Attack on petrol pump and ransom recovery in Nagpur | नागपुरात पेट्रोल पंपावर हल्ला करून हप्ता वसुली 
नागपुरात पेट्रोल पंपावर हल्ला करून हप्ता वसुली 

ठळक मुद्देमेडिकल चौकात दिवसाढवळ्या घटना : सहकाऱ्यांसह तडीपार अटकेत

 लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इमामवाडा येथील कुख्यात तडीपार गुंड आशिष फ्लैक्स ऊर्फ आशिष अन्ना याने दिवसाढवळ्या मेडिकल चौकातील पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकाला मारहाण करून हप्तावसुली केली आहे. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी हप्तावसुली तसेच हल्ला करण्याचा गुन्हा दाखल करून आशिषसह दोन आरोपींना अटक केली आहे.
आशिष याच्याविरोधात यापूर्वीही हत्या, हत्येचा प्रयत्न, हप्तावसुलीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. इमामवाडा परिसरात त्याची दहशत आहे. यामुळे आठ महिन्यांपूर्वी त्याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. त्यानंतरही तो शहरातच फिरत होता. ११ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता कार क्रमांक एम.एच./१२/ए.एफ./३३६० ने आशिष मेडिकल चौकातील इंडियन आॅयलच्या पेट्रोल पंपावर आला. त्याच्यासोबत तीन साथीदार होते. त्यांनी कारमध्ये १४०० रुपयांचे डिझेल टाकले. पंपावरील कर्मचारी सचिन नंदनकरने आशिषला डिझेलचे पैसे मागितले असता त्याने सहकाºयांसोबत सचिनला मारहाण केली. जीवे मारण्याची धमकीही दिली. दुपारची वेळ असल्यामुळे पंपावर गर्दी होती. मारहाण पाहून ग्राहकही घाबरले. पंपावरील व्यवस्थापक विनय कडंबे यांनी आरोपींना समजविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यालाही मारहाण केली. पुन्हा पैसे मागितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे पंपावरील कर्मचारी दहशतीत आहेत. ते आशिषला ओळखत होते, पण तक्रार केली तर प्रकरण वाढेल म्हणून ते शांत बसले. ही घटना इमामवाडा पोलिसांना माहिती झाली. त्यांनी व्यवस्थापकाशी संपर्क साधला व आरोपींवर कारवाई करण्याचा विश्वास दिला. त्यानंतर कडंबे यांनी तक्रार दाखल केली. मंगळवारी रात्री आशिष व त्याच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली.
मेडिकल चौक बनला गुंडांचा अड्डा
 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आशिष तडीपार झाल्यानंतरही परिसरात फिरायचा. तो परिसरातील व्यापाऱ्यांकडून हप्तावसुली करतो. मेडिकल चौकातील बहुतांश व्यापारी या हप्तावसुलीने त्रस्त आहेत. काहीवेळा तर रुणांच्या नातेवाईकांनाही याचा फटका बसला. मात्र, तक्रार केली तर जीवाचे बरे वाईट होईल या भीतीने ते चूप बसतात. त्यामुळेच या घटनेत तक्रार दाखल करून घेण्यासाठी पोलिसांना पुढाकार घ्यावा लागला.
घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
 हप्तावसुलीची ही घटना पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. आता पोलीस या पुराव्याच्या आधारावर आशिषच्या विरोधात कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. झोन ४ चे उपायुक्त नीलेश भरणे यांनी नागरिकांना अवैध धंदे किंवा गुन्हेगारांशी संबंधित कुठलीही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.


Web Title: Attack on petrol pump and ransom recovery in Nagpur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.