अंबाझरी तलावातील ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने माशांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 08:55 PM2019-05-08T20:55:48+5:302019-05-09T00:01:47+5:30

स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधातील ऐतिहासिक वारसा असलेल्या अंबाझरी तलावातील पाण्यात बॅक्टेरियाचे प्रमाण वाढले आहे. पाण्यातील ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने अंबाझरी तलावातील माशांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याची धक्कादायक बाब संशोधनातून पुढे आली आहे. ‘नीरी’ने याबाबतचा अहवाल महापालिका प्रशासनाकडे सादर केला आहे.

Fish death due to reduced oxygen content in Ambazari lake | अंबाझरी तलावातील ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने माशांचा मृत्यू

अंबाझरी तलावातील ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने माशांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देनीरीचा अहवाल : पाण्यात बॅक्टेरियाचे प्रमाण वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधातील ऐतिहासिक वारसा असलेल्या अंबाझरी तलावातील पाण्यात बॅक्टेरियाचे प्रमाण वाढले आहे. पाण्यातील ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने अंबाझरी तलावातील माशांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याची धक्कादायक बाब संशोधनातून पुढे आली आहे. ‘नीरी’ने याबाबतचा अहवाल महापालिका प्रशासनाकडे सादर केला आहे.
मागील काही दिवसापासून अंबाझरी तलावातील मासे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत आहेत. मेलेले मासे तलावातील पाण्यात तरंगत असल्याने तलाव परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यासंदर्भात नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. नीरीलाही यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. नीरीच्या तज्ज्ञांनी तलावातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली असता पाण्यात बॅक्टेरिया वाढला असून तलावातील पाण्यात ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतचा अहवाल महापालिकेच्या उद्यान विभागाकडे सोपविण्यात आला आहे. उद्यान विभागाकडून हा अहवाल जलप्रदाय विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात तलावातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. याचा माशांवर परिणाम होत असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तलावातील मासे जिवंत राहण्यासाठी पाण्यातील ऑक्सिजनची मात्रा वाढविण्याची गरज आहे. यादृष्टीने महापालिका प्रशासनाकडून कोणत्या उपाययोजना केल्या जातात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
तलावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
शहराचा ऐतिहासिक वारसा असलेल्या अंबाझरी तलावाचे संवर्धन व देखभालीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. तलावातील मासे मृत्युमुखी पडत असल्यासंदर्भात नागरिकांनी आधीच कल्पना दिली होती. तलावाच्या काठावर व परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा व घाण साचलेली आहे. यामुळेही पाणी प्रदूषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तातडीने उपाययोजनांची गरज
अंबाझरी तलावातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यातच पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले असून बॅक्टेरिया वाढल्याने तलावातील जलचर प्राण्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. याचा विचार करता महापालिका प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे.

उद्योगाचे दूषित पाणी तलावात
उद्योगांतील रासायनिक पाणी व नागरी वस्त्यांमधील सांडपाणी अंबाझरी तलावात मिसळत असल्यामुळे तलावातील पाणी दूषित होत आहे. 
यामुळे अंबाझरी तलावातील माशांचा मृत्यू होत आहे. जलाशयातील प्रदूषण न रोखल्यास तेथील जैवविविधतेवर परिणाम होईल, अशी भीती पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे.

प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना राबविणार
मासे मृत्युमुखी पडत असल्याने अंबाझरी तलावाच्या विविध भागातील पाण्याच्या नमुन्यांची नीरीने तपासणी केली. यात तलावातील काही भागातील पाण्यात ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याचे आढळून आले आहे.  उन्हाळ्याच्या दिवसात अंबाझरी तलावातील माशांचा यापूर्वीही मृत्यू झाला होता. उन्हाळ्याच्या दिवसात तापमानामुळे तलावातील पाण्याच्या वरच्या थरातील ऑक्सिजन कमी होतो. त्यामुळे माशांचा मृत्यू झाला असावा, पाण्याचे प्रदूषण रोखून ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध उपाययोजना महापालिका हाती घेणार आहे.
अभिजित बांगर, आयुक्त महापालिका

Web Title: Fish death due to reduced oxygen content in Ambazari lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.