कळमन्यात १५ वर्षीय बालिकेचा बालविवाह रोखला; बालविवाह पोलीस व जिल्हा बाल संरक्षण कक्षातर्फे कारवाई

By मंगेश व्यवहारे | Published: April 4, 2024 05:38 PM2024-04-04T17:38:04+5:302024-04-04T17:40:26+5:30

वरात पोहचली होती लग्नमंडपात , कायद्याचा धाक दाखविताच मंडळींची उडाली भंबेरी.

a 15 years old girl rescued before marriage action by child marriage police and district child protection unit in nagpur | कळमन्यात १५ वर्षीय बालिकेचा बालविवाह रोखला; बालविवाह पोलीस व जिल्हा बाल संरक्षण कक्षातर्फे कारवाई

कळमन्यात १५ वर्षीय बालिकेचा बालविवाह रोखला; बालविवाह पोलीस व जिल्हा बाल संरक्षण कक्षातर्फे कारवाई

मंगेश व्यवहारे ,नागपूर : कळमना भागातील विजयनगर भागात १५ वर्षीय बालिकेचा होणारा बालविवाह पोलीस व जिल्हा बाल संरक्षण कक्षातर्फे कारवाई करून रोखण्यात आला.

यासंदर्भात चाईल्ड लाईनच्या हेल्पलाईनवर विजयनगर भागात एका बालिकेचा बालविवाह होणार असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने बाल संरक्षण पथक पोलीसांच्या सहकार्याने लग्नाच्या मंडपात दाखल झाले. छत्तीसगड येथील राजनांदगाव येथून मुलाची वरात लग्नमंडपात दाखल झाली होती. लग्नाची संपूर्ण तयारी झालेली असताना पथकाने धाड टाकून मुलीच्या आईवडीलांकडे मुलीचे कागदपत्र व वयाचा दाखला मागितला. परंतु घरच्यांनी कुठलाच पुरावा दिला नसल्याने, बाल संरक्षणाचे पथक ती ज्या शाळेत शिक्षण घेत होती, त्या शाळेतून वयाचा दाखला घेतला असता बालिका १५ वर्ष वयाचीच निघाली. त्यामुळे बाल संरक्षण पथक व पोलीसांनी बालिकेच्या आईवडीलांना बाल विवाह प्रतिबंधक कायदा २००६ अन्वये लग्न झाल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा दम दिल्यानंतर लग्नात उपस्थित मंडळींची भंबेरी उडाली.

पोलीसांकडून मुलांकडच्यांनाही कायद्याची माहिती देताच वर मंडळींनीही परतीचा मार्ग धरला. मुलीच्या आईवडीलांकडून कायद्यान्वये हमीपत्र लिहून घेत, बालिकेला पोलीसांद्वारे काळजी व संरक्षणासाठी बालगृहात दाखल करण्यात आले.

ही कारवाई जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी भारती मानकर व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांच्या मार्गदर्शनात बाल संरक्षण अधिकारी साधना ठोंबरे, मिनाक्षी धडाडे, अंगणवाडी सेविका कल्पना नागपूरे आदींकडून करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांनी काढले परिपत्रक-

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कोणीही बालविवाह लावल्यास मंडप डेकोरेशन, भटजी, पंड़ीत, मौलवी, आचारी, नातेवाईक, मध्यस्थी, प्रिंटींग प्रेस यांच्यावर कार्यवाही होणार असल्याचे परिपत्रक काढले.

Web Title: a 15 years old girl rescued before marriage action by child marriage police and district child protection unit in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.