‘इंडस्ट्री लिंकेज’मध्ये माघारताहेत महाविद्यालये; विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राचा अनुभव कधी मिळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 10:46 AM2018-12-19T10:46:40+5:302018-12-19T10:47:19+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात महाविद्यालयांची संख्या भरमसाठ असली तरी ‘प्लेसमेन्ट’सोबतच उद्योगजगताशी ‘लिंकेज’चे प्रमाण मात्र कमी आहे. यामुळे विद्यार्थी ‘आयआयटी’, ‘एनआयटी’ किंवा इतर मोठ्या शहरांकडे शिक्षणासाठी वळत आहेत.

Colleges retreating in 'Industry Linkage'; When will the students experience the industry? | ‘इंडस्ट्री लिंकेज’मध्ये माघारताहेत महाविद्यालये; विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राचा अनुभव कधी मिळणार ?

‘इंडस्ट्री लिंकेज’मध्ये माघारताहेत महाविद्यालये; विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राचा अनुभव कधी मिळणार ?

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यापीठाकडूनदेखील फारसा पुढाकार नाही

योगेश पांडे / आशिष दुबे / मेघा तिवारी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात महाविद्यालयांची संख्या भरमसाठ असली तरी ‘प्लेसमेन्ट’सोबतच उद्योगजगताशी ‘लिंकेज’चे प्रमाण मात्र कमी आहे. यामुळे विद्यार्थी ‘आयआयटी’, ‘एनआयटी’ किंवा इतर मोठ्या शहरांकडे शिक्षणासाठी वळत आहेत. मात्र यामुळे मागील आठ वर्षांत विद्यापीठाशी संलग्नित अभियांत्रिकी, एमबीए, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट यांच्यासह विविध व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांचे प्रमाण वाढीस लागले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये ‘इंडस्ट्री लिंकेज’मध्ये माघारत असल्याचे चित्र आहे.
नागपूर विद्यापीठात काही मोजकी महाविद्यालये सोडली तर बहुतांश ठिकाणी ‘इंडस्ट्री लिंकेज’ नसल्यातच जमा आहे. उद्योगक्षेत्रांच्या अपेक्षा कळत नसल्यामुळे विद्यापीठाने अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. प्रात्यक्षिकांचा दर्जा हवा तसा नसल्याने अनेकदा विद्यार्थ्यांना तर तांत्रिक ज्ञान मिळविण्यासाठी चक्क ‘इंटरनेट’चा आधार घ्यावा लागत आहे.
‘एआयसीटीई’ने (आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) एक वर्षाअगोदर अभियांत्रिकी तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ‘मॉडेल’ अभ्यासक्रम तयार केला होता. मात्र अद्यापपर्यंत विद्यापीठाने यानुसार अभ्यासक्रमात बदल केलेले नाहीत.

१० महाविद्यालये-विभागांचेच ‘लिंकेज’
विद्यापीठाकडून प्राप्त झालेली आकडेवारी तर डोळ्यात अंजन टाकणारी आहे. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये व पदव्युत्तर विभाग मिळून केवळ १० ठिकाणांहूनच विविध उद्योग आस्थापनांशी ‘लिंकेज’ प्रस्थापित करण्यात आले आहे. यात सर्वाधिक संख्या ही ‘फार्मसी’ विभागाची आहे. १६ विविध कंपन्यांसोबतच विभागाचे ‘लिंकेज’ आहे. याशिवाय वनस्पतीशास्त्र विभाग, जैवरसायनशास्त्र विभाग, पर्यटन विभाग, व्यवसाय व्यवस्थापन विभाग, इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक विज्ञान विभाग, राजीव गांधी बायोटेक्नॉलॉजी केंद्र, ‘एलआयटी’, डॉ.बाबासाहेब आंबेडकर इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्ट स्टडीज्, तिरपुडे इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्ट स्टडीज वगळता इतर कुणाचेही ‘इंडस्ट्री’समवेत ‘लिंकेज’ नाही.

‘स्पेशलायझेशन’कडे दुर्लक्षच
मोठ्या शहरांमध्ये अगदी कला, वाणिज्य शाखेतदेखील ‘स्पेशलायझेशन’ उपलब्ध आहे. मात्र नागपूर विद्यापीठाने याकडे दुर्लक्ष केले आहे. देशात अनेक नवनव्या कंपन्या येत आहेत व उद्योगांची सुरुवात होत आहे. त्यांना तज्ज्ञ मनुष्यबळाची आवश्यकता आहे. राज्यातच इतर महाविद्यालयांत किंवा विद्यापीठात मागणीच्या हिशेबाने ‘स्पेशलायझेशन’ असलेले अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. मात्र विद्यापीठाने अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात केवळ ‘सिव्हिल’, ‘मेकॅनिकल’, ‘इलेक्ट्रीकल’, ‘इलेक्ट्रॉनिक्स’, ‘इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड टेलिकम्युनिकेशन’ आणि संगणक विज्ञान यासारख्या शाखांवरच भर दिला आहे. ‘एमबीए’चे क्षेत्र प्रचंड विस्तारत असताना नागपूर विद्यापीठात ‘मार्केटिंग’, ‘फायनान्स’, ‘एचआर’लाच जास्त महत्त्व देण्यात येत आहे. त्यामुळे ‘लिंकेज’मध्ये नागपूर विद्यापीठ माघारत आहे.

मुंबई, पुण्यात जास्त संधी
नागपूरच्या तुलनेत मुंबई व पुण्यामध्ये ‘लिंकेज’वर अधिक भर देण्यात येतो. तेथील विद्यापीठे तसेच स्वायत्त संस्थांचे अभ्यासक्रम कंपन्यांच्या आवश्यकतेनुसार तयार करण्यात येतात. विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच उद्योगक्षेत्राशी जवळून ओळख होते. त्यामुळेच पदवी प्राप्त झाल्यानंतर ‘प्लेसमेन्ट’देखील लवकर मिळते. विदर्भात नेमका याचाच अभाव आहे.

ठोस पावले उचलण्याची गरज
महाविद्यालये व उद्योगांचे ‘लिंकेज’ वाढविण्यावर जास्तीत जास्त भर देण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना येथे नावीन्यपूर्ण पद्धतीने शिकण्याची संधी उपलब्ध होईल तेव्हाच त्यांना मौलिक ज्ञान मिळेल. शिवाय विद्यार्थ्यांची पावले इतर शहरांकडे वळणार नाही, असे मत उद्योजक अजय देशपांडे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांमध्ये नवीन ‘व्हिजन’ निर्माण व्हावे यासाठी महाविद्यालयांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सोबतच देश-विदेशातील विद्यापीठांमधील अभ्यासक्रमांचे अध्ययनदेखील झाले पाहिजे, असे प्रतिपादन ‘बिझनेस ग्रोथ कंसल्टंट’ मिली जुनेजा यांनी केले.

Web Title: Colleges retreating in 'Industry Linkage'; When will the students experience the industry?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.