नागपुरातील जय श्रीराम पतसंस्थेत कोट्यवधीचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:04 AM2019-03-14T00:04:30+5:302019-03-14T00:07:00+5:30

आर्थिक घोटाळ्यासाठी बदनाम झालेल्या उपराजधानीतील आणखी एका पतसंस्थेद्वारा नागरिकांचे कोट्यवधी रुपये बुडविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित गुंतवणूकदारांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्राथमिक चौकशीत पोलिसांनी ५० ते ६० लाख रुपयाच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगितले आहे. परंतु कोट्यवधी रुपये फसले असल्याची चर्चा आहे.

Fraud of crores in Jai Shriram credit cooperative in Nagpur | नागपुरातील जय श्रीराम पतसंस्थेत कोट्यवधीचा अपहार

नागपुरातील जय श्रीराम पतसंस्थेत कोट्यवधीचा अपहार

googlenewsNext
ठळक मुद्देगुंतवणुकीच्या नावावर फसवणुकीचा आरोप : कोतवाली ठाण्यात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आर्थिक घोटाळ्यासाठी बदनाम झालेल्या उपराजधानीतील आणखी एका पतसंस्थेद्वारा नागरिकांचे कोट्यवधी रुपये बुडविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित गुंतवणूकदारांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्राथमिक चौकशीत पोलिसांनी ५० ते ६० लाख रुपयाच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगितले आहे. परंतु कोट्यवधी रुपये फसले असल्याची चर्चा आहे.
ताजे प्रकरण हे गणेशनगर तुकडोजी चौक येथील जय श्रीराम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे आहे. या सोसायटीचे अध्यक्ष खेमचंद मेहरकुरे रा. रमना मारुती आहे तर मॅनेजर सुनीता पाल आहे. गेल्या १५ वर्षांपासून ही पतसंस्था कार्यरत आहे. येथे फिक्स डिपॉझिट, डेली कलेक्शनसह ग्राहकांची बचत खातेही आहेत. फिक्स डिपॉझिटवर ज्येष्ठ नागरिकांना १२ टक्के तर इतर ग्राहकांना ११ टक्के व्याज दिले जात होते. गुंतवणूकदारांना पतसंस्थेशी जोडण्यासाठी एजंट नियुक्त करण्यात आले होते. त्यांना लक्ष्य पूर्ण करण्यासाठी बोनससुद्धा दिला जात होता. पतसंस्थेच्या आकर्षक योजनांमुळे मध्यमवर्गीय आणि सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने या पतसंस्थेशी जुळले.
सूत्रानुसार गेल्या पाच-सहा महिन्यांपासून पतसंस्थेची स्थिती चांगली नाही. मेहरकुरे यांनी काही दिवसात परिस्थिती सामान्य होईल, असे सांगितल्याने गुंतवणूकदारांनी याला गंभीरतेने घेतले नाही. जानेवारीमध्ये पतसंस्थेची परिस्थिती आणखीनच बिघडली. गुंतवणूकदारांना त्यांनी जमा केलेली रक्कम मिळणे बंद झाले. मेहरकुरे वेगवेगळी कारणे देऊ लागला. गुंतवणूकदार आपल्या पैशांसाठी एजंटांकडे तगादा लावू लागले. दबाब टाकू लागले. तेव्हा थोडे दिवस थांबण्यास सांगण्यात आले. यादरम्यान अचानक पतसंस्थेचे गणेशनगर येथील कार्यालय बंद झाले. यामुळे गुंतवणूकदारंमध्ये खळबळ उडाली. म्हाळगीनगर आणि हुडकेश्वर येथील कार्यालयसुद्धा बंद करण्यात आले. तेव्हा पतसंस्थेत मोठी गडबड झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले. ते मेहरकुरे आणि पाल यांच्याकडे चकरा मारू लागले. सुनीता यांनी आपण आजारी असल्याचे सांगत पतसंस्थेच्या कामकाजाबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले तर मेहरकुरे हे बोलण्याचे टाळू लागले. दोन महिने चकरा लावल्यानंतर अखेर
गुंतवणूकदारांनी मंगळवारी कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. सुरुवातीला पोलिसांनीही त्यांना योग्य प्रतिसाद दिला नाही. तपासानंतर कारवाई करण्याचे सांगण्यात आले. तेव्हा गुंतवणूकदार संतापले. त्यांनी पोलीस ठाण्यासमोरच विरोध दर्शविला.
यानंतर पोलिसांनी हालचाल सुरू केली.त्यांनी मेहरकुरे आणि पंतसंस्थेच्या एजंटला बोलावले. मेहरकुरे पोलिसांच्या हाती लागला नाही तर एजंटने पतसंस्था बंद असल्याने पैसे वितरित करण्यात आले नसल्याचे सांगितले. कोतवालीचे ठाणेदार ज्ञानेश्वर भोसले यांनी लोकमतला सांगितले, १२ ते १५ लोकांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांची ५० ते ६० लाख रुपयाने फसवणूक करण्यात आली आहे. तपासात इतर पीडितही समोर आल्यास ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे.
७० गुंतवणूकदार आले समोर
सूत्रानुसार मंगळवारी एजंटसह ७० गुंतवणूकदारांनी तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शविली. शासकीयस्तरावर फसवणुकीची रक्कम कोट्यवधी आहे. इतर शहरातील लोकांनीही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. ते अजूनपर्यंत समोर आलेले नाहीत. कोतवाली पोलीस या प्रकरणाला फारसे गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. मेहरकुरे आणि त्याच्या साथीदाराची शिक्षा एजंटला मिळत आहे. गुंतवणूकदार त्यांना त्रास देत आहेत.
आर्थिक शाखेचाही परिणाम नाही
शहरात पतसंस्थेद्वारा फसवणूक करण्यात आल्याच्या घटना नेहमीच होत असतात. यावर देखरेख ठेवण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखा गठित करण्यात आली आहे. त्यानंतरही असे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे आर्थिक शाखेचा पाहिजे तसा प्रभाव पडत नसल्याचे दिसून येते.

 

Web Title: Fraud of crores in Jai Shriram credit cooperative in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.