दिल.. दोस्ती.. दुनियादारी.. मैत्रीदिनी बहरले कट्टे; उद्यान, मॉल, कॅफे हाउस, रेस्टॉरंट, लतावांवर रंगल्या दोस्तीच्या गप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 11:02 AM2023-08-07T11:02:56+5:302023-08-07T11:04:31+5:30

अंबाझरी, फुटाळ्यावर सळसळता उत्साह;

Heart.. Friendship.. Worldliness.. Friendship day celebration in nagpur | दिल.. दोस्ती.. दुनियादारी.. मैत्रीदिनी बहरले कट्टे; उद्यान, मॉल, कॅफे हाउस, रेस्टॉरंट, लतावांवर रंगल्या दोस्तीच्या गप्पा

दिल.. दोस्ती.. दुनियादारी.. मैत्रीदिनी बहरले कट्टे; उद्यान, मॉल, कॅफे हाउस, रेस्टॉरंट, लतावांवर रंगल्या दोस्तीच्या गप्पा

googlenewsNext

नागपूरअसे म्हणतात, मित्र नसले की म्हातारपण लवकर येते आणि मित्रांसाेबत म्हातारपणही तरुण हाेते. माणसाच्या आयुष्यातील सर्वांत खास नाते म्हणजे मैत्री. मैत्रीचा बंध हा आयुष्यातील घट्ट बंधनांपैकी एक आहे. आपल्या कुटुंबाइतकेच आपल्या आयुष्यात खास स्थान असणाऱ्या काही व्यक्ती म्हणजे आपले बेस्ट फ्रेंड्स. अशा जिवाभावाच्या मित्रांचा सहवास सदैव मिळावा, अशी सर्वांची अपेक्षा असते. मग खास मैत्रीच्या दिवसाची संधी मित्र कसे साेडणार? अशा मैत्रीचा सळसळता उत्साह रविवारी उपराजधानीत जागाेजागी दिसून येत हाेता.

शाळा-महाविद्यालयातील क्लासमेट मित्रांची नेहमीची भेट आज नवी हाेती. काही अनेक महिने, वर्षांच्या ताटातुटीनंतर पुन्हा भेटले हाेते. मग गप्पांचा फड रंगला, जुन्या गाेष्टी निघाल्या, एकमेकांच्या सुख-दु:खाची नव्याने ओळख झाली. वणव्याच्या चटक्यांनी हाेरपळल्यानंतर अचानक गारवा मिळावा, असे हे क्षण मित्रांनी आपल्या हृदयाच्या कप्प्यात काेरून ठेवले.

ढगाळ वातावरणात पावसानेही मैत्रीला आज माेकळीक दिली. अंबाझरी तलाव, स्वामी विवेकानंद स्मारक आणि फुटाळा तलावाचा परिसर मित्रांच्या घाेळक्यांनी फुलून गेला हाेता. एकमेकांना मैत्रीचे बंध बांधले जात हाेते. अनेकांच्या समूहाने मेट्राेची राइड केली. शहरातील उद्याने, रेस्टाॅरंट, माॅल्सही मैत्रीच्या रंगात रंगलेले दिसले. अनेकांनी तर कुटुंबासह शहराबाहेर तलावांवर जाऊन मित्रत्वाचा आनंद घेतला. बच्चे कंपनीही आपल्या पद्धतीने सेलिब्रेशन करताना दिसली. क्लब, लाॅजवरही पार्ट्यांना बहर आला हाेता, तर काहींनी खास फार्महाऊस बुक करून फ्रेंडशिप सेलिब्रेट केली.

क्लब, लाॅज, फार्महाऊसवर पार्ट्या

मैत्रीचा हा उत्सव अनेकांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने साजरा केला. क्लब, लाॅजवर सकाळपासून पार्ट्यांना रंगत आली हाेती. सुटीचा दिवस असल्याने काही मित्रांनी शहराबाहेरच्या फार्महाऊसवर काैटुंबिक गेट टूगेदर अरेंज केले हाेते. ही मित्रांचे काैटुंबिक सेलिब्रेशन शहराबाहेरचे तलाव, वाॅटर पार्कवरही दिसून आले. खिंडसी, झिल्पी, डेग्मा तलावांवर मित्रांची गर्दी फुलली हाेती.

माॅल्समध्ये आयाेजन, मेट्राेची राइड

मैत्री दिनानिमित्त शहरातील माॅल्समध्ये मुले व तरुणांसाठी सेलिब्रेशनचे विशेष आयाेजन करण्यात आले हाेते. काहींनी वेगळेपणा म्हणून साेबतीने मेट्राेची राइड केली.

माेबाइलच्या गॅलरीत कैद

शाळा-महाविद्यालयातून पासआउट आणि नाेकरी, संसारात लागलेले काही मित्र बऱ्याच महिन्यांनी, वर्षांनी प्लान करून भेटले हाेते. आपल्या कुटुंबासाेबत एकमेकांची भेट करून घेतली. साेबत सेल्फी काढून हे क्षण माेबाइलमध्ये सेव्ह करण्यात बहुतेक मग्न असल्याचे दिसले.

Web Title: Heart.. Friendship.. Worldliness.. Friendship day celebration in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.