नागपुरात लाहोरीच्या रुफ-९ वरून वृंदावन हॉटेलच्या संचालकावर जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 12:51 AM2018-03-04T00:51:13+5:302018-03-04T00:51:29+5:30

हॉटेल संचालकावर रुफ -९ च्या टेरेसवरून भलीमोठी कुंडी फेकल्याचा धक्कादायक प्रकार वादग्रस्त हॉटेल लाहोरीच्या समोर घडला. नशीब बलवत्तर म्हणून काही फूट पुढे ही कुंडी पडल्याने हॉटेल गोकुळ वृंदावनचे संचालक प्रसन्ना रेड्डी थोडक्यात बचावले.

On Lahore Roof-9 murderous,assault on Vrindavan hotel opprator in Nagpur | नागपुरात लाहोरीच्या रुफ-९ वरून वृंदावन हॉटेलच्या संचालकावर जीवघेणा हल्ला

नागपुरात लाहोरीच्या रुफ-९ वरून वृंदावन हॉटेलच्या संचालकावर जीवघेणा हल्ला

Next
ठळक मुद्देलाहोरी हॉटेलच्या टेरेसवरील रुफ-९ वरून कुंडी फेकली : थोडक्यात जीव वाचला : सीताबर्डीत गुन्हा दाखल, आरोपी शर्मा फरार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हॉटेल संचालकावर रुफ -९ च्या टेरेसवरून भलीमोठी कुंडी फेकल्याचा धक्कादायक प्रकार वादग्रस्त हॉटेल लाहोरीच्या समोर घडला. नशीब बलवत्तर म्हणून काही फूट पुढे ही कुंडी पडल्याने हॉटेल गोकुळ वृंदावनचे संचालक प्रसन्ना रेड्डी थोडक्यात बचावले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंतर सीताबर्डी पोलिसांनी लाहोरीचा संचालक समीर शर्मा याच्याविरुद्ध एखाद्याच्या जीवाला धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने हल्ला करण्याच्या आरोपाखाली कलम ३३६ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकारानंतर धरमपेठ कॉफी हाऊस चौकात शनिवारी रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते.
दरम्यान, मोठी लाहोरी हॉटेलच्या टेरेसवर सुरू असलेल्या रुफ-९ या हॉटेलमधील अवैध बांधकामावर महापालिकेने शनिवारी हातोडा चालविला. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. उर्वरित कारवाई रविवारी केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
उपराजधानीतील कॉफी हाऊस चौकात चार माळ्यांची इमारत आहे. तळ माळ्यावर मोठी लाहोरी बार अ‍ॅन्ड रेस्टॉरंट आहे, बाजूला हॉटेल गोकुळ वृंदावन आहे. समोर आणि मागे दोन मद्याची दुकाने आहेत आणि टेरेसवर लाहोरीच्या संचालकाने अनधिकृत शेड उभारून तेथे रुफ-९ हे रेस्टॉरंट सुरू केले आहे. एकाच इमारतीत असलेल्या लाहोरी आणि गोकुळ वृंदावनच्या संचालकांमध्ये अनेक दिवसांपासून वाद आहे. लाहोरी आधीपासूनच चर्चित आणि वादग्रस्त बार म्हणून ओळखला जातो. येथे यापूर्वीही पोलिसांनी अनेकदा कारवाई केलेली आहे. होळी-धुळवडीचा सण बघता तेथे मोठा गुन्हा होऊ शकतो, असे संकेत मिळाल्याने पोलिसांनी लाहोरीच्या समोरच नाकाबंदी केली होती. शनिवारी रात्री ८ च्या सुमारास सीताबर्डीचे ठाणेदार हेमंत खराबे आपल्या ताफ्यासह लाहोरीत गेले आणि त्यांनी आत तसेच टेरेसवर तपासणीही केली. त्यानंतर पोलीस निघून गेले. रात्री ९.१५ च्या सुमारास वृंदावन हॉटेलचे संचालक प्रसन्ना रेड्डी यांनी हॉटेल बंद केले आणि ते आपल्या दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले असता रुफ-९ च्या टेरेसवरून त्यांच्या दुचाकीसमोर भलीमोठी फुलझाडाची कुंडी येऊन पडली. ही कुंडी त्यांच्या डोक्यावर पडली असती तर मोठा अनर्थ घडला असता.
नशीब बलवत्तर म्हणून रेड्डी बचावले.
दरम्यान, या घटनेने रेड्डी आणि त्यांच्या सहकाºयांनी आरडाओरड केली. बाजूलाच नाकाबंदीवरील पोलीस पथक होते. त्यामुळे ते लगेच तिकडे धावले. त्यांनी रुफ-९ कडे धाव घेतली. तेथून काही जण पळून जात असल्याचे पाहून एकाला पकडून रेड्डी आणि सहकाऱ्यांनी त्याची बेदम धुलाई केली. दरम्यान, माहिती कळताच पोलिसांचा मोठा ताफा तेथे पोहोचला. पोलीस उपायुक्त राकेश ओला, ठाणेदार खराबे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनीही धाव घेतली. या घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत लाहोरीसमोर तणावाचे वातावरण होते.
दरम्यान, पोलिसांकडून वारंवार होणारी कारवाई रेड्डी यांच्या सांगण्यावरूनच केली जात असावी, असा संशय आल्याने हा हल्ला केला किंवा करवून घेतला असावा, असा संशय आहे. रेड्डी यांनी नोंदविलेल्या तक्रारीत हे कृत्य लाहोरी तसेच रुफ-९ चा संचालक समीर शर्मा यानेच केले असावे, असा संशय व्यक्त केला. त्यामुळे सीताबर्डी पोलिसांनी शर्माविरुद्ध कलम ३३६ अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच तो फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
व्हिडीओ व्हायरल
