मेयो : अखेर १० कोटींचे ‘एमआरआय’ दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:15 AM2019-06-28T00:15:00+5:302019-06-28T00:15:02+5:30

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) बहुप्रतीक्षित ‘एमआरआय’ यंत्र तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बुधवारी दाखल झाले. विशेष म्हणजे, सर्जिकल कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावर हे यंत्र स्थापन केले जात आहे. यासाठी प्रवेशद्वाराच्या भागातील कॉम्प्लेक्सची भिंत प्रशासनाला तोडावी लागली. ऑगस्ट महिन्यापर्यंत हे यंत्र रुग्णसेवेत सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mayo: Finally MRI of 10 crores reached | मेयो : अखेर १० कोटींचे ‘एमआरआय’ दाखल

मेयो : अखेर १० कोटींचे ‘एमआरआय’ दाखल

Next
ठळक मुद्देतब्बल आठ वर्षांची प्रतीक्षा पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) बहुप्रतीक्षित ‘एमआरआय’ यंत्र तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बुधवारी दाखल झाले. विशेष म्हणजे, सर्जिकल कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावर हे यंत्र स्थापन केले जात आहे. यासाठी प्रवेशद्वाराच्या भागातील कॉम्प्लेक्सची भिंत प्रशासनाला तोडावी लागली. ऑगस्ट महिन्यापर्यंत हे यंत्र रुग्णसेवेत सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मेयो प्रशासनाचे ‘एमआरआय’साठी २०११ पासून प्रयत्न सुरू होते. परंतु प्रस्ताव पाठवूनही प्रशाासकीय मंजुरीच मिळत नव्हती. नोव्हेंबर २०१६ रोजी ‘१.५ टेस्ला एमआरआय’साठी १० कोटी तर ‘१२८ स्लाईस सिटी स्कॅन’साठी ७ कोटी ५० लाखांना प्रशासकीय मंजुरी मिळाली. २०१६ च्या हिवाळी अधिवेशनात या यंत्राला घेऊन चर्चाही झाली. परंतु आर्थिक तरतूद झालीच नाही. ‘एमआरआय युनिट’ नसल्याने ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ने (एमसीआय) मेयोतील ‘डिप्लोमा इन रेडिओ डायग्नोसिस’ची मान्यता काढून घेतली. हे यंत्र खरेदी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांमुळे एमआरआय, सिटीस्कॅनसह ११ प्रकारच्या उपकरण खरेदीसाठी शिर्डी साईबाबा संस्थेने ३५ कोटी २८ लाख रुपये दिले. मेयो प्रशासनाने हा निधी उपकरण खरेदीचे अधिकार असलेल्या ‘हापकिन्स’ कंपनीकडे वळता केला. याच दरम्यान ‘एमआरआय’ नसल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला फटकारले. परिणामी, ३ जानेवारी २०१९ रोजी या निधीतून २५ कोटी इतक्या रकमेची यंत्रसामुग्री ‘टर्न-की’ तत्त्वावर खरेदी करण्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली. एमआरआय युनिट स्थापन करण्यासाठी बांधकामाला वेळ लागणार होता. ‘एमआरआय’ यंत्र कुठे स्थापन करावे याबाबतही गोंधळ उडाला होता. यावर वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी तोडगा काढत सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये यंत्र स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. दुसरीकडे खरेदी प्रक्रियेला वेग आला. अखेर १८ एप्रिल रोजी १३ कोटी १० लाख ८६८ रुपयांच्या एमआरआय यंत्राच्या खरेदीचे आदेश निघाले. जर्मनी येथील सीमेन्स कंपनीचे हे यंत्र २६ जून रोजी मेयोत दाखल झाले.
यंत्रासाठी फोडली भिंत
सर्जिकल कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावरील वॉर्ड क्रमांक ४३ येथे ‘एमआरआय युनिट’ विभाग उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. परंतु ‘एमआरआय’ यंत्र या वॉर्डात ठेवण्यासाठी बुधवारी कॉम्प्लेक्सची भिंत तोडावी लागली. क्रेनच्या मदतीने हे यंत्र स्थापन करण्यात आले.
ऑगस्ट महिन्यापर्यंत रुग्णसेवेत
मेयोमध्ये एमआरआय यंत्र दाखल झाले आहे. या यंत्रासाठी विशेष बांधकाम व विद्युत व्यवस्थेची गरज असते. यामुळे साधरण ऑगस्ट महिन्यात हे यंत्र रुग्णसेवेत सुरू होईल.
डॉ. अजय केवलिया
अधिष्ठाता, मेयो

 

 

Web Title: Mayo: Finally MRI of 10 crores reached

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.