बॉबी माकन अपहरण आणि हत्याकांड : आणखी एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 10:49 PM2019-05-10T22:49:59+5:302019-05-10T22:51:58+5:30

ट्रान्सपोर्टर भूपेंदरसिंग ऊर्फ बॉबी माकन अपहरण आणि हत्याकांडात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुन्हा एकाला अटक केली. परमजितसिंग ऊर्फ बिट्टू भाटिया असे नवीन आरोपीचे नाव आहे. त्याच्या अटकेमुळे या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची संख्या आता पाच झाली आहे.

Bobby Maken kidnapping and murder: Another accused arrested | बॉबी माकन अपहरण आणि हत्याकांड : आणखी एकाला अटक

बॉबी माकन अपहरण आणि हत्याकांड : आणखी एकाला अटक

Next
ठळक मुद्देआरोपींची पोलीस कोठडी वाढली : कुख्यात मंजित वाडे आणि साथीदार फरारच

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ट्रान्सपोर्टर भूपेंदरसिंग ऊर्फ बॉबी माकन अपहरण आणि हत्याकांडात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुन्हा एकाला अटक केली. परमजितसिंग ऊर्फ बिट्टू भाटिया असे नवीन आरोपीचे नाव आहे. त्याच्या अटकेमुळे या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची संख्या आता पाच झाली आहे. दरम्यान, यापूर्वी अटक करण्यात आलेले आरोपी, कुख्यात गुंड लिटिल सरदार ऊर्फ शैलेंद्रसिंग गुरुचरणसिंग लोहिया (वय ४३, रा. अशोकनगर), त्याचा बॉडीगार्ड सिटू ऊर्फ हरजितसिंग गुरुबचनसिंग गौर (वय २८, रा. बिनाकी मंगळवारी), बाबू ऊर्फ गुरुमितसिंग बचनसिंग खोकर (वय ५६, रा. अशोकनगर, पाचपावली) आणि हनी ऊर्फ मणिंदरसिंग हरजिंदरसिंग चंडोक (वय ४४, रा. नागसेन विद्यालयासमोर, जरीपटका) यांच्या पीसीआरची मुदत संपल्याने, शुक्रवारी पोलिसांनी त्यांना कोर्टात हजर करून त्यांचा पुन्हा सोमवारपर्यंत पीसीआर वाढवून घेतला.
गुरुवारी २५ एप्रिलच्या मध्यरात्री आरोपी लिटिल सरदार, मंजित वाडे आणि साथीदारांनी बॉबी माकन यांचे अपहरण केले होते. त्यांना पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमध्ये बसविल्यानंतर आरोपींनी त्यांची कार बेवारस अवस्थेत त्यांच्या घरापासून काही अंतरावर सोडून दिली. ते रात्रभर आणि दुसºया दिवशीही घरी परत न आल्यामुळे तसेच त्यांचे मोबाईलही बंद असल्यामुळे २६ एप्रिलच्या दुपारी बॉबीच्या पत्नीने जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदविली होती. जरीपटका पोलिसांनी या प्रकरणात मिसिंगची नोंद घेतली. त्यांचा शोध घेतला जात असतानाच २८ एप्रिलला बॉबीचा मृतदेह कोंढाळीजवळ सापडला. त्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. जरीपटका पोलिसांनी अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. अपहरणकर्त्यांचा आणि मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना तब्बल सात दिवस लागले. ज्या इनोव्हातून बॉबीचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती, ती कार गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केली. त्यानंतर कार चालविणारा हनी चंडोक याला गुरुवारी ३ मे रोजी मुंबईत अटक केली. त्याने दिलेल्या कबुलीजबाबावरून पोलिसांनी कुख्यात लिटिल सरदार त्याचा बॉडीगार्ड सिटू गौर, बाबू खोकर यांना शुक्रवारी ४ मे रोजी अटक केली होती. त्यांचा १० मेपर्यंत पीसीआर मिळविण्यात आला होता.
आतापर्यंतच्या तपासात पोलिसांनी आरोपींकडून बॉबीचे मोबाईल जप्त केले. आरोपींनी ते नाल्यात फेकून दिले होते. शुक्रवारी कोर्टात हजर करून पोलिसांनी त्यांचा पुन्हा पीसीआर वाढवून मागितला. फरार असलेल्या आरोपीला अटक करायची आहे, मृत बॉबीचे कडे, पगडी जप्त करायची आहे, असे कोर्टाला सांगून पोलिसांनी सोमवार, १३ मेपर्यंत पीसीआर वाढवून घेतला. दरम्यान, आरोपींना गुन्ह्यासाठी इनोव्हा पुरविणारा बिट्टू भाटिया यालाही गुरुवारी पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यातील आणखी एक मुख्य आरोपी कुख्यात गुंड मंजित वाडे (वय ५५) त्याच्या काही साथीदारांसह फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तो पंजाब, छत्तीसगड किंवा नांदेडमध्ये दडून बसल्याचा संशय आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी पोलिसांना सांगितल्यानुसार मंजित वाडे यानेच बॉबीच्या गळ्यात पट्टा टाकून फास आवळून त्याची हत्या केली. त्यामुळे त्याला अटक करण्यासाठी पोलिसांची पथके शोधाशोध करीत आहेत.
पुरावे नष्ट करण्याचा आरोप
बिट्टू भाटिया याने अपहरण आणि हत्येसारख्या अतिगंभीर गुन्ह्यात वापरण्यासाठी आरोपींना इनोव्हा उपलब्ध करून दिली. सोबतच गुन्हा केल्यानंतर आरोपींनी त्याला कार परत आणून दिल्यानंतर त्याने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्या कारचे सीट कव्हर जाळले. त्यामुळे भाटियाला या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे.
सुपारी गिळली जाणार?
बॉबीने चार ते पाच जणांची कोट्यवधींची मालमत्ता अडवून धरली होती. त्या प्रत्येकाकडून दोन ते अडीच कोटींची सुपारी (बॉबी गेल्यास मालमत्ता मूळ मालकांना मिळेल, असे आमिष दाखवत) घेऊन बॉबीचा काटा काढण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. या सुपारीबाबत आरोपींकडून माहिती काढून घेण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे सुपारी गिळली जाण्याची भीती वर्तविली जात आहे. असे झाल्यास ज्यांनी सुपारी दिली, ते आरोपीसुद्धा या खळबळजनक प्रकरणापासून दूर राहतील.

Web Title: Bobby Maken kidnapping and murder: Another accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.