नागपुरात देशी पिस्तुलांची तस्करी करणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 11:51 AM2018-02-16T11:51:30+5:302018-02-16T11:54:26+5:30

देशी पिस्तुलांची (कट्ट्याची) तस्करी करून विक्री करणारी एक टोळी पाचपावली पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी नाट्यमयरीत्या पकडली.

Gangs smugglers of indigenous pistols in Nagpur | नागपुरात देशी पिस्तुलांची तस्करी करणारी टोळी गजाआड

नागपुरात देशी पिस्तुलांची तस्करी करणारी टोळी गजाआड

Next
ठळक मुद्दे५ आरोपींना अटक ५ पिस्तूल, ७ मॅगझिन, २३ काडतूस जप्तपाचपावली पोलिसांची नाट्यमय कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशी पिस्तुलांची (कट्ट्याची) तस्करी करून विक्री करणारी एक टोळी पाचपावली पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी नाट्यमयरीत्या पकडली. या टोळीतील पाच जणांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून ५ देशी पिस्तुलांसह ७ मॅगझिन आणि २३ जिवंत काडतूस तसेच मोटरसायकल आणि चाकू जप्त केले. अटकेतील एक आरोपी यवतमाळचा रहिवासी आहे. या टोळीचा सूत्रधार बिहारमधील आहे. तो आणि पाचपावलीतील एक असे दोघे आरोपी फरार असल्याची माहिती परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणिकर यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.
गेल्या सहा महिन्यांपासून ही टोळी देशी पिस्तूल, मॅगझिन आणि जिवंत काडतुसांची परप्रांतातून तस्करी आणि विक्री करीत असल्याची माहिती पाचपावली पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवणे सुरू केले. बुधवारी सायंकाळी महेंद्रनगर, टेका पाण्याच्या टाकीजवळ पिस्तुलधारी आरोपी जमल्याची माहिती कळताच पोलिसांनी सापळा रचला. महिला आणि पुरुष पोलिसांचे पथक वेशांतर करून घटनास्थळी पोहचले. दोन दुचाक्यांवर चार जण पिस्तूल हाताळताना दिसताच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या बांधल्या. त्यांच्याकडून मॅगझिन आणि काडतुसांसह दोन पिस्तूल ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुन्हा एका आरोपीच्या घरी छापा घातला. तेथेही पोलिसांना जिवंत काडतुसांसह एक पिस्तूल आढळले. मात्र, आरोपी पळून गेले. आरोपी सिकंदर ऊर्फ सोनू शरिफ खान (वय २५, रा. टेका, महेंद्रनगर), सद्दाम अजिज खान (वय २३, रा. नवा नकाशा, लष्करीबाग), मोहिब खान फजल खान (वय २६, रा. नवा नकाशा) आणि सलमान आरिफ अब्दुल जमिल अन्सारी (वय २५, रा. नवा नकाशा) या चौघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली. महिनाभरापूर्वी यवतमाळच्या एका तरुणाला दोन पिस्तूल विकल्याची माहिती या आरोपींनी दिली. त्यामुळे पोलिसांचे एक पथक यवतमाळच्या अंबिकानगरमध्ये पोहचले. त्यांनी नालंदा चौकात राहणाऱ्या सन्नी ऊर्फ प्रज्वल अत्तरसिंग चव्हाण (वय २५) याला तब्यात घेऊन त्याच्याकडून दोन पिस्तूल जप्त केले.
अशाप्रकारे या पाच आरोपींकडून पोलिसांनी ५ पिस्तूल, ७ मॅगझिन आणि २३ काडतुसे आणि दोन मोटरसायकल जप्त केल्या. या घातक शस्त्रांची आणि जप्त केलेल्या साहित्याची किंमत १ लाख ३५ हजार रुपये आहे. आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २० फेब्रुवारीपर्यंत पीसीआर मंजूर केला.
पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे, अतिरिक्त आयुक्त श्यामराव दिघावकर, उपायुक्त राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त वालचंद्र मुंढे, ठाणेदार नरेंद्र हिवरे, पोलीस निरीक्षक आर. एल. दुबे, उपनिरीक्षक पी. आर. इंगळे, विनोद धोंगडे, हवलदार विजय यादव, राजेश देशमुख, प्रदीप पवार, विनोद गायकवाड, विनोद बरडे, महेश जाधव, स्वाती मोहाडे यांनी ही कामगिरी बजावली.
सूत्रधाराच्या अटकेनंतर बरेच खुलासे
या टोळीचा सूत्रधार बिहारमधील रहिवासी असून, तो नेहमी नागपूर - महाराष्टत पिस्तुलांच्या खेप आणतो. त्याला तसेच येथील एका फरार आरोपीला अटक केल्यानंतर पुन्हा या तस्करीच्या नेटवर्कचा खुलासा होऊ शकतो, असे उपायुक्त माकणीकर यांनी सांगितले. नागपूर - विदर्भात नेमके किती आणि कुणा-कुणाला पिस्तूल तसेच काडतुसे विकल्या गेली, त्याचीही माहिती मिळू शकते. या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी चौकशी सुरू असल्याचेही ते म्हणाले. पोलीस आयुक्तालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला सहायक पोलीस आयुक्त वालचंद्र मुंढे, पाचपावलीचे ठाणेदार नरेंद्र हिवरे उपस्थित होते.

पिस्तूल देशी की विदेशी ?
जप्त केलेल्या पिस्तुलांवर मेड इन चायना असे लिहून आहे. त्यांची बनावटही विदेशी पिस्तुलांसारखीच दिसते. मात्र, त्या देशीच असाव्यात, असा अंदाज उपायुक्त माकणीकर यांनी व्यक्त केला. खात्री करून घेण्यासाठी या पिस्तुलांना फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. आरोपी गेल्या सहा महिन्यांपासून या गोरखधंद्यात सहभागी आहेत. ते ग्राहक पाहून कुणाला ३० तर कुणाला ३५ हजारात पिस्तूल विकत होते. सन्नी चव्हाण वगळता सर्व आरोपी नागपुरातील आहेत. त्यांचा क्राईम रेकॉर्ड तपासला जात आहे. यवतमाळचा सन्नी मासेमारीचे कंत्राट घेतो. निक्की नामक मित्राच्या माध्यमातून तो या आरोपींच्या संपर्कात आल्याचे पोलीस सांगतात. सलमानची पानटपरी आहे. अन्य तिघांवर छोटेमोठे गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Gangs smugglers of indigenous pistols in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.