मराठी साहित्य महामंडळाच्या व्यापकतेचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 09:54 PM2018-09-25T21:54:00+5:302018-09-25T21:56:31+5:30

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कक्षा अधिक व्यापक करण्यासाठी महामंडळाने प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी आतापर्यंत महामंडळापासून दोन हात दूर राहिलेल्या साहित्य संस्थांसाठी महामंडळाने आपले दरवाजे खुले केले आहेत. यानुसार २५ वर्षापासून नोंदणीकृत आणि कार्यरत असलेल्या साहित्य संस्थांना ‘सहयोगी संस्था’ म्हणून महामंडळात समाविष्ट करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. संस्थेने केलेली ही घटनादुरुस्ती मंगळवारी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी नागपुरात जाहीर केली.

Marathi Sahitya Mahamandal's widespread efforts | मराठी साहित्य महामंडळाच्या व्यापकतेचा प्रयत्न

मराठी साहित्य महामंडळाच्या व्यापकतेचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देबाहेरील संस्थांसाठी खुले केले दरवाजे : संमेलनाशिवाय वार्षिक अधिवेशनही होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अखिल भारतीय मराठीसाहित्य महामंडळाच्या कक्षा अधिक व्यापक करण्यासाठी महामंडळाने प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी आतापर्यंत महामंडळापासून दोन हात दूर राहिलेल्या साहित्य संस्थांसाठी महामंडळाने आपले दरवाजे खुले केले आहेत. यानुसार २५ वर्षापासून नोंदणीकृत आणि कार्यरत असलेल्या साहित्य संस्थांना ‘सहयोगी संस्था’ म्हणून महामंडळात समाविष्ट करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. संस्थेने केलेली ही घटनादुरुस्ती मंगळवारी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी नागपुरात जाहीर केली.
महामंडळासोबत सध्या तीन घटक संस्था, पाच समाविष्ट संस्था आणि संलग्न संस्था आहे. याव्यतिरिक्त महाराष्ट्रासह देशात आणि परराष्ट्रात  २५ वर्षापासून नोंदणीकृत असलेल्या आणि कार्यरत असलेल्या संस्था इच्छा असल्यास महामंडळात समाविष्ट होऊ शकतात. संबंधित विभागाच्या घटक संस्थेची हरकत नसल्यास या संस्था महामंडळाच्या सहयोगी संस्था म्हणून कार्य करू शकतील. महामंडळाच्या कक्षा अधिक व्यापक करण्याचा हा प्रयत्न असल्याचे डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले.
याशिवाय दरवर्षी होणाऱ्या साहित्य संमेलनासह सर्व संस्थांचे एक स्वतंत्र वार्षिक अधिवेशन भरविण्याचा निर्णयही महामंडळाने घेतला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे समस्त मराठी भाषिकांसाठी मानाचे आणि एका साहित्यिक सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. मात्र साहित्य संमेलनात केवळ साहित्यविषयक गोष्टींचा उहापोह होत होता. त्यामुळे या साहित्य संमेलनात चर्चेला न येणारे महत्त्वाचे व गंभीर विषय तसेच संस्थात्मक विश्वाचे महत्त्वाचे प्रश्न, समस्या, अडचणी आदींवर चर्चा आणि उपाययोजनांवर भर दिला जावा यासाठी वार्षिक अधिवेशन घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. झालेल्या घटनादुरुस्तीनुसार महामंडळाच्या वर्धापनदिनाला जोडूनच हे अधिवेशन होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला महामंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. विलास चिंतामण देशपांडे उपस्थित होते.

निवडणुकीने नाही, निवडीने होणार यवतमाळचा अध्यक्ष
यवतमाळ येथे होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा निवडणुकीने नाही तर निवडीनेच होणार असल्याचे डॉ. श्रीपाद जोशी यांनी यावेळी जाहीर केले. विशेष म्हणजे महामंडळाने जून-२०१८ मध्ये घटनादुरुस्ती करून संमेलन अध्यक्षपदाची निवडणूक रद्द केली होती. मात्र हा निर्णय पुढल्या साहित्य संमेलनापासून लागू होणार होता. यवतमाळ येथे होणाऱ्या संमेलनाचा अध्यक्ष निवडणुकीनेच निवडला जाणार होता. मात्र घटनादुरुस्तीची प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्याने अध्यक्षपदाची निवडणूक यावेळीपासूनच रद्द करीत असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले. त्यामुळे यवतमाळच्या अध्यक्षपदासाठी १ आॅक्टोबरपासून सुरू होणारी निवडणूक प्रक्रियाही रद्द करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता अध्यक्षपदाची निवड ही सुचविलेल्या नावातून सन्मानाने होणार आहे. त्यानुसार महामंडळाच्या घटक संस्थांकडून प्रत्येकी तीन नावे, समाविष्ट संस्थांकडून पाच, संलग्न संस्थांकडून प्रत्येकी एक नाव, संमेलन निमंत्रक संस्थेकडून एक तर विद्यमान संमेलन अध्यक्ष एक नाव, अशी २० नावे सुचविण्यात येणार आहेत. येत्या २८ आॅक्टोबर रोजी यवतमाळ येथे होणाऱ्या महामंडळाच्या सभेपर्यंत ही नावे मागविण्यात आली आहेत. या सभेत या विषयावर चर्चा करून व नंतर पुढची प्रक्रिया पार पाडून संमेलन अध्यक्षांचे नाव जाहीर केले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Marathi Sahitya Mahamandal's widespread efforts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.