मेयो इस्पितळात बोगस नर्स : बाळ पळविण्याचा प्रयत्नही फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:31 AM2019-01-25T00:31:47+5:302019-01-25T00:34:24+5:30

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) गुरुवारी एका बोगस परिचारिकेला (नर्स) पकडण्यात आल्याने खळबळ उडाली. तर या घटनेच्या एक दिवसाआधी म्हणजे बुधवारी मेयोत जन्मलेल्या बाळाला पळविण्याचा प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला. या दोन्ही घटनेमुळे रुग्णालय प्रशासन हादरून गेले आहे. दोन्ही महिलांना तहसील पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

In Mayo hospital bogus nurse: Attempt to flee child unsuccessful | मेयो इस्पितळात बोगस नर्स : बाळ पळविण्याचा प्रयत्नही फसला

मेयो इस्पितळात बोगस नर्स : बाळ पळविण्याचा प्रयत्नही फसला

googlenewsNext
ठळक मुद्देतहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) गुरुवारी एका बोगस परिचारिकेला (नर्स) पकडण्यात आल्याने खळबळ उडाली. तर या घटनेच्या एक दिवसाआधी म्हणजे बुधवारी मेयोत जन्मलेल्या बाळाला पळविण्याचा प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला. या दोन्ही घटनेमुळे रुग्णालय प्रशासन हादरून गेले आहे. दोन्ही महिलांना तहसील पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, पहिली घटना बुधवारी रात्री ८.३० वाजता घडली. मेयोच्या स्त्रीरोग व प्रसूती विभागाच्या वॉर्ड क्रमांक १५ मध्ये एका महिलेने बाळाला जन्म दिला. त्यानंतर एका अनोळखी महिलेने या बाळाला सुरुवातीला कुशीत घेत तिच्या नातेवाईकांशी जवळीक साधली. नातेवाईकांचे लक्ष विचलित होताच तिने बाळाला घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या एका महिला सुरक्षा रक्षकाचे तिच्यावर लक्ष होते. पळून जात असताना तिला पकडले. तहसील पोलिसांच्या स्वाधीन केले. चौकशीत ती मानसिक रुग्ण असल्याचे पुढे आले.
दुसरी घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. मेयोच्या सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये परिचारिकेच्या वेशभूषेत असलेली एक महिला संशयित स्थितीत फिरत असताना आढळून आली. संशय वाढताच सुरक्षा रक्षकांनी तिला ओळखपत्राची मागणी केली. परंतु तिने पळून जाण्याचा प्रयत्न करताच सुरक्षा रक्षकांनी तिला पकडून आणले. तपासणी केली असता बॅगमध्ये स्टेथास्कोप, बीपी ऑपरेटर, रुग्णांच्या नावाच्या यादीचे रजिस्टर व दोन वेगवेगळ्या नावाचे ओळखपत्र आढळले. विचारपूस केली असता तिने याबाबत कुठलाच खुलासा केला नाही. सुरक्षा रक्षकांनी तिला तहसील पोलिसांच्या हवाली केले. तिच्याकडे असलेले रजिस्टर व खासगी अ‍ॅम्ब्युलन्स चालकाचा नंबर यावरून ते येथील रुग्णांना विशिष्ट खासगी रुग्णालयात पळवून नेण्याच्या रॅकेटमधील असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. या दोन्ही घटनेमुळे मेयोच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
पास प्रणालीतून समाजविघातकांना दूर ठेवणे शक्य
मेयोमध्ये भरती असलेल्या एका रुग्णासोबत एक किंवा जास्तीत जास्त दोन नातेवाईकांना राहण्यासाठी पास प्रणाली राबविली जाते. या घटनेमुळे ही प्रणाली आणखी गंभीरतेने राबविली जाणार आहे. या प्रणालीमुळेच समाजविघातकांपासून रुग्ण सुरक्षित राहतील. रुग्ण व नातेवाईकांनी यात सहकार्य करणे आवश्यक आहे.
 डॉ. सागर पांडे
उपवैद्यकीय अधीक्षक, मेयो

 

Web Title: In Mayo hospital bogus nurse: Attempt to flee child unsuccessful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.