दीक्षाभूमीसाठी कला वाहिलेला चित्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:31 AM2018-10-15T10:31:48+5:302018-10-15T10:34:30+5:30

दिमाखात उभे असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्धाचे भव्य असे पोर्ट्रेट पाहून कुणालाही प्रसन्न वाटेल. ही आकर्षक आणि भव्यता साकारण्यात कल्पकता आहे ती चित्रकार निळू भगत यांची.

His art for Dikhabhoomi | दीक्षाभूमीसाठी कला वाहिलेला चित्रकार

दीक्षाभूमीसाठी कला वाहिलेला चित्रकार

googlenewsNext
ठळक मुद्देनिळू भगत यांची भीमसेवा अनेक ठिकाणी दिमाखात झळकते कला

निशांत वानखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी दीक्षाभूमी परिसरात पोहोचल्यानंतर दिमाखात उभे असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्धाचे भव्य असे पोर्ट्रेट पाहून कुणालाही प्रसन्न वाटेल. ही आकर्षक आणि भव्यता साकारण्यात कल्पकता आहे ती चित्रकार निळू भगत यांची. दीक्षाभूमीतच घडलेल्या आणि वाढलेल्या या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रकाराने गेल्या ३८ वर्षांपासून आपली कला दीक्षाभूमी आणि आंबेडकरी चळवळीसाठी वाहून घेतली आहे. दरवर्षी येथे येणाऱ्या लाखो अनुयायांकडून मिळणारी कौतुकाची दाद यातच आपल्या कलेचे समाधान मानणाऱ्या निळू भगत यांची भीमसेवा अतुलनीय अशीच आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे औचित्य साधून लोकमतने या कलावेड्या चित्रकाराशी संवाद साधला, तेव्हा अनेक आठवणींना उजाळा मिळाला. हिंदी चित्रपटसृष्टी आणि देश-विदेशातून आॅफर्सही मिळाल्या. मात्र ज्या भूमीत त्यांच्यातील उपजत कलेला आकार मिळाला त्या दीक्षाभूमीसाठी आणि प्रेरणा देणारे महामानव बाबासाहेब यांच्या चळवळीसाठीच आपली कला त्यांनी समर्पित केली. निळू भगत यांचा जन्म इमामवाडा वस्तीत झाला. वडील एकनाथ भगत हे एम्प्रेस मिलमध्ये पेंटर पदावर कार्यरत होते. वडिलांचेही आंबेडकरी चळवळीत मोठे योगदान राहिले आहे. चळवळीसोबत कलेचाही वारसा वडिलांकडून मिळालेल्या निळू यांनी चित्रकलेचे कोणतेही शिक्षण घेतलेले नाही. प्रसिद्ध चित्रकार प्रमोदबाबू रामटेके व माजी आमदार दीनानाथ पडोळे यांच्या सान्निध्यात आल्यानंतर त्यांच्यातील कलेला आणखी वलय मिळालं.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या रौप्य महोत्सव कार्यक्रमासाठी भव्यदिव्य मंचासह सजावट, पेंटिंग, मोठमोठे कटआऊट तयार करण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्यांच्यातील कौशल्याचे सर्वत्र कौतुक झाले. तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्या कुंचल्यातून आश्चर्यकारक चित्र साकार झाले आहेत. ते अवघ्या काही मिनिटातच हाताने पेंटिंग करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र काढतात.महोत्सवादरम्यान लागणारे मोठे कटआऊट आणि पोर्ट्रेट निळू भगत यांनी काढलेली आहेत.
तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब यांच्या विविध शैलीतील चित्र काढण्याची त्यांना आवड असून, असे असंख्य चित्र त्यांनी कुंचल्यातून सहजपणे रेखाटली आहेत. मुंबईत आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी कार्यक्रमाप्रसंगी रेखाटलेला कटआऊट हा त्यावेळी देशातील सर्वात उंच कटआऊट ठरले होते. रा. सू. गवई बिहारचे राज्यपाल असताना भगत यांना राजभवनामध्ये बौद्ध संस्कृतीची कलाकृती सादर करण्याची संधी मिळाली. त्यांची चित्रे राजभवन व अशोका हॉलसह विविध ठिकाणी दिमाखदारपणे लावण्यात आली आहेत.

Web Title: His art for Dikhabhoomi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.