शिक्षकांच्या बदलीनंतर शाळेला कुलुप लागतं तेव्हा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 03:00 AM2018-07-01T03:00:00+5:302018-07-01T03:00:00+5:30

सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातले धायखिंडी हे गाव! - या गावातल्या शाळेला गावकरी आणि विद्यार्थ्यांनी मिळून कुलूप ठोकले आहे.कारण ? - गावाला प्रिय असलेल्या तिन्ही शिक्षकांची एकाच वेळी झालेली बदली!

When the school is locked after the teacher transfers. | शिक्षकांच्या बदलीनंतर शाळेला कुलुप लागतं तेव्हा..

शिक्षकांच्या बदलीनंतर शाळेला कुलुप लागतं तेव्हा..

Next

 


गोपालकृष्ण मांडवकर

सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील जेमतेम १२१ घरांची वस्ती असलेले धायखिंडी गाव. लोकसंख्याही दीड हजारांच्या आत. शेती आणि मजुरीवर गुजराण करणारे हे गाव तसे सर्वांसाठीच बेदखल! मात्र १५ जूनपासून या गावाची राज्यभर चर्चा सुरू आहे. त्याला कारणही तसेच घडले आहे. गावच्या जिल्हा परिषद शाळेतील सर्वच शिक्षकांची एकाच वेळी बदली झाल्याने ‘आमचे जुनेच शिक्षक आम्हाला द्या’ म्हणत या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेला कुलूप ठोकले आहे. आता शाळा सुरू होऊन जवळपास दोन आठवडे होत असले तरी शाळा कुलपात आणि नव्याने रुजू झालेले शिक्षक मात्र झाडाखाली शाळेबाहेर, असे चित्र या गावात मागील दोन आठवड्यांपासून आहे.

करमाळा या तालुका मुख्यालयापासून साडेतीन किलोमीटर अंतरावरील हे गाव तसे आडवळणाचे. गावात सोयीसुविधा कसल्याच नाहीत. पक्का रस्ता असला तरी एसटीचे दर्शन गावाला दिवसात एकदाच घडते. गावात ना तलाठी कार्यालय, ना ग्रामपंचायतीची इमारत. शासकीय वास्तू म्हणून सांगायला एकमेव जिल्हा परिषदेची शाळा तेवढी आहे. ती सुरू झाली १९५१ मध्ये. सुरुवातीला एकशिक्षकी शाळा आणि दोन वर्ग. पुढे चार वर्ग वाढले, शाळा दोन शिक्षकी झाली. आता या शाळेत वर्ग पाच झाले असले तरी शिक्षक मात्र तीनच आहेत.

काही वर्षांपूर्वी ‘सरकारी’ या बिरुदाला शोभावी अशी या शाळेची अवस्था होती. मात्र मागील पाच वर्षांत शाळेचा कायापालट झाला. मच्छिंद्र तुकाराम बेनोडे, शिवलाल कांतीलाल शिंदे आणि दत्तात्रय सांगळे हे तीन शिक्षक या गावात बदलून आले आणि शाळेचा कायापालट झाला. या तिघांनी शाळेतल्या मुलांना आणि अख्ख्या गावालाच लळा लावला.

 

