होळीत रंगला रंगांचा बाजार : भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:31 PM2019-03-19T22:31:52+5:302019-03-19T22:34:22+5:30

होळी म्हणजे नाते जपणारा आणि विविधरंगी रंगांचा सण. धुळवडीत संपूर्ण देशात रंगांचे उधाण असते. होळीच्या निमित्ताने रंग आणि पिचकाऱ्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. गेल्या वर्षीपर्यंत चिनी रंगांचे वर्चस्व होते. पण यंदा भारतीय बनावटीचे रंग आणि पिचकाऱ्यांना जास्त मागणी आहे. रंग, पिचकारी, गाठींच्या किमतींमध्ये १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. हर्बल आणि नैसर्गिक रंगांना जास्त मागणी आहे.

The colors of bazar become colorful in Holi: the demand for Indian made pitchkari | होळीत रंगला रंगांचा बाजार : भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांना मागणी

होळीत रंगला रंगांचा बाजार : भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांना मागणी

Next
ठळक मुद्देचीनच्या फॅन्सी पिचकाऱ्यांची रेलचेल, लोकांना हवे ब्रॅण्डेड, हर्बल व नैसर्गिक रंग, गाठी महाग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : होळी म्हणजे नाते जपणारा आणि विविधरंगी रंगांचा सण. धुळवडीत संपूर्ण देशात रंगांचे उधाण असते. होळीच्या निमित्ताने रंग आणि पिचकाऱ्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. गेल्या वर्षीपर्यंत चिनी रंगांचे वर्चस्व होते. पण यंदा भारतीय बनावटीचे रंग आणि पिचकाऱ्यांना जास्त मागणी आहे. रंग, पिचकारी, गाठींच्या किमतींमध्ये १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. हर्बल आणि नैसर्गिक रंगांना जास्त मागणी आहे.
भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्यांकडे कल
नागपुरातही होळीनिमित्त बाजारपेठ सजली असून खरेदीसाठी लोकांची गर्दी आहे. पारंपरिक व हर्बल रंग, गुलाल आणि लहानांना आकर्षित करणाऱ्या  फॅन्सी आणि कार्टुन पिचकाऱ्यांनी दुकाने सजली आहेत. यामध्ये विविध प्रकारचे मुखवटे, टोप्यांचा समावेश आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर चीनचा विरोध होत असतानाही चीनच्या फॅन्सी पिचकाऱ्यांची बाजारात रेलचेल आहे. पण मेड इन इंडिया वस्तूंकडे लोकांचा जास्त कल आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत खरेदीत गर्क आहेत. यंदा जीएसटीमुळे वस्तूंचे भाव वाढले असून भारतीय आणि चिनी बनावटीच्या पिचकाऱ्यांमध्ये स्पर्धेचे वातावरण आहे.
लोकांना हवे ब्रॅण्डेड रंग
रेशीम ओळ येथील रंगाचे व्यापारी अतुल लांजेवार यांनी सांगितले की, यावर्षी गुलाल आणि रंगाच्या किमतीत १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. सर्व रंगाच्या गुलालासह गणेश, मुर्गा, तोता ब्रॅण्डच्या रंगाला जास्त मागणी आहे. हे रंग २० ते ५० ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये असून किंमत २५ ते १०० रुपयांपर्यंत आहे. आठवड्यापूर्वीच विक्री सुरू झाली आहे. यासह गोल्डन रंग, वॉर्निश आणि उत्तम क्वॉलिटीच्या पॅक रंगांची मागणी वाढली आहे. लिक्विड रंगाला लोकांची पसंती आहे. धुलिवंदनासाठी लाल, गुलाबी, निळा, जांभळा, हिरवा, पिस्ता, भगवा, नारंगी, पिवळा असे नैसर्गिक रंग पाऊचमध्ये बाजारात उपलब्ध आहेत.
हर्बल रंगाला जास्त मागणी
धुळवडीला रासायनिक रंगांचा वापर केल्यामुळे त्वचेवर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन, अलीकडे नागरिक पर्यावरणपूरक किंवा नैसर्गिक रंगांचा वापर करण्यावर भर देतात. परंतु बाजारात विक्रेते ‘नैसर्गिक रंग’ किंवा ‘इको-फ्रेंडली’ अशा नावांनी रासायनिक रंगांची विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. इको फे्रंडली होळी खेळण्यासाठी हर्बल रंग आणि गुलालाला जास्त पसंती देतात. पारंपरिक गुलाल प्रति किलो ४० ते ५० रुपये तर हर्बल गुलाल ३०० ते हजार रुपये किलोपर्यंत विक्रीस आहे.
दुसरीकडे, रासायनिक रंगांमधील घटकांच्या प्रमाणाबाबत कोणतीही व्याख्या निश्चित न करण्यात आल्याने उत्पादक कोणत्याही रसायनांपासून तयार झालेले रंग बाजारात आणत आहेत. नैसर्गिक रंगांची बाजारातील उपलब्धता मागणीच्या तुलनेत फारच नगण्य आहे. तसेच बाजारातील रंगाच्या तुलनेत हे रंग महागही आहेत.
