नागपुरात पोलिसावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 01:22 AM2018-11-27T01:22:25+5:302018-11-27T01:23:16+5:30

जरीपटका पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करून तिघांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. हल्ल्याच्या वेळी आरोपींनी धारदार आरीचा वापर केल्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला जबर दुखापत झाली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महेंद्रनगरातील बँक आॅफ बडोदाच्या बाजूला असलेल्या भारत पेट्रोल पंपावर आज सकाळी ७ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Attack on policeman in Nagpur | नागपुरात पोलिसावर प्राणघातक हल्ला

नागपुरात पोलिसावर प्राणघातक हल्ला

Next
ठळक मुद्देमारहाण करून आरीने हातावर वार : जरीपटक्यातील पेट्रोल पंपावर थरार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जरीपटका पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करून तिघांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. हल्ल्याच्या वेळी आरोपींनी धारदार आरीचा वापर केल्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला जबर दुखापत झाली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महेंद्रनगरातील बँक आॅफ बडोदाच्या बाजूला असलेल्या भारत पेट्रोल पंपावर आज सकाळी ७ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
जरीपटका ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी पद्माकर उके आज सकाळी त्यांच्या भाच्याला परीक्षा केंद्रावर नेऊन सोडण्यासाठी जात होते. पेट्रोल भरण्यासाठी ते महेंद्रनगरातील पेट्रोल पंपावर थांबले. तेथे वाहनधारकांची मोठी रांग होती. तेवढ्यात अचानक मागून दुचाकीवर दोघे जण आले आणि त्यांनी रांगेत न लागता सरळ पंपावरील कर्मचाऱ्याजवळ दुचाकी लावली. त्यामुळे रांगेत उभे असलेल्या वाहनधारकांनी त्यांना विरोध केला. यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. ते पाहून पोलीस शिपाई उके यांनी आरोपींना मागे रांगेत उभे राहण्यास बजावले. आरोपींनी त्यांच्याशीही वाद घातला. त्यानंतर मोबाईलवरून फोन करून आपल्या एका साथीदाराला बोलविले. काही वेळेतच तिसरा आरोपी तेथे पोहचला. तोपर्यंत आरोपींसोबत उके यांची बाचाबाची सुरू होती. तिसरा आरोपी तेथे पोहचताच तिघांनीही उके यांना खाली पाडून जबर मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्यांच्यावर धारदार आरीने हल्ला चढवला. बचावाचा पवित्रा घेतल्याने उके यांच्या हाताच्या कोपराला आरी लागली. त्यामुळे रक्ताची चिरकांडी उडाली. ते पाहून अन्य काही जण मदतीला धावले. या घटनेनंतर पेट्रोल पंपावर एकच खळबळ उडाली. जखमी उकेंनी जरीपटका पोलीस ठाण्यात माहिती कळवून मदत मागितली. पोलिसांचे वाहन तेथे पोहचण्यापूर्वीच आरोपी पसार झाले होते.
यवतमाळ जिल्ह्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला चढवून गुन्हेगाराने त्याची हत्या केल्याचे वृत्त सोमवारी सकाळी पोलीस दलात खळबळ उडवून देणारे ठरले होते. त्यात नागपुरातही पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याबाबतच्या वृत्ताने भर पडली. दरम्यान, जखमी उकेंवर उपचार करून घेतल्यानंतर जरीपटका ठाण्यात त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली. त्यानुसार, पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला.
विशेष म्हणजे, सरकारी कर्मचाऱ्यांवर खास करून, पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्यास आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळा केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात येतो. उके यांची आज साप्ताहिक सुटी होती. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींविरुद्ध पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे कलम ३५३ लावले नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.
पंपावर सीसीटीव्हीच नाहीत
आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पेट्रोल पंपावर जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे प्रयत्न केले. मात्र, पंपावर सीसीटीव्ही कॅमेरेच नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे दिवसभर ढुंडो ढुंडो रे साजना सुरू होते. रात्री ८ च्या सुमारास विक्की नामक एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून अन्य दोन आरोपींची नावे मिळवून पोलीस त्यांना अटक करण्यासाठी धावपळ करीत होते.

 

Web Title: Attack on policeman in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.