पाच वर्षांपूर्वी रंग उडालेल्या आणि मोडकळीस आलेल्या या शाळेला या शिक्षकांनी नवसंजीवनी दिली. कष्टकऱ्यांच्या वस्तीतून सात लाख रुपयांची लोकवर्गणी उभारली. गावच्या लोकांनी पदरमोड करून शाळेसाठी पैसे जमवले. दिवसभर शेतावर आणि कामाच्या ठिकाणी काबाडकष्ट केल्यावर रात्रीतून शाळेच्या बांधकामावर विनामोबदला कष्ट केले. शाळेवर स्लॅब टाकला. रंग उडालेल्या भिंतींना रंग दिला.
शाळेच्या परिसरात शिक्षकांनी परसबाग फुलविली. फुलझाडे लावली. आता त्या झाडांची फुलेही विद्यार्थी कुणाला फुकटात तोडू देत नाहीत. रुपयाला एक या भावाने फुले विकतात, आलेला पैसा शाळेच्या फंडात जमा करतात. शाळेपुढे शेवग्याचे झाड आहे. मोसमात झाडाला मोठ्या प्रमाणावर शेंगा येतात. ‘खरी कमाई’ या उपक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थी त्या शेंगा तोडून शाळेपुढे दुकान लावतात, गावकरीही मोठ्या हौसेने शेंगा विकत घेतात. त्याचे पैसे विद्यार्थी शाळेच्या फंडात जमा करतात.
केवळ रंगरंगोटी आणि स्वच्छता एवढ्यापुरते मर्यादित न राहता या शाळेने मागील तीन वर्षांत गुणवत्तेतही नाव कमविले आहे. प्रज्ञाशोध परीक्षेचे नाव यापूर्वी गावाने कधी ऐकले नव्हते. त्याच शाळेतील मुलांना या परीक्षेला बसवून एका विद्यार्थ्याला तालुक्यातून प्रथम आणण्याएवढी मेहनत या शिक्षकांनी घेतली.
एखाद्या नव्या गावात शिक्षक बदलून गेले की, दिवसभर शाळा आणि सायंकाळी घर अशी बहुतेकांची दिनचर्या असते. मात्र या शिक्षकांनी गावची शाळा केवळ चार भिंतींपुरती मर्यादित न ठेवता गावाच्या उंबरठ्यावर पोहोचविली. सार्वजनिक स्वच्छता, कौटुंबिक स्वच्छता, कुटुंबातील संस्कार एवढेच नाही तर गावातील जोडप्यांची भांडणे मिटवून कुटुंबात एकोपा घडविण्यापर्यंतची कामे या शिक्षकांनी केली. म्हणूनच विद्यार्थ्यांसोबतच गावक-याच्याही मनात या शिक्षकांनी घर निर्माण केले.
अशा या प्रिय शिक्षकांच्या बदलीची माहिती मुलांना कळली, बदलीच्या आदेशानंतर! हे शिक्षक उन्हाळ्याच्या सुट्टीत धायखिंडीत आल्यावर तर अनेक विद्यार्थ्यांना अक्षरश: रडू कोसळले. ‘सर , तुम्ही जाऊ नका’, अशी गळ विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी घातली. मात्र शासकीय आदेशाचा मान राखत हे शिक्षक नव्या गावी आता रुजूही झाले आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळा १५ जूनपासून सुरू झाल्या आहेत. धायखिंडीतील तिन्ही शिक्षक आपल्या बदलीच्या नव्या ठिकाणी रुजू झाले आहेत. त्यांच्या ठिकाणी या गावात नव्याने बदलून आलेले शिवाजी प्रभाकर खरतडे, सविता दत्तात्रय करंडे आणि सुनीता शंकर राशीनकर हे तीन शिक्षक १२ जूनपासूनच शाळेत रुजू झाले. १५ तारखेपासून शाळा सुरू होणार म्हणून पहिल्या दिवसाच्या प्रवेशोत्सवाची तीन दिवस तयारी केली. १५ जूनला सकाळी १० वाजता गावात प्रभातफेरी काढून विद्यार्थ्यांचे स्वागत करायचे ठरले होते. मात्र सकाळी पावणेदहा वाजता गावकरी आणि विद्यार्थी शाळेत आले. या शिक्षकांना शाळेबाहेर जाण्यास सांगितले आणि विद्यार्थ्यांनी पालकांच्या उपस्थितीत शाळेला कुलूप ठोकले. एकाच वेळी तिन्ही शिक्षकांच्या बदलीचा विरोध म्हणून त्या दिवशी ‘गाव बंद, शाळा बंद आणि चूल बंद’ असे अनोखे आंदोलन केले.
