रेतीमाफियांचा तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला : टिप्परला लटकून १५ कि.मी. प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 09:28 PM2018-10-30T21:28:51+5:302018-10-30T21:35:47+5:30

विना रॉयल्टी व ओव्हरलोड रेतीच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार आणि नायब तहसीलदाराच्या अंगावरच टिप्पर चालविण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार नागपूर-गडचिरोली मार्गावरील उमरेडनजीकच्या रेल्वे क्रॉसिंगजवळ मंगळवारी (दि. ३०) सकाळच्या सुमारास घडला. त्याचवेळी तहसीलदारांनी समयसूचकता राखत टिप्पर अडविण्याचा प्रयत्न केला. त्यात ते टिप्परच्या पायदानाला लटकले गेले आणि तब्बल १५ कि.मी.पर्यंत टिप्परच्या पायदानाला लटकून गेले. या घटनेमुळे अख्ख्या नागपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Deadly attack on Tahasildar by Sandmafiyas : 15 km by hanging Tipper Travel | रेतीमाफियांचा तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला : टिप्परला लटकून १५ कि.मी. प्रवास

रेतीमाफियांचा तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला : टिप्परला लटकून १५ कि.मी. प्रवास

Next
ठळक मुद्देउडी मारून केला बचावनागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील धक्कादायक घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (उमरेड) : विना रॉयल्टी व ओव्हरलोड रेतीच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार आणि नायब तहसीलदाराच्या अंगावरच टिप्पर चालविण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार नागपूर-गडचिरोली मार्गावरील उमरेडनजीकच्या रेल्वे क्रॉसिंगजवळ मंगळवारी (दि. ३०) सकाळच्या सुमारास घडला. त्याचवेळी तहसीलदारांनी समयसूचकता राखत टिप्पर अडविण्याचा प्रयत्न केला. त्यात ते टिप्परच्या पायदानाला लटकले गेले आणि तब्बल १५ कि.मी.पर्यंत टिप्परच्या पायदानाला लटकून गेले. या घटनेमुळे अख्ख्या नागपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
प्रमोद कदम असे तहसीलदाराचे तर योगेश शिंदे असे या घटनेत बचावलेल्या नायब तहसीलदाराचे नाव आहे. अवैध रेती उत्खनन, ओव्हरलोड आणि विना रॉयल्टी रेती वाहतुकीचे प्रमाण उमरेड भागात गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. त्याला आळा घालण्यासाठी उमरेडचे तहसीलदार प्रमोद कदम, नायब तहसीलदार योगेश शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी सकाळच्या सुमारास उमरेड-भिवापूर मार्गावरील रेल्वे क्रॉॅसिंगजवळ रेतीच्या वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. त्यांनी एका टिप्परला थांबण्यासाठी हाताने इशारा केला. मात्र, चालकाने टिप्पर नायब तहसीलदार योगेश शिंदे यांच्या अंगावर नेण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांनी लगेच बाजूला उडी मारत स्वत:चा बचाव केला.
टिप्परचा वेग मंदावल्याने तहसीलदार कदम हे टिप्परच्या फूटरेस्टवर पाय ठेवून वर लटकले. त्यातच चालकाने वेग वाढविला. त्यामुळे त्यांना उतरणे किंवा उडी घेणे शक्य नव्हते. त्यांनी टिप्परला लटकून १५ कि.मी. प्रवास केला आणि उटी (ता. भिवापूर) शिवारात टिप्परचा वेग कमी होताच उडी मारली. सुदैवाने त्यांना दुखापत झाली नाही. या घटनेच्या निषेधार्थ दुपारी १२ नंतर महसूल विभागाच्या उमरेड कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. याप्रकरणी उमरेड पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

कार मागावर
तहसीलदार कदम यांचा टिप्परला लटकलेल्या अवस्थेत जीवघेणा प्रवास सुरू असताना, त्या टिप्परच्या मागे एमएच-४०/बीजे-०४२४ क्रमांकाची कार होती. ती कार टिप्परला १५ ते २० फूट अंतर राखून येत होती; शिवाय कारचालक टिप्परचालकाशी मोबाईलवर संवादही साधत होता. या प्रवासात कारचालकाने त्या टिप्परला ओव्हरटेक करण्याचाही प्रयत्न केला नाही. त्यामुळे कारचालक हा टिप्परचा मालक, रेतीमाफिया किंवा रेतीमाफियाचा हस्तक असल्याची दाट शक्यता आहे.

कठोर कारवाई करू
तहसीलदार प्रमोद कदम व नायब तहसीलदार योगेश शिंदे यांच्यासोबत उमरेड तालुक्यात मंगळवारी घडलेला प्रकार निषेधार्ह आहे. रेतीमाफिया किंवा त्यांचे हस्तक पूर्वनियोजित हल्ले करीत नाहीत. त्यामुळे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाईला जाताना विशेष काळजी घ्यावी. या घटनेबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.भविष्यातअशा घटना टाळण्यासाठी कारवाईच्या वेळी पोलीस संरक्षण देण्याबाबत विचार सुरू आहे.
अश्विन मुदगल,
जिल्हाधिकारी, नागपूर.

Web Title: Deadly attack on Tahasildar by Sandmafiyas : 15 km by hanging Tipper Travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.