जब आँधी चलती है...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2018 08:52 AM2018-05-13T08:52:04+5:302018-05-13T08:52:04+5:30

उत्तर भारतातली - त्यातही दिल्लीची हवा निष्ठुरच ! सगळं काही नीट सुरळीत सुरू असताना अचानकच झरझर वातावरणाचे रंग बदलायला लागतात. करड्या, काळपट, तपकिरी रंगछटा एकमेकांत मिसळतात आणि मग गरागरा फिरणारा वारा अंगावर धावत येतो. पोटात सगळा कचरा उचलून गरागरा फिरणारे धुळीचे भीषण भोवरे, गदागदा हलणारी दारं, वाजणाऱ्या खिडक्या, बंद दारं धडाधडा उघडून थेट घरात घुसून क्रूर हल्ला चढवणारा धुळीचा लोळ, भांडी पडण्याचे - काचा तडकण्याचे - दारं आपटण्याचे आवाज, श्वास घेताना नाका-तोंडात जाणवणारी धुळीची चरचर.. हेच ते धुळीचं वादळ !

When the storm rages ... | जब आँधी चलती है...

जब आँधी चलती है...

Next

उत्तर भारतातल्या धुळीच्या वादळांचा तडाखा अनुभवताना...

- अमृता कदम


ही इतकी धूळ का उठते?
केवळ दिल्लीच नाही तर उत्तर भारतावर घोंघावणाऱ्या धुळीच्या वादळाने सरत्या आठवड्यात शंभरहून अधिक जणांचा बळी घेतला. महाराष्ट्रात किंबहुना दक्षिण भारतात अशा प्रकारची डस्टस्टॉर्म किंवा धुळीची वादळं पहायला मिळत नाहीत. उत्तर भारतात उष्णतेचं प्रमाण तुलनेने अधिक आहे. मे महिन्यात तर या पट्ट्यांत उष्णतेची लाट पहायला मिळते. अशा वातावरणात जर आर्द्रता वाढली तर विजेच्या गडगडाटासह पाऊस पडतो आणि कोरडेपणा वाढला तर धुळीचं वादळ येतं.
यावेळी बंगालच्या उपसागरातील आर्द्र वारे हिमाचल प्रदेशमध्ये पोहोचले. त्याच्या जोडीला पश्चिमी प्रक्षोभही होता. हवामानाच्या दोन भिन्न प्रवाहांमुळे उत्तर भारतातील वातावरण अस्थिर झालं त्याचाच परिणाम वादळांमध्ये झाला, अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिली.

धूळ, वारा.. आणि जीवघेणी वीज
उत्तर भारताला एरवीही वादळं काही नवीन नाहीत. मग दोन मे रोजी झालेल्या वादळाने एवढी मनुष्यहानी कशी काय झाली? वादळामध्ये इजा पोहचविणारा घटक असतो वीज. अगदी आकडेवारीमध्येच बोलायचं तर जून २०१६मध्ये वीज पडून तीनशे जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. २०१४मध्ये हा आकडा होता २५८२ आणि २०१५मध्ये २६४१. ही आकडेवारी नॅशनल क्र ाइम रेकॉर्ड ब्युरोची आहे. दोन मेला उत्तर भारतात जे वादळ आलं, त्यामध्येही वीज पडून मृत्यू झाल्याच्या घटनाच अधिक होत्या. हे वादळ एकाचवेळी मोठ्या पट्ट्यामध्ये आल्याने हा आकडा वाढला. वीज थेट माणसांवर कोसळण्याच्या घटना कमीच घडतात; पण विजेमुळे भिंत कोसळणं, आग लागणं, झाडं पडणं अशा गोष्टी घडतात ज्यामुळे प्राणहानी होते.


रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करण्यासाठी म्हणून बाहेर पडलो. खरं तर दोन दिवसांपासून दिल्ली आणि उत्तर भारतावर घोंघावणाऱ्या धुळीच्या वादळाच्या बातम्या सुरू होत्या. पाच - सहा दिवसांपूर्वी, तारखेत सांगायचं तर २ मेला एक जोराचं वादळ येऊनही गेलं होतं. पण हवामान खातं आणि दिल्लीच्या हवेचा लहरीपणा या दोन्हींवर ‘विश्वास’ होता.
रात्री सव्वादहा-साडेदहाचा सुमार... हवा स्थिर होती. खरं तर स्तब्ध ! त्यामुळेच वातावरणातला उष्मा जाणवत होता. आकाशामध्ये लालसर रंगाची छटा उमटली होती. ‘‘असा रंग दिसला की विजा चमकून पाऊस पडतो, असं म्हणतात...’’ - नवरा म्हणाला. पण एकूण आलबेल परिस्थिती पाहता आता काही ते महावादळ वगैरे नाही यायचं असं वाटलं. घरात येऊन दारं बंद करून झोपायची तयारी केली आणि शीळ घातल्यासारखा आवाज घुमायला लागला. सोबतच दारांची थडथड ऐकू यायला लागली. आपण दारं नीट लावली ना हे पहायला बाहेर आलो आणि काय होतंय याचा अंदाज आला. दार उघडलं आणि डोळ्यांसमोर फक्त धुळीचा पडदाच होता. सूं.. सूं..चा एकताल पकडून वारा पिसाटल्यासारखा वाहत होता. दारांना बडवत होता. रात्रीची शांतता कापत जाणारा तो आवाज भीतिदायकही होता. अवघ्या तासाभराचा कार्यक्र म आणि नंतर पुन्हा सारं कसं शांत शांत!
सकाळी उठल्यानंतर बाहेरच्या खोलीत आलेल्या धुळीत पावलं उमटली आणि वादळाने काय पसारा मांडलाय ते जाणवलं. बाहेरही पालापाचोळा, कुणाच्या तरी तारेवरचे उडालेले कपडे भलत्यांच्याच घरासमोर पडलेले, प्लॅस्टिकचा उडून आलेला कचरा असंच अस्ताव्यस्त चित्र होतं.
आकाश मात्र स्वच्छ. रात्री आपण काय आणि किती गोंधळ घालून ठेवलाय याचा विसर पडल्यासारखं...
टीव्हीवर रात्री झालेल्या वादळात कुठे झाडं पडल्याच्या, झोपड्या कोसळल्याच्या, कुठल्या भागाला सर्वांत जास्त फटका बसला याच्या बातम्या सुरू होत्या. ते सगळं पाहून घरून फोन... वादळ असेल तर काळजी घ्या, बाहेर पडू नका वगैरे.
..पण कामाच्या ठिकाणी एवढे लाड नाही चालत.
दिवस सुरू झालाच होता.
वादळामुळे कोणंतही नुकसान होऊ नये, यासाठी सरकारी यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला होता. त्यांनी काय पूर्वतयारी केलीये, त्यांचे इशारे वगैरे बातम्या अशी सगळी धावपळ आॅफिसातही सुरूच होती दिवसभर !
...पण आॅफिसमधून बाहेर पडेपर्यंत वादळ येईल, असं वाटत नव्हतं. अगदी आदल्या दिवशीचा अनुभव गाठीशी असूनही !
मेट्रो स्टेशनला चालत जाताना रस्त्यावरची कमी वर्दळ जाणवत होती. एकतर शाळांना सुट्ट्या होत्या. सात ते नऊच्या दरम्यान वादळ येईल, असा इशारा असल्याने अनेकांनी सातच्या आत घरात परतण्याची सावधगिरी बाळगली होती. मेट्रोची दोन स्टेशन्स गेली. तिसºया स्टेशनला दरवाजा उघडला आणि वाºयाचा जोरदार झोत आतमध्ये आला किंबहुना आदळला.
...म्हणजे वादळवारं सुटलं तर ! घरून फोन... कुठपर्यंत आलीयेस वगैरे चौकशी करणारा. मी मेट्रोत आहे, वगैरे सांगून झाल्यावर लक्षात आलं की, आजूबाजूच्या मुली-बायकांचंही तेच सुरू आहे.
