उपराजधानीवर डेंग्यूचे विघ्न : १४ शाळांमध्ये अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 10:22 PM2018-09-22T22:22:43+5:302018-09-22T22:32:06+5:30

उपराजधानीत एकीकडे विघ्नहर्त्याच्या निरोपाला घेऊन भावूक वातावरण असताना दुसरीकडे मात्र डेंग्यूचे विघ्न गंभीर रूप धारण करीत आहे़ जवळजवळ अर्धे शहर ऐन सणासुदीच्या दिवसात तापाने फणफणले आहे. वस्त्यावस्त्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. डेंग्यूचा डास दिवसाच चावतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी, लहान मुले याला बळी पडत आहेत. या आजारामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरात वाढलेल्या डेंग्यूच्या प्रकोपामुळे महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने शाळा-महाविद्यालयांची तपासणी केली असता, १४ शाळा-महाविद्यालयांंमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत.

Dengue crises on Sub-Capital: larvae in 14 schools | उपराजधानीवर डेंग्यूचे विघ्न : १४ शाळांमध्ये अळ्या

उपराजधानीवर डेंग्यूचे विघ्न : १४ शाळांमध्ये अळ्या

Next
ठळक मुद्देपालकांमध्ये भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत एकीकडे विघ्नहर्त्याच्या निरोपाला घेऊन भावूक वातावरण असताना दुसरीकडे मात्र डेंग्यूचे विघ्न गंभीर रूप धारण करीत आहे़ जवळजवळ अर्धे शहर ऐन सणासुदीच्या दिवसात तापाने फणफणले आहे. वस्त्यावस्त्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. डेंग्यूचा डास दिवसाच चावतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी, लहान मुले याला बळी पडत आहेत. या आजारामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरात वाढलेल्या डेंग्यूच्या प्रकोपामुळे महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने शाळा-महाविद्यालयांची तपासणी केली असता, १४ शाळा-महाविद्यालयांंमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत.
डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अ‍ॅण्टीबायोटिक किंवा अ‍ॅण्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास मृत्यूचा धोका संभवतो. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे पावसाचे पाणी जमा होऊन डासांच्या प्रादुर्भावात वाढ होण्याची शक्यता आहे. शहरात आतापर्यंत १०५ रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूला कारणीभूत असलेले एडिस डास हे जास्त करून शहरी वस्त्यांत आढळतात. कूलर्स, पाण्याच्या टाक्या, ड्रम, कुंड्या, डबे व पावसाचे किंवा स्वच्छ पाणी जिथे जमा राहील अशा ठिकाणी हा डास लवकर फैलावतो. याच्या जनजागृतीला घेऊन गेल्या काही वर्षांपासून मनपाचा हिवताप व हत्तीरोग विभाग जनजागृती करीत आहे. घरांसोबतच शाळा, इस्पितळांची तपासणी करून याची माहिती देत आहे. अनेकांना या जागृतीमुळे बऱ्याच गोष्टी माहिती झाल्या तरी उपाययोजनेकडे दुर्लक्ष करीत असल्याने डेंग्यूच्या अळ्या आढळून येण्याचे प्रमाण कमी झालेले नसल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या झोनस्तरावर शाळांच्या केलेल्या तपासणीत १४ शाळांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. या विभागाच्या वतीने जिथे अळ्या आढळून आल्या त्या कुंड्या, कूलर्स, पाण्याचे ड्रम उपस्थित जबाबदार शिक्षक व अधिकाºयांना दाखवून ते खाली करून घेतले. जिथे पाणी रिकामे करता येत नाही अशा ठिकाणी गप्पीमासे सोडले. काही ठिकाणी औषधांची फवारणी केली. यानंतरही करण्यात येणाऱ्या पाहणीत डासांच्या अळ्या आढळून आल्यास संबंधित शाळा-महाविद्यालय संचालकांना जबाबदार धरण्यात येण्याची नोटीस बजावली जाणार आहे.
जानेवारी ते आतापर्यंत डेंग्यूचे १०५ रुग्ण आढळून आले. यात १ ते १४ वर्षांपर्यंतच्या वयोगटात २६ मुले व १७ मुली असे ४३ बालकांची नोंद आहे. १५ ते २४ वयोगटात २१ युवक व १३ युवती मिळून ३४ तर २५ ते ६० या वयोगटात १८ पुरुष व १० महिला अशा २८ जणांना डेंग्यूचे निदान झाले आहे. बालकांमध्ये डेंग्यूचे प्रमाण वाढत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.

या शाळांमध्ये आढळल्या डेंग्यूच्या अळ्या
विद्याभूषण स्कूल , टाटा पारसी स्कूल, बिंझाणी विद्यालय, केशव माध्यमिक विद्यालय, दयानंद कॉलेज, अंजुमन पॉलिटेक्निक महाविद्यालय, सेंट जॉन्स स्कूल, हरी किशन स्कूल , सिंधी हिंदी शाळा, गंजीपेठ उर्दू हायस्कूल , सिद्धेश्वर विद्यालय, श्री राधे इंग्लिश स्कूल, प्रशांत माध्यमिक विद्यालय, नागपुरी शाळा

परिसर स्वच्छ ठेवण्यावर भर द्या
‘वर्गखोल्यांसह संपूर्ण शाळा परिसर स्वच्छ ठेवणे, ही शाळा प्रशासनाची प्राथमिकता आहे. शाळा परिसरात कुठेही डासांचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांच्या स्वच्छतागृहांची रोज साफसफाई केली जावी. पिण्याच्या पाण्याची खास व्यवस्था करण्यात यावी. तसेच जुलै ते डिसेंबर यादरम्यान डासांचा प्रकोप वाढलेला असतो. यामुळे या महिन्यात एक किंवा दोनवेळा सुटीच्या दिवशी कीटकनाशक फवारणी करावी.
डॉ. रोहिणी पाटील

 फुलबाहीचे शर्ट व फुलपॅन्टचा वापर करा
डेंग्यू हा ‘एडिस’ नावाच्या डासापासून होतो. हा डास दिवसा चावतो. याच वेळी मोठ्या संख्येत मुले शाळेत असतात. यामुळे शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना फुलबाहीचे शर्ट व फुलपॅन्टचा वापर करण्यास परवानगी दिल्यास काही प्रमाणात हा आजार टाळता येणे शक्य आहे. याशिवाय भंगार साहित्याचे योग्य व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. डेंग्यूवर अद्याप लस उपलब्ध नाही. यामुळे याच्या
जनजागृतीवर अधिक भर देणे व लोकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस जरी पाळला तरी या आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे.
डॉ. अविनाश गावंडे

Web Title: Dengue crises on Sub-Capital: larvae in 14 schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.