भाड्याने कार पुरविणाऱ्या कंपनीची फसवणूक, परस्पर नाशिकला केली एसयूव्हीची विक्री

By योगेश पांडे | Published: March 8, 2023 04:30 PM2023-03-08T16:30:25+5:302023-03-08T16:32:06+5:30

वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Fraud of car rental company, mutual sale of SUV to Nashik | भाड्याने कार पुरविणाऱ्या कंपनीची फसवणूक, परस्पर नाशिकला केली एसयूव्हीची विक्री

भाड्याने कार पुरविणाऱ्या कंपनीची फसवणूक, परस्पर नाशिकला केली एसयूव्हीची विक्री

googlenewsNext

नागपूर : भाड्याने कार पुरविणाऱ्या एका कंपनीची फसवणूक करून परस्पर नाशिकला एसयूव्ही विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. कंपनीच्याच एका कर्मचाऱ्याच्या समयसूचकतेमुळे आणखी एका फसवणुकीच्या तयारीत असताना तीन आरोपींना अटक करण्यात आली. वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

आदित्य कैलास सरोदे (३०, कर्जत, अहमदनगर), नितीन कचरू चौगुले (४२, कारंजा, नाशिक), आशिष ईश्वर कांबळे (३२, वडनेर, वर्धा) अशी आरोपींची नावे आहेत. राकेश थुलकर हे ‘झूमकार’ या कंपनीत ‘फ्लिट एक्झिक्टुटिव्ह’ म्हणून काम करतात. त्यांची कंपनी लोकांना भाड्यावर कार पुरवते व यासाठी विविध शहरांत कारमालकांशी करार केलेला असतो. प्रत्येक कारमध्ये कंपनीकडून जीपीआरएस यंत्रणा बसविण्यात येते.

तीनही आरोपींनी आकाश बोराडे नावाचे खोटे आधार कार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स तयार केले व ३१ डिसेंबर २०२२ रोजी ‘झूमकार’ची कार बुक केली. दिपांक बारसागडे यांनी १० लाखांची एसयूव्ही ते या माध्यमातून घेऊन गेले. २५ जानेवारीपर्यंत त्यांनी बुकिंग केले होते. मात्र त्यांनी वेळेत कार परत केली नाही व जीपीआरएस यंत्रणादेखील काढून टाकली. त्यांनी मोबाइल क्रमांकदेखील बंद केला होता. कागदपत्रे बनावट असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचणेदेखील शक्य नव्हते.

तीन दिवसांअगोदर थुलकर यांना नागपुरात तांबोळी नामक व्यक्तीच्या नावे आणखी एक बुकिंग आल्याचे दिसून आले. संबंधित बुकिंगसाठी देण्यात आलेल्या कागदपत्रांवर आरोपींनी दिलेल्या कागदपत्रांवरीलच छायाचित्र होते. तीनही आरोपी भाड्याने कार घेण्यासाठी मानेवाडा येथे पोहोचले होते. थुलकरदेखील त्यांच्या सहकाऱ्यासोबत तेथे पोहोचले. तीनही आरोपी तेच असल्याची खात्री पटल्यावर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांनी संबंधित एसयूव्ही नाशिक येथे विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिघांविरोधातही गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

Web Title: Fraud of car rental company, mutual sale of SUV to Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.