गन, टँक, पाईप्स, भीम, डोरेमोन पिचकाऱ्यांना मागणी
धुळवडीसाठी बाजारात उपलब्ध पिचकाऱ्या बच्चे कंपनीचे लक्ष वेधून घेत आहेत. लहानांपासून दोन लिटर रंग भरण्याइतपत पिचकाऱ्या बाजारात विक्रीस आहेत. यंदा गन, टँक, सिलिंडर, मोटू-पतलू, शूटर, एअर व मशीन गन, पाईप्स तसेच छोटा भीम, डोरेमोन, शिनचेन, अर्जुन आदी कार्टुन आणि सेलेब्रिटींचे चित्र असलेल्या पिचकाºया विकल्या जात आहेत. लहान मुलांकडून पारंपरिक पिचकाऱ्यांऐवजी खेळणी आणि कार्टुन पिचकाऱ्यांना जास्त मागणी आहे. यंदा मोबाईल, बाहुल्या, बंदुकी, प्राणी, पक्षी आदी आकाराच्या पिचकाऱ्या बाजारात विक्रीस आहेत. गेल्यावर्षीच्या मोठ्या पिचकाऱ्यांच्या किमतीमध्ये २० ते ४० रुपयांनी वाढ झाली आहे. लहान मुलांमध्ये आकर्षण असलेली छोटा भीम, डोरेमोन, शिनचेन, अर्जुन आदी कार्टुन्सच्या पिचकाऱ्या थेट २५० ते ५०० रुपयांमध्ये विकल्या जात आहेत.
नवीन स्टाईलचे विग व कॅप
रबर आणि प्लास्टिकच्या हॉरर मुखवट्यासह नवीन स्टाईलचे विग आणि कॅप बाजारात आल्या आहेत. चेहºयावर लावण्यात येणारे मुखवटे १०० रुपयांपर्यंत आणि आकर्षक डिझाईनच्या कॅप ब्लॅक, व्हाईट, गोल्डन आणि मल्टी कलर्समध्ये ५० ते १०० रुपयांदरम्यान उपलब्ध आहेत.
नातेसंबंधात गोडवा आणणारी गाठी
होळीत नातेसंबंधात गोडवा आणण्याचे माध्यम म्हणून ‘गाठी’ची महती आहे. साखरेच्या पाकापासून तयार होणाऱ्या गाठीला पारंपरिक मान्यता आहे. गुढीपाडव्यातही गाठीला विशेष महत्त्व आहे. शिवाय उष्माघाताने प्रभावित व्यक्तीला पाण्यात गाठी मिसळून पाजल्यास तात्काळ आराम मिळतो. हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहेत. होळीत गाठ्यांना जास्त मागणी असते.
यंदा १० ते १५ टक्के महाग
गाठीचे व्यावसायिक मनीष शाहू यांनी सांगितले की, यंदा गाठ्यांवर आधुनिकतेचा रंग चढला आहे. होळीत गुलाल आणि गाठी या दोन नातेसंबंध अधिक दृढ करणाऱ्या वस्तू आहेत. पूजेसाठी गाठीचे जास्त महत्त्व आहे. यंदा गाठीच्या किमती १० ते १५ टक्क्यांनी महागल्या आहेत. ठोक बाजारात ६० ते ७० रुपये तर किरकोळमध्ये ८० ते ९० रुपये प्रति किलो भावाने विक्री होत आहे. साधी आणि बत्तासा प्रकारात आहेत.
यंदा धागे, साखरेची किंमत आणि कारागिरीमुळे भाव वाढले आहेत. शांतीनगर, कावरापेठ, मस्कासाथ, लालगंज आदींसह शहरात गाठी निर्मितीचे २० पेक्षा जास्त कारखाने आहेत. गाठ्या तयार करण्यासाठी खास कानपूर, लखनौ आणि अलाहाबाद येथून होळीच्या २० ते २५ दिवसांपूर्वी कारागीर येतात. गाठ्या तयार करून परत जातात. गाठ्यांच्या निर्मितीसाठी साखर कोल्हापूर आणि सोलापूर या भागातून येते.
लोकांचा पर्यटनाकडे कल
बहुतांश लोकांनी होळीचे प्लॅनिंग केले आहे. काही लोक धार्मिक स्थळांकडे तर काही पर्यटन स्थळांवर जाऊन आपापल्या पद्धतीने होळी सण साजरा करण्याच्या तयारीत आहेत. खानपानसह डीजेची व्यवस्था केली आहे.
चिनी उत्पादनांचा विरोध कितपत यशस्वी ठरणार?
विविध संघटनांतर्फे चिनी उत्पादनांचा विरोध करण्यात येतो. यंदाही होळीनिमित्त बाजारात आलेल्या चिनी पिचकाऱ्या, रंग, मुखवटे यांचा विरोध करण्यात येत आहे. पण हा विरोध व्यावसायिकरीत्या शक्य आहे का, यावर प्रश्नचिन्ह आहे. यावर लोकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. मौलाना मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास चीनचा विरोध असल्यामुळे लोकांमध्ये संतापाची भावना आहे. सोशल मीडियावरही चीनचे उत्पादन खरेदी करू नये, अशी मागणी करण्यात येत आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशनने चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. होळी सणाात गिफ्ट पॅक, स्पे्र, म्युझिकल पिचकारी, गुलाल पिचकारी आदींच्या विक्रीत चीनचे मिश्रण पाहायला मिळत आहे. या उत्पादनांची मुलांमध्ये क्रेझ आहे. लोकांकडून मेड इन इंडियाची मागणी करीत असताना बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध चीनच्या उत्पादनांवर बंदी टाकण्याची मागणी कितपत यशस्वी होईल, हे सांगणे कठीण असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

 

Web Title: The colors of bazar become colorful in Holi: the demand for Indian made pitchkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.