‘कोरड्या’ गावांतले स्नेहाचे झरे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 08:29 AM2018-05-06T08:29:56+5:302018-05-06T08:29:56+5:30

पानी फाउण्डेशनच्या ‘वॉटरकप’ स्पर्धेच्या निमित्ताने आपले गाव ‘पाणीदार’ बनवण्याच्या ईर्षेने सगळ्यांनाच झपाटले आहे. लहानापासून मोठ्यांपर्यंत सारे हात झटून आणि एकोप्याने कामाला लागल्याचे अनोखे चित्रही त्यामुळे जागोजागी दिसते आहे.

Water cup foundation 2019 | ‘कोरड्या’ गावांतले स्नेहाचे झरे..

‘कोरड्या’ गावांतले स्नेहाचे झरे..

Next

- वर्षा बाशू
 

नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील उमठा हे गाव यंदा चर्चेत आहे. फासेपारध्यांचे व त्यांनी गाळलेल्या गावठी दारूचे गाव अशी ज्याची आजवर ख्याती होती त्या गावाने स्वकर्तृत्वाने आपली ओळख आता बदलली आहे. पानी फाउण्डेशनचे काम येथे सर्वात जोरात सुरू आहे. आपले गाव ‘पाणीदार’ व्हावे यासाठी गावकरी मनापासून झटताहेत. गावाची प्रतिमा बदलण्याच्या या प्रक्रियेत सारेच हिरिरीने सामील झाले आहेत.
उमठा हे अवघे १८३ उंबऱ्यांचे व जेमतेम आठशे-सव्वाआठशे लोकवस्तीचे गाव. शेती व शेतमजुरीवर चालणारे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शांनुसार आयुष्य जगणारे. घराघरात तुकडोजी महाराजांचा फोटो दर्शनी भागातच लावलेला.
गावकºयांचे कुठल्या एका मुद्द्यावर एकमत होणे, त्यानुसार त्यांना नेमून दिलेली कामे त्यांनी चोखपणे पार पाडणे आणि त्यात सातत्य ठेवणे आणि त्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत मिळत नसताना त्या कामाविषयीचा आदर, जोश, निष्ठा टिकवून धरणे या आजच्या काळात अशक्य कोटीतल्या गोष्टी. उमठा गावात सध्या हे सर्व कोणत्याही वेळेला गेले तरी पाहता येते.
फासेपारध्यांचे सामाजिक भान
गावाबाहेर फासेपारध्यांची वस्ती आहे. पालात राहणारे हे पारधी सध्या गावासोबत श्रमदानात गढून गेले आहेत. रोजचे पोट हातावर असलेली ही मंडळी उपाशी राहू नयेत यासाठी त्यांना रोजगार हमी योजनेनुसार दररोजची मजुरी दिली जाते. सात दिवसांच्या मजुरीपैकी ही पारधी मंडळी फक्त चारच दिवसांची मजुरी घेतात. त्यांचे म्हणणे असे की, उरलेल्या तीन दिवसांत आम्ही आमच्या गावासाठी काम करतो. त्याचे पैसे आम्ही कसे घेणार? आमच्या पोटासाठी आम्हाला चार दिवसांचे पैसे पुरेसे आहेत. फासेपारधी आणि गावकºयांत एरव्ही कमी असलेला संवाद या काळात दृढ झाला आहे. कामाला सुरुवात करण्यापूर्वी सगळेजण तुकडोजी महाराजांचे भजन गातात. दुपारच्या वेळेला सहभोजनात सगळेजण एकाच पंगतीत असतात. यात पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांबरोबर चौथी-पाचवीचे विद्यार्थीही दिसतात.
आधी गावाचे काम, मग लग्न!
बरडपवनी हे उमठा गावापासून १० कि.मी. अंतरावरचे, डोंगरपायथ्याशी असलेले गाव. गावाच्या पाठीशी नोकामातेचा लहानसा डोंगर. या डोंगरावर लहानमोठ्या दगडांना रचून केलेला बांध (एलबीएस) बनवण्याचे काम सुरू आहे. डोंगरावर तरुण मुली व स्रियांची संख्या सर्वात जास्त दिसते. पुरुष वा तरुण मुले तुरळक. या गावातल्या सात महाविद्यालयीन मुलींनी एकदा चोवीस तास सलग काम करून १२ शोषखड्डे तयार केले. असं सलग काम का करावंसं वाटलं, या प्रश्नाला उत्तर देताना भाग्यश्री टापरे ही तरुणी सांगते, आम्ही ते ठरवलंच होतं. कारण हे काम संपल्यानंतर आम्हाला दुसºया कामाला भिडायचं होतं.
या तरुणी झपाटल्यागत कामे करत आहेत. त्यांच्यापैकी एकदोघींना लग्नासाठी पहायला मुलगा येणार होता. तेव्हा, आधी गावाचं काम पुरं होऊ देत... मग येऊ दे मुलगा पहायला.. असं त्यावरचं त्यांचं स्पष्ट उत्तर होतं. या मुलींना आपले भविष्य तर घडवायचे आहेच; पण गावाच्या भल्याचीही त्यांना चिंता आहे.


नोकरीवर पाणी
बरडपवनीच्याच सचिन धोटे या युवकाला एका सहकारी बँकेत नोकरी मिळाली होती. काही दिवस नोकरी केल्यानंतर पानी फाउण्डेशनचे काम सुरू झाले. त्याला या कामाने असे झपाटले की त्याने बँकेत जाणेच सोडून दिले. तो सदैव या कामावरच असतो. बँकेतून त्याला बरेचदा विचारणा झाली. पण तो पठ्ठा जायला तयार नाही. आधी हे काम संपू दे, मग जातो बँकेत असे त्याचे त्यावरचे उत्तर.