‘पता नहीं, लेकिन पत्ते बहोत जोरसे हिल रहे है’
‘नहीं ममा, हल्की बुंदे है’
- असे संवादाचे तुकडे कानावर पडत होते. रस्त्यावरून धावणाºया गाड्या जास्तच वेगाने घराकडे धावताहेत, असंही मनात येऊन गेलं. मेट्रो स्टेशनपासून घरापर्यंत जाताना रस्त्याच्या दुतर्फा झाडं आहेत. कोणीतरी मानगूट धरून वाकवावं, तशा त्याच्या त्यांच्या फांद्या जोराने हलत होत्या. एखादी फांदी चुकूनमाकून डोक्यात पडली तर अशी धास्ती वाटत होती. नजरेसमोर धुळीने फेर धरला होता. अवघ्या दहा मिनिटांचा पायाखालचा रस्ता. पण तुडवताना चांगलाच त्रास झाला.
उत्तर भारताला क्षणात घेरून टाकणारी ही धुळीची वादळं म्हणजे खरं तर तासाभराचा खेळ. पण तेवढ्या वेळात गोष्टी होत्याच्या नव्हत्या होतात. यावेळेस तेरा राज्यांना वादळाच्या तडाख्याचा इशारा दिल्यामुळे धुळीचं वादळ हा काय प्रकार आहे बुवा, असं कुतूहल दिल्ली आणि उत्तर भारताच्याही बाहेर निर्माण झालं. आपल्याकडे - म्हणजे महाराष्ट्रात - येतात की वळीव पावसाच्या आधी वादळं, वावटळी वगैरे असंही काहींनी ऐकवलं. लहानपणी मे महिन्याच्या शेवटी शेवटी हवा अगदी गदगदलेली असताना, घामानं चिंब होऊन खेळ रंगलेला असायचा. मग तेवढ्यात हवा सुटायची, पाचोळा उडायचा... वादळ आलं असंच वाटायचं तेव्हा. मग वाºयाच्या दिशेकडे पाठ करून उभं रहायचं, डोळ्यांवर हात ठेवून ते गच्च मिटून घ्यायचे आणि मग थोड्या वेळात ते ‘वादळ’ होत्याचं नव्हतं. आणि मग पावसाचे टपोरे थेंब पडायचे, मातीचा सुवास, सोबतीला गारा... उन्हाने कावलेले जीव थंडावून जायचे.
...दिल्लीत हे असं समाधान फार क्वचित मिळालं. गेले दोन उन्हाळे दिल्लीत काढले; पण गोल फिरत नाचत येणाºया वाºयामागोमाग कोसळणाºया पहिल्या पावसाची मजा कधी आली नाही.
दिल्लीत लू येते, आँधी चलती है... असं सगळं ऐकलं होतं. पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं वेगळं.
पहिल्यांदा जेव्हा या अशा वादळाचा अनुभव घेतला तेव्हा वेळ दुपारची होती. म्हणजे अगदी बारा-साडेबाराची. पण आभाळ गच्च भरून आलेलं. करडी, तपकिरी छटा पसरली होती. अशा वातावरणात मन उगीचच अस्वस्थ होत असतं. आता खूप मुसळधार पाऊस कोसळणार असं वाटत होतं. वारं सुटलं. त्याचा वेग वाढायला लागला. दोन इमारतींच्या पलीकडे जमिनीवरच इस्री करण्याचा सगळा जामानिमा पसरून बसलेल्या इस्रीवाल्या काकूंनी (इथे त्यांना ‘धोबन’ म्हणतात.) सगळा सरंजाम आवरायला घेतला. भाजीची एक गाडीही कोपºयावर असायची. त्यांचीही झाकपाक सुरू झाली. एव्हाना वारा फुल फॉर्ममध्ये आला होता. तेवढ्यात वीज कडाडली आणि छातीत धडधडेल एवढ्या वेगाने ढग गडगडले. त्याबरोबर बाल्कनीच्या लोखंडी ग्रिलचाही थडथडाट ऐकायला मिळाला. प्रत्येक वेळेस ढगांच्या आवाजाला पत्रे, दरवाजे खिडक्यांचीही साथ मिळत होती. सोबत पाऊस सुरू झाला. आता पाऊस लवकर थांबणार नाही असं वाटलं; पण एका सरीत काम आटोपलं. त्यानंतर पुन्हा उकाडा आणि मग एसीची हवा !