प्रसन्ना रेड्डी हे आपली दुचाकी सुरू करून घराकडे निघण्याच्या तयारीत असताना त्यांच्यावर वरून फेकलेली भलीमोठी कुंडी समोर येऊन पडल्याचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. जीव घेण्याच्या उद्देशाने करण्यात आलेला हा हल्ला सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर तो व्हिडीओ शनिवारी व्हायरल झाला. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. पोलिसांनीही हे व्हिडीओ फुटेज जप्त केले आहे.
देशी-विदेशी दारूही जप्त
दरम्यान, मोठ्या लाहोरीत देशी-विदेशी दारूचा अवैध साठा असल्याची निनावी व्यक्तीकडून माहिती मिळाल्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी शनिवारी सायंकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन बोलवून घेतले. त्यानंतर उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलिसांनी संयूक्तपणे दारू जप्तीची मोठ्या लाहोरीत कारवाई केली. नेमकी किती रुपयांची दारू जप्त झाली, ते रात्री ९.४५ वाजतापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.
रुफ - ९ वर हातोडा :मनपाची कारवाई
या चार मजली इमारतीत लाहोरीच्या रूपात एक बार, दोन दारूची दुकाने, गोकुळ वृंदावन आणि गच्चीवर रुफ-९ या हॉटेल सोबत इतरही काही व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. लाहोरी बार अ‍ॅन्ड रेस्टारंटने टेरेसवर अनधिकृत शेड निर्माण करून खुले रेस्टॉरंट सुरू केले होते. विना परवानी सुरू करण्यात आलेले खुले रेस्टारंट हटविण्यासंदर्भात धरमपेठ झोन तसेच महापालिके च्या अग्निशमन विभागाने नोटीस बजावल्या होत्या. त्यानतंरही टेरेसवरील रेस्टारंट सुरू होते. टिनाचे शेड उभारून किचनरुमचे बांधकाम करण्यात आले होते. शनिवारी झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, बर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत खराबे, महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके पथकासह ४ वाजताच्या सुमारास धरमपेठ परिसरात दाखल झाले.
पोलीस बंदोबस्तात आणि व्हीडिओ रेकॉर्डिंग करीत हे अधिकारी टेरेसवर पोहोचले. सर्वप्रथम राजेंद्र उचके यांनी अग्निशमनच्या दृष्टीने पाहणी केली असता गॅसची शेगडी सुरू होती आणि त्यावर ठेवलेल्या कढईतील तेल उकळत होते, तसेच तेथे असलेला तंदूर गरम होता. उचके यांनी गॅस बंद केला आणि तंदूरवर पाणी टाकले. विशेष म्हणजे यावेळी त्या हॉटेलच्या त्या स्वयंपाकघरात एकही कर्मचारी नव्हता. त्यानंतर अतिक्रमण विरोधी पथकाने आपली कारवाई सुरू केली. सर्व प्रथम अवैधरीत्या बांधलेले स्वयंपाकघर तोडण्यात आले, त्यानंतर गच्चीवर बांधण्यात आलेले शेड तोडण्यात आले. चौथ्या मजल्यावर या हॉटेलमध्ये सुमारे ७५ ग्राहक बसू शकतील एवढी व्यवस्था होती आणि तेथे जाण्या-येण्यासाठी एकच लिफ्ट; तीही संपूर्ण व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या उपयोगाची तसेच एकच जिना तोही अंधारलेला. अशा परिस्थितीत मुंबईसारखी काही अनुचित घटना घडला तर काय होईल, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. या हॉटेलमधून काल धुळवडींच्या दिवशी खाली तळमजल्यावर हॉटेल व्यवसाय करणारे गोकुळ वृंदावनचे मालक प्रसन्ना रेड्डी यांना कुंडी फेकून मारण्यात आल्याचा आरोप आहे.
अवैध बांधकामासंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतरही बांधकाम न हटविल्याने कारवाई केल्याची माहिती महेश मोरोणे यांनी दिली. शासकीय नियमानुसार आता थेट अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले जात नाही. मात्र, ५० किंवा त्यापेक्षा जास्त ग्राहकांची व्यवस्था जिथे असेल त्यांनी हे प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. ते या हॉटेलने घेतलेले नाही. त्या संदर्भात त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच येथे जे अवैध बांधकाम करण्यात आले आहे, त्याला नगररचना विभागाची परवानगी आहे की नाही, तेही तपासून बघून त्यानुसार कारवाई करण्यात येईल. अशी माहिती असे राजेंद्र उचके म्हणाले.
झोनच्या सहायक आयुक्तांना निवेदन
गोकुल वृद्धावर रेस्टरंटचे मालक प्रसन्ना रेड्डी व जय जवान जय किसान संघटनेचे नेते प्रशांत पवार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने शनिवारी धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे यांना रुफ-९ च्या अवैध बांधकामासंदर्भात निवेदन देऊन अतिक्रमण हटविण्याची मागणी केली.

Web Title: On Lahore Roof-9 murderous,assault on Vrindavan hotel opprator in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.