मूर्ती नवीन आहे, उत्खननात सापडलीच नाही; केंद्रीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचा तपासानंतर दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 11:46 AM2023-10-12T11:46:48+5:302023-10-12T11:48:35+5:30

समतानगरमध्ये उत्खननादरम्यान देवीची मूर्ती सापडल्याचे प्रकरण : व्हिडीओ सोशल मिडियावर झपाट्याने व्हायरल

Idol found in nagpur is new, not found in excavations, claims Central Archaeological Survey after investigation | मूर्ती नवीन आहे, उत्खननात सापडलीच नाही; केंद्रीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचा तपासानंतर दावा

मूर्ती नवीन आहे, उत्खननात सापडलीच नाही; केंद्रीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचा तपासानंतर दावा

रियाझ अहमद/ प्रणय कांबळे

नागपूर : उत्तर नागपूर लगतच्या समतानगरमध्ये जमिनीत देवीची मूर्ती सापडल्याचा दावा केंद्रीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या नागपूर विभागाने फेटाळून लावला आहे. मूर्तीची तपासणी केल्यानंतर ती नवीन असल्याचे विभागाने स्पष्ट झाले. एवढेच नाही तर मूर्ती जमिनीतून बाहेर आलेली नसून येथे ती ठेवण्यात आल्याचा दावा विभागाने केला आहे.

मूर्ती कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर सापडली होती. त्याच्या आजूबाजूला आणि खाली प्लास्टिक, शूज, चप्पल यांचा कचरा आढळून आला आहे. या ५१ सेमी उंच आणि ३५ सेमी रुंद मूर्तीपेक्षा जमिनीच्या खोदकामाची खोली कमी आहे. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास समतानगर येथील राजा भोज चौकाजवळील ईश्वर गणेश मोहबे यांच्या प्लॉट क्रमांक १८ येथे खोदकाम सुरू होते. त्यांनी हा प्लॉट कटरे नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केला होता. मोहबे येथे राहत नसले तरी येथे एक छोटीशी झोपडी बांधली आहे. उर्वरित मोकळ्या जागेत झाडे लावण्यात आली आहेत. सुमारे एक फूट तीन इंच खोदकाम झ्राल्यावर मूर्ती सापडल्याचे कामगारांनी सांगितले. त्यानंतर समतानगरमध्ये देवीची मूर्ती सापडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर येथे लोकांनी एकच गर्दी केली. मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी स्थानिकांसोबतच दूरवरून लोकही येऊ लागले. बुधवारीही येथे लोकांची वर्दळ होती.

नायब तहसीलदार सुनील साडवे आणि केंद्रीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या नागपूर परिमंडळाचे अधीक्षक पुरातत्त्व शास्त्रज्ञ अरुण मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सायंकाळी कडेकोट पोलिस बंदोबस्तात पुरातत्त्व विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. तपासणी केली असता मूर्ती नवीन असल्याचे अरुण मलिक यांनी 'लोकमत'ला सांगितले. मूर्ती फक्त ५ ते १० वर्षांपूर्वीची आहे. मूर्तीवर आरीने कलाकृती केली आहे. यावरूनही ही मूर्ती नवीन असल्याचे स्पष्ट होते. आता अधिक तपासाची गरज नाही. परंतु, प्रक्रियाही पूर्ण करावी लागेल, असे सुनील साडवे म्हणाले.

मूर्ती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पुरातत्त्व विभाग अधिक तपास करणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल. यावेळी जरीपटका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष बकल यांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता. तपासादरम्यान केंद्रीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे सहायक अधीक्षक डॉ. शिल्पा जामगडे, मंडळ अधिकारी अनिल ब्रह्मे आदी उपस्थित होते.

मूर्ती कोणत्याही देवासारखी नाही

केंद्रीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून कलात्मक दृष्टिकोनातूनही या मूर्तीचे परीक्षण करण्यात आले आहे. ती कोणत्याही मूर्तीशी मिळतीजुळती नसल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रकरणाची चौकशी करा

या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. सध्या ही मूर्ती त्याच परिसरात ठेवली आहे. लोकांशी चर्चा करून स्थानिक लोक काळजी घेतील, असे पत्र पोलिस प्रशासनाने घरमालकाकडून लिहून घेतल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Idol found in nagpur is new, not found in excavations, claims Central Archaeological Survey after investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.