प्रादेशिक मनोरुग्णालयात राष्ट्रीय  महिला आयोगाची समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 11:07 PM2018-07-13T23:07:24+5:302018-07-13T23:09:36+5:30

Committee of National Commission for Women in Regional Psychiatry | प्रादेशिक मनोरुग्णालयात राष्ट्रीय  महिला आयोगाची समिती

प्रादेशिक मनोरुग्णालयात राष्ट्रीय  महिला आयोगाची समिती

Next
ठळक मुद्देविविध सोईसुविधांचे केले कौतुक




लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिला समितीने प्रादेशिक मनोरुग्णालयाला अचानक भेट दिल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. परंतु या अचानक भेटीतही रुग्णांच्या सोर्इंसाठी राबविणारे विविध उपक्रम, कार्यक्रम व खेळ पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे, रुग्णांनी फुलविलेली शेती व फळबाग पाहून रुग्णालय प्रशासनाचे विशेष कौतुक केले.
राष्ट्रीय  महिला आयोगाचे आलोक रावत आणि अवनी बाहरी यांनी गुरुवारी रुग्णालयाची अचानक पाहणी केली. यावेळी रुग्णांसाठी करमणुकीसाठी सुरु असलेले ‘मुव्ही क्लब’, नृत्य, व्यायामाचे सत्र आणि विविध खेळांमध्ये रुग्ण व्यस्त असल्याचे पाहून आनंद व्यक्त केला. व्यवसायोपचाराच्या दृष्टिकोनातून रुग्णांनी साकारलेली विविध कलाकृतीचे त्यांनी निरीक्षण केले. रुग्णालयाच्या परिसरात सुमारे १० एकर परिसरात रुग्ण व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमातून साकारलेली भाजीपाल्याची शेती व फळबाग पाहताना समितीच्या चमूने रुग्णालय प्रशासनाचे विशेष कौतुक केले. या शेतीतून रोज ६० ते ७० किलो भाजी काढली जात असल्यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. समितीने स्वयंपाकगृहाची पाहणी केली. रुग्ण लवकर बरे होण्याच्या दृष्टीने संगीतद्वारे उपचार सुरू करण्याचा आणि रुग्णालयातील पथदिव्यासाठी नव्या सोलर तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सूचनाही आलोक रावत यांनी दिल्या.
रुग्णालयातील सर्व रुग्णांचे आधार कार्ड काढण्यात आले आहे. त्यांचे बँक खाते लवकरात लवकर उघडण्याचे अवनी बाहरी यांनी सुचविले. महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्ट्च्या ‘उडान’ या संयुक्त उपक्रमात सुरु असलेल्या कार्याची पाहणी समितीने करून समाधान व्यक्त केले. यावेळी प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूरचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन गुल्हाने, उपअधीक्षक डॉ. प्रवीण नवखरे, मनोविकृती तज्ञ मधुमिता बहाले, टाटा ट्रस्ट्च्या डॉ. भारती बत्रा, अविनाश खरपकर आदी उपस्थित होते.

Web Title: Committee of National Commission for Women in Regional Psychiatry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.