विदर्भातील १९.३९ लाख शेतकरी मदतीसाठी पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 12:00 IST2018-02-05T11:57:37+5:302018-02-05T12:00:16+5:30
राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे २ हेक्टरपर्यंतच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. त्यासाठी विदर्भातल्या ११ जिल्ह्यातील १९ लाख ३९ हजार ७६२ शेतकरी पात्र ठरले आहेत.

विदर्भातील १९.३९ लाख शेतकरी मदतीसाठी पात्र
मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : यावर्षी पावसाची कमतरता आणि ढगाळ वातावरणामुळे कापूस आणि धानवर आलेल्या रोगराईने विदर्भातील कापूस व धान उत्पादकांना मोठा फटका बसला. राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे २ हेक्टरपर्यंतच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. त्यासाठी विदर्भातल्या ११ जिल्ह्यातील १९ लाख ३९ हजार ७६२ शेतकरी पात्र ठरले आहेत. शासकीय निकषाप्रमाणे त्यांना १३६२ कोटी १० लाख रुपयांची मदत मिळणार आहे. मात्र त्यावर मंत्रालयातून अद्याप अंतिम निर्णय होऊन मदतनिधी देण्यात आलेला नाही.
राज्य शासनाच्या जीआरनुसार ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान असणाऱ्या शेतकऱ्यांना जिरायती शेतीसाठी हेक्टरी ६८०० रुपये (केवळ २ हेक्टरसाठी) तर बागायती शेतीसाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये (केवळ २ हेक्टरसाठी) अशी मदत मिळणार आहे. त्यामुळे मदतीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना प्रतिशेतकरी किमान ६८०० ते जास्तीत जास्त २७ हजार एवढी मदत मिळणार आहे. ७ डिसेंबरला राज्य शासनाने काढलेल्या आदेशानुसार कापूस व धानपिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले.
त्यात नागपूर विभागातील ६ जिल्ह्यातील ९ लाख ३८ हजार ११५ शेतकरी मदतीपासून पात्र ठरले आहेत. त्यांना ८१७ कोटी ३ लाख ७९ हजार रुपयांची मदत मिळणार आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात १० लाख १ हजार ६४७ शेतकरी शासकीय मदतीसाठी पात्र ठरले असून त्यांना ५४५ कोटी ७ लाख रुपयांची मदत मिळणार आहे.
प्रत्यक्ष मदतीसाठी निधीच नाही
प्रशासकीय यंत्रणेने शेतीचे सर्व्हेक्षण करून मदतीसाठी पात्र ठरलेले शेतकरी व त्यांच्या संभाव्य मदतीचा आकडा शासनाकडे पाठविला आहे. मात्र ही मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार हे गुलदस्त्यात आहे. कर्जमाफीमुळे मेटाकुटीत आलेल्या सरकारला ही मदत देताना आणखी तिजोरी रिकामी करावी लागणार आहे. त्यामुळे या मदतीसाठी शेतकऱ्यांना काही महिने तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कापूस उत्पादकांची संख्या तिप्पट
पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात धानाचे उत्पादन घेतले जात नाही. मात्र पूर्व विदर्भात वर्धा वगळता इतर पाच जिल्ह्यात धानासोबत कापसाचेही उत्पादन घेतले जाते. नुकसानभरपाईसाठी केवळ धान उत्पादन घेणारे ५ लाख २३ हजार २१० शेतकरी पात्र झाले आहेत. त्यांना २२७ कोटी ४६ लाख रुपयांची मदत मिळणार आहे. त्यांच्या तुलनेत मदतीसाठी पात्र ठरलेले कापूस उत्पादक शेतकरी १४ लाख १६ हजार ५५२ आहेत. त्यांना ११३४ कोटी ६४ लाख रुपयांची मदत मिळेल.