‘त्या’ जमिनी परत करण्याबाबत महिनाभरात निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 01:05 AM2018-04-04T01:05:51+5:302018-04-04T01:06:07+5:30

Decision in the matter of returning the 'land' in a month | ‘त्या’ जमिनी परत करण्याबाबत महिनाभरात निर्णय

‘त्या’ जमिनी परत करण्याबाबत महिनाभरात निर्णय

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी घेतली ‘वेकोलि’ची आढावा बैठक : काम सुरू न झालेल्या खाणींच्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याबाबत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : ‘वेकोलि’ने नागपूर जिल्ह्यात संपादित केलेल्या काही जमिनींवर अद्यापपर्यंत कोळसा खाण सुरू होऊ शकलेली नाही. अशा ठिकाणी कोळसा खाण कितपत फायदेशीर ठरेल यासंदर्भात अभ्यास करण्यात येणार आहे. त्यानंतर संपादित जमिनी शेतकऱ्यांना परत करण्यासंदर्भात महिनाभरात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती ‘वेकोलि’चे अध्यक्ष व प्रबंध संचालक राजीवरंजन मिश्रा यांनी दिली. ‘वेकोलि’च्या मुख्यालयात मंगळवारी राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
या बैठकीला माजी आमदार आशिष जयस्वाल, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांच्यासह ‘वेकोलि’चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सावनेर परिसरातील काही शेतकऱ्यांची जमीन कोळसा खाणीसाठ़ी संपादित केली. गेल्या ३-४ वर्षांपासून ही जमीन ‘वेकोलि’च्या ताब्यात आहे. पण खाण सुरु झाली नाही म्हणून या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही व जमीनही परत मिळाली नाही. बोरगाव, सोनपूर, आदासा या भागातील शेतकऱ्यांची जमीनही संपादित करण्यात आली आहे याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. यावर राजीवरंजन मिश्रा यांनी सांगितले की, या जमिनी परत करण्याच्या दृष्टीने महिनाभरात कारवाई करण्यात येईल. महानिर्मितीला लागणारा कोळसा ‘वेकोलि’कडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. महानिर्मितीला कोळसा कमी पडणार नाही, अशी हमी मिश्रा यांनी दिली. ज्या ठिकाणी रेल्वेने कोळसा नेणे शक्य नाही त्या ठिकाणी रस्ते वाहतुकीतून कोळसा पुरवठा झाला पाहिजे. यासाठी आवश्यक ती प्रक्रिया त्वरित करण्याचे निर्देशही चंद्रशेखर बावनकुळे यांनी महानिर्मितीला दिले. उमरेडजवळ हेवती येथील वीज प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सन २०१४-१५ च्या धोरणानुसार करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांना दिले
‘वेकोलि’चे सांडपाणी सिंचनासाठी मिळणार
‘वेकोलि’चे सांडपाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठ़ी देण्यासाठी येत्या २८ एप्रिलला विदर्भ सिंचन महामंडळ आणि ‘वेकोलि’च्या अधिकाऱ्यांमध्ये सामंजस्य करार करण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात येणार आहे.
पिण्याचे पाणी बंद करु नका
पिपळा, वलनी, सिलेवाडा या कोळसा खाणीजवळ राहणाऱ्या नागरिकांना ‘वेकोलि’तर्फे मिळणारे पाणी बंद करण्यात आले. शेतकऱ्यांना यापूर्वी शेतीसाठ़ी पाणी मिळत होते. तेही बंद करण्यात आले. यावर पिण्याचे पाणी बंद न करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी ‘वेकोलि’ला दिले. शेतकऱ्यांना पाणी देण्याचा निर्णय तीन दिवसात अभ्यास करून घेतला जाईल, अशी माहिती ‘वेकोलि’तर्फे या बैठकीत देण्यात आली.

Web Title: Decision in the matter of returning the 'land' in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.