धी कंत्राटदार श्रीनिवासा कन्स्ट्रक्शनच्या निविदेसोबत भरावयाची बयाणा रक्कम डी. कन्स्ट्रक्शन्स प्रा.लि. या कंपनीच्या बँक खात्यातून भरण्यात आली. यशस्वी कंत्राटदार कंपनीपैकी डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या भागीदाराने कामाच्या पूर्वानुभवासंदर्भात सादर केलेली सबकॉन्ट्रॅक्टची प्रमाणपत्रे ही अवैध असल्याचे त्यांनी पूर्वअर्हता अर्जासोबत खोटी माहिती सादर केल्याचे तसेच विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत त्यांच्याकडे असलेल्या कामाविषयीची महत्त्वाची माहिती दडवून ठेवल्याचे आणि निविदा प्रक्रियेदरम्यान तत्कालीन अधिकाऱ्यांनी निविदा प्रक्रिया अपारदर्शीपणे व कंत्राटदाराला फायदा पोहोचविण्यासाठी गैरकायदेशीर कृत्य केल्याचे आढळून आले. (प्रतिनिधी)

३८ फाईल रांगेत
एसीबीकडे २५ कोटी रुपयापेक्षा अधिक किमतीच्या ४० प्रकरणांची चौकशी सोपविण्यात आली आहे. आतापर्यंत दोन प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अजून ३८ प्रकरण रांगेत आहेत. अशा परिस्थितीत येणाऱ्या काही दिवसात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. संजय दरडे यांनी एसीबी अधीक्षकाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंगळवारी पहिल्यांचा अधिकाऱ्यांनी बैठक घेतली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी गुन्हा दाखल झाल्याने शासकीय विभागांमध्ये खळबळ उडाली आहे.

Web Title: More bump in irrigation scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.