घरातच खणला शोषखड्डा
घरातले सांडपाणी साठवायचे व त्यातील गाळ खाली बसेल व वरचे पाणी पुन्हा जमिनीत झिरपेल यासाठी शोषखड्डे बनवले जात आहेत. बरडपवनीच्या यादवराव उईके यांच्या घरात शोषखड्डा बनवायला मोकळी जागाच सापडली नाही तेव्हा त्यांनी धान्य ठेवायच्या खोलीतील सर्व सामान बाहेर काढले व स्वत: अहोरात्र खणून तिथे शोषखड्डा बनवला. अख्खं गाव ज्या कामाला लागलं आहे त्यात आपलाही प्रत्यक्ष सहभाग असावा याची विलक्षण आच मनाला लागल्याने आपण हे केल्याचं यादवराव सांगतात.

श्रमदानाचा चित्रपट
खैरगाव या गावातील एक हरहुन्नरी तरुण मयूर कोरडे. गावकºयांनी दिवसभरात केलेल्या कामाचे चित्रीकरण करून ते रात्री शाळेच्या पटांगणात एका मोठ्या प्रोजेक्टरवर दाखवण्याचा उपक्रम या तरुणाने सुरू केला. याचा परिणाम असा की, ते पहायला गाव गोळा तर होऊ लागलेच; पण श्रमदानाच्या कामावरची संख्याही दिवसागणिक वाढत गेली. या तरुणाने आपल्या गाडीला एखाद्या नवरीसारखे सजवले आहे. त्यावर त्याने भोंगा लावला आहे. दुसºया दिवशी काय काम करायचे हे तो गाडीत फिरून भोंग्याद्वारे गावकºयांना तो कळवतो. या परिसरात त्याची गाडी, भोंगा व त्याचा रात्रीचा श्रमदानाचा चित्रपट चर्चेचा विषय ठरले आहेत.

चौथीच्या मुलांची वानरसेना
गायमुख गावातल्या चौथीच्या वर्गातल्या मुलांना श्रमदानाच्या कामात सहभागी व्हायचे होते. पण त्यांचे आईवडील व गावकरी त्यांना घराकडे पिटाळून लावत होते. ही मुले परत परत त्याच ठिकाणी येत होती. अखेरीस गावकºयांनी त्यांच्यासाठी हलकीफुलकी कामे नेमून दिली. पाणी आणून देणे, लहान बाळांची देखभाल करणे, काही वरची मदत लागली तर ती कामे करणे अशी कामे ही मुले भर उन्हात करीत आहेत. आपले गाव, आपले आईवडील एका मोठ्या कामात गुंतले आहेत एवढेच त्यांना सध्या कळत असेल. पण तेही स्वयंप्रेरणेने त्यातला आपला खरीचा वाटा उचलताहेत.

- गावागणिक अशी असंख्य उदाहरणे महाराष्ट्रात सापडतील. गावागावाला कळले आहे की, गाव एकत्र झाले तर काय चमत्कार घडवू शकते ते. राजकारण किंवा धर्मकारणाव्यतिरिक्त गावकारणासाठी एकत्र येता येते आणि एकदिलाने काम केले जाऊ शकते हेही गावाला कळले आहे, आजवर बाळगलेले दुरावे, पूर्वग्रह, अढींचा श्रमदानाच्या घामात पार निचरा होऊन जाताना दिसतो आहे.
जमीन खणता खणता मनाच्या जमिनीतून पाझरलेले हे झरे पाण्याइतकेच आपापल्या गावांना समृद्ध करण्यासाठी झटत असल्याचे चित्र फारच आशादायी आहे..



साथी हाथ बढाना..
पानी फाउण्डेशनच्या वॉटर कप स्पर्धेत यंदा नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्याचाही समावेश करण्यात आला होता. या तालुक्यातील सुमारे ६५ गावांमध्ये पाणी संधारणाचे काम सुरू आहे. यातील उमठा, बरडपवनी, खैरगाव व गायमुख पांढरी या चार गावांमध्ये गेल्यानंतर जाणवलेली प्रमुख बाब ही की, खडकाळ वा शेतजमिनीवर चर खणून, बांध बांधून त्याद्वारे पाणी साठवण्याची प्रक्रिया जेव्हा यशस्वी होईल तेव्हा होईल; पण गावागावात एकजुटीचे सामर्थ्य स्नेहभाव, परोपकार, एकोपा, सामंजस्य व त्यागाचे असंख्य झरे आतापासूनच झरू लागले आहेत.

‘त्यांना’ही समजून घ्या..
१ मे रोजी शहरातील माणसे गावात येणार तर काय काळजी घ्यायची याच्या सूचना पानी फाउण्डेशनने दिल्या होत्या. त्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण होत्या.
* शहरातून येणाºया जलमित्रांची चेष्टा करू नये. ही शहरातील माणसे आहेत. त्यांना जर शारीरिक कष्टाची कामे करता आली नाहीत तर त्यांच्यावर हसू नये.
* कुणाला व्यक्तिगत प्रश्न विचारू नयेत वा आपली व्यक्तिगत माहिती देऊ नये.
* एखादी मित्रमैत्रिणीची जोडी श्रमदानाला आली तर त्यांची चेष्टा करू नये.
* कुणी जर मुलींची छेडछाड करत असेल तर त्याला तात्काळ प्रतिबंध घालावा. मग ती मुलगी गावातील असो वा श्रमदानासाठी बाहेरून आलेली असो.

Web Title: Water cup foundation 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.