इथे धुळीच्या वादळांना ‘मम’ म्हटल्याप्रमाणे साथ द्यायला पाऊस येतो खरा; पण त्यामध्ये पहिल्या पावसाचा रोमॅण्टिसिझम वाटावा असं अजिबातच काही नसतं. अर्धा, फारतर तासभर पाऊस येतो. ज्या आवेगाने हा पाऊस कोसळतो, इंदिरा संतांच्याच ओळी आठवतात, ‘नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी’. पावसाच्या धारा अंगावर फटकारे मारल्याप्रमाणे आदळतात. उत्तरेकडून येणाºया थंड वाºयांमुळे पावसात बोचरेपणाही असतो. हौसेने जाऊन भिजण्याची इच्छाच होत नाही. खिडकीत उभं राहून हातच्या अंतरावरूनच पावसाशी सलगी राखली जाते.
दिल्लीत काही महिन्यांपूर्वी आलेल्या पराग फाटक या मित्राने भीषण धुळीच्या आँधीचा पहिल्यांदाच आलेला अनुभव शब्दबद्ध केला, त्याचं शीर्षकच होतं ‘अस्वस्थ संध्याकाळची डायरी’! पोटात सगळा कचरा उचलून गरागरा फिरणारे धुळीचे भीषण भोवरे, गदागदा हलणारी दारं, वाजणाºया खिडक्या, बंद दारं धडाधडा उघडून थेट घरात घुसून हल्ला चढवणारा धुळीचा लोळ, अंगात आलेल्या बाईने हुंकार देत घुमत राहावं तसा घुमणारा क्रूर वारा, भांडी पडण्याचे - काचा तडकण्याचे - दारं आपटण्याचे आवाज-श्वास घेताना नाका-तोंडात जाणवणारी धुळीची चरचर हे सगळं सगळं परागने लिहिलं होतं. काही मिनिटात व्हायरल झालेल्या त्याच्या त्या पोस्टला उत्तर देताना म्हटलं होतं, त्याला रिप्लाय करताना म्हटलं, की थोडं थांब. मे महिन्यात तुझ्या वाट्याला अशा बºयाच अस्वस्थ (की अस्ताव्यस्त) संध्याकाळी येतील. आपल्याकडे जसं ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ वगैरे असतं, तसंच दिल्लीसाठी ही धुळीनं भरलेली वादळं. या आँधीचं सगळ्यांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे ‘वादळापूर्वीची शांतता’! ती खरंच काय, कशी असते हे इथे सदेह अनुभवायला मिळतं. सगळं काही नीट सुरळीत सुरू असताना झरझर वातावरणाचे रंग बदलायला लागतात. करड्या, काळपट, तपकिरी रंगछटा एकमेकांत मिसळतात आणि मग गरागरा फिरे वारा...
लहरीपणा हा इथल्या हवेचाच स्थायिभाव आहे. त्यामुळेच इथल्या राजकीय, सामाजिक वातावरणातही हा गुण पुरेपूर दिसतो.
कदाचित म्हणूनच पूर्णपणे विश्वास टाकून या शहरात सामावून जाता येत नाही. सत्तेचा केंद्रबिंदू असलेल्या या शहरात एक निष्ठुरता आहे. दिल्लीच्या हवेतही ती दिसते. सौम्य असं इथे काहीच नाही. ना थंडी, ना उन्हाळा. अगदी बोटावर मोजण्याइतके दिवस पडणारा पाऊसही. गंमत म्हणजे यातलं दिल्लीचं स्वत:चं काहीच नाही. म्हणजे वीज, पाणी, जमीन यांप्रमाणे हवामानासाठीही दिल्ली शेजारच्याच राज्यांवर अवलंबून. काश्मीर, हिमाचलमध्ये बर्फ पडल्यावर दिल्ली गारठणार आणि राजस्थानमध्ये उष्णतेची लाट आली, की दिल्लीचाही पारा चढणार. इतकं परावलंबी असूनही या हवेचा तोरा शब्दश: धूळ चारणारा आहे. म्हणूनच शिरजोर होऊन वाहणारी ही हवा इथे राहाणाºया माणसांना अगदी कस्पटासमान वागणूक देते.


( लेखिका ‘लोकमत’च्या दिल्ली आवृत्तीमध्ये वार्ताहर आहेत amrita.kadam@lokmat.com)

Web Title: When the storm rages ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.