CoronaVirus in Nagpur : बॅन्ड बाजा बारात सर्व ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 11:49 PM2020-03-31T23:49:25+5:302020-03-31T23:51:09+5:30
मंगल कार्यालये सामसूम, कपडे, दागिन्यांची दुकाने बंद. कुठे पत्रिका नाही, लाईट, मंडप डेकोरेशन, घोडे यांचे बुकिंग नाही. कोरोनाच्या भीतीने सर्व कसे थांबविल्यासारखे झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मार्च संपत आला आणि एप्रिल सुरू झाला की लग्नसराईची धामधूम जोरात सुरू होते. सनई चौघड्यांचे सूर वाजू लागतात. कुठे लग्नाचा बस्ता व दागिन्यांच्या खरेदीची लगबग चाललेली असते तर कुठे मुहूर्त, पत्रिका छापण्याची घाई झाली असते. वाजतगाजत वरातीही निघायला लागतात. मात्र यावर्षी सगळ कसे ठप्प झाले आहे. मंगल कार्यालये सामसूम, कपडे, दागिन्यांची दुकाने बंद. कुठे पत्रिका नाही, लाईट, मंडप डेकोरेशन, घोडे यांचे बुकिंग नाही. कोरोनाच्या भीतीने सर्व कसे थांबविल्यासारखे झाले आहे. कोरोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन झाले आहे. १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देश जागेवर थांबला असून, या कालावधीत कोरोना नियंत्रणात आला नाही तर आणखी लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याच काळात होणाऱ्या लग्नसराईवर मोठा परिणाम झाला असून, मार्च व एप्रिल महिन्यात होऊ घातलेले सर्वच लग्न सोहळे स्थगित झाले आहेत. त्यामुळे यावर अवलंबून मंगल कार्यालय, लॉन्स, बॅन्ँड, घोडा, पार्लर व मंडप हा व्यवसायही थांबला असून काही जणांनी अॅडव्हान्स घेतलेली रक्कम परत केली आहे, तर काहींनी पुढच्या तारखात समायोजन केले आहे. लग्न हा आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याने प्रत्येक जण नातेवाईक, मित्रमंडळी यांना आमंत्रित करून भव्यदिव्य सोहळा पार पाडण्याचे नियोजन करीत असतो. कोरोनामुळे या स्वप्नांना तूर्तास ब्रेक लागला आहे. गेल्या आठवडोत एमआयडीसी पोलिसांनी पुढाकार घेऊन एक लग्नसोहळा स्थगित केला. वर पित्याची भेट घेऊन त्यांची समजूत घातली. त्यानंतर हा सोहळा स्थगित झाला. विशेष म्हणजे लॉन मालकाने संपूर्ण रक्कम परतही केली. बॅन्ड, डीजे शांत, सर्वत्र सामसूम लग्नाची धामधूम सुरू होताच डीजेवाले आणि बॅन्ड पथकांच्या तारखा मिळणे कठीण होऊन जाते. यावेळी मात्र हे दोन्ही ध्वनी शांत झाले आहेत. घोडे घरात बांधले आहेत. कपडे, दागिन्यांच्या दुकानांचे शटर बंद आहेत. लाईट व्यवस्था करणाºया व्यावसायिकांच्या महालमधील परिसरात शुकशुकाट पसरला आहे. लाईट डोक्यावर घेऊन चालणारे मजूरही गावाकडे परतले आहेत. मंडप डेकोरेशनचे पडदे घरातच धूळ खात पडले आहेत. पत्रिकांच्या दुकानांनाही शटर लागले आहे. सर्व एका जागी शांतपणे स्थिर झाल्यासारखे आहे.
कुणाचे रद्द तर कुणाला मे, जूनची प्रतीक्षामार्च व एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या लग्नसोहळ्यात बुकिंग झालेले मंगल कार्यालय, घोडा, बॅन्ँड, मंडप, पार्लर, कॅटरिंग, फुले, हार, भटजी,पाण्याचे जार यासह तत्सम वस्तूंची बुकिंग झालेली आहे. काही सोहळ्यात वधू व वर पक्षाने तारखा रद्द केल्या असल्या तरी बुकिंगची रक्कम परत न घेता मे व जून महिन्यात लग्नसोहळा होणार असल्याने तेव्हा समायोजन करण्याचा निर्णय घेतला.