‘शिक्षकांच्या बदल्या रद्द झाल्याच पाहिजेत’, ‘शिक्षकांच्या बदलीच्या विरोधात गाव बंद, शाळा बंद आंदोलन’ असे बोर्ड शाळेच्या प्रवेशद्वारावर अडकवून या गावक-यानी आणि विद्यार्थ्यांनी पुकारलेले आंदोलन आजही सुरूच आहे. ‘जुन्या शिक्षकांपैकी एकतरी शिक्षक गावातच ठेवा, अन्यथा शाळा सुरू होऊ देणार नाही. प्रशासनाने बळजबरीने शाळा सुरू केलीच तर आम्ही आमच्या मुलांची नावे या शाळेतून काढून अन्यत्र टाकू’, अशी टोकाची भूमिका गावक-यानी घेतली आहे. यामुळे सध्या पाठ्यपुस्तके घरात, शाळा कुलपात आणि विद्यार्थी मात्र रस्त्यावर, असे चित्र येथे निर्माण झाले आहे.
या गावाला भेट दिली तेव्हा नव्याने बदलून आलेल्या सुनीता राशीनकर आणि सविता करंडे या दोन्ही शिक्षिका शाळेच्या अगदी प्रवेशद्वारापुढे असलेल्या एका छोट्या झाडाच्या सावलीच्या आडोशाने उभ्या होत्या. शिवाजी खरतडे हे शिक्षक तालुक्याच्या पंचायत समितीला अहवाल पोहोचवायला गेले होते.
हे नवे शिक्षक रोज नियमाने बंद शाळेसमोर येतात. गावकरी त्यांची चौकशी करतात, चहापाणीही होते, मात्र शाळा सुरू होऊनही दिवसभर कुलूपबंद शाळेबाहेर बसून राहण्याची गावक-यानी दिलेली शिक्षा मात्र या शिक्षकांसाठी असह्य आहे.
तिनही नवे शिक्षक या गावासाठी नवखे असले तरी अनुभवाने मात्र जुने आहेत. त्यांच्या कामाची ओळख अद्याप गावाला नाही. गावक-यानी आमच्यावर विश्वास ठेवावा, आम्हीही जुन्या शिक्षकांसारखेच काम करून दाखवू, असा विश्वास या शिक्षकांनी व्यक्त केला. मात्र गावकरी आपला हट्ट सोडायला तयार नाहीत.
जिल्हाधिकारी ते मुख्यमंत्र्यापासून तर शिक्षणमंत्र्यापर्यंत गावक-याची निवेदने पोहोचली आहेत. मात्र करमाळ्याचे गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे आणि केंद्रप्रमुख वगळता अद्याप कुण्याही अधिका-याने गावाला भेट दिली नाही, असा गावक-याचा आरोप आहे.
शाळेची पटसंख्या आहे ७३. केवळ या गावचीच नाही तर शेजारच्या चार-पाच किलोमीटरवरच्या भालेवाडी, सेलगाव, करंजा, खापेवाडी, हळगाव, पांडा या गावातूनही १५ ते २० मुले सकाळची एस्टी पकडून धायखिंडीच्या शाळेत शिकायला येतात.
शाळेसमोरच्या झाडाखाली उभ्या असलेल्या शिक्षकांपुढे विश्वराज तोरणे, गणेश शिंदे, कुणाल वाघमारे, सौरभ वाडेकर हे चौथी-पाचवीतील चार-पाच विद्यार्थी खेळत होते. त्या सगळ्यांचे म्हणणे एकचआहे : आम्हाला आमचे जुने शिक्षक परत द्या!
- गावात कुणाशीही बोला : जो तो याच मागणीवर ठाम आहे.
हा लेख लिहून होईपर्यंत (दि. २८) शाळा बंदच आहे. मुले शाळेला जातच नाहीत. शिक्षक दररोज येतात. दिवसभर शाळेपुढे बसून सायंकाळी निघून जातात. पालक शेतावर कामाला जातात आणि गावची शाळा साद घालत असूनही मुले मात्र शाळेविना गावभर हुंदडत असतात.

लेखक ‘लोकमत’च्या सोलापूर आवृत्तीत वरिष्ठ उपसंपादक आहेत.

gopalkrishna.mandaokar@lokmat.com

 

 

 

Web Title: When the school is locked after the teacher transfers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.