विचारांचा गुंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 08:28 AM2018-05-06T08:28:49+5:302018-05-06T08:28:49+5:30

तुम्ही काहीतरी करीत असता. पण अचानक तुम्हाला दुसरंच काहीतरी आठवतं. तुमचं मन भरकटतं. मेंदूतलं डिफॉल्ट मोड नेटवर्क सक्रिय होतं.. का? कशामुळे?

Thinking Gunt | विचारांचा गुंता

विचारांचा गुंता

googlenewsNext

-डॉ. यश वेलणकर


गेल्या पंधरा- वीस वर्षांत मेंदूविज्ञान वेगाने प्रगती करीत आहे. आपण विचार करतो त्यावेळी मेंदूतील कोणते भाग सक्रि य असतात हे समजू लागले आहे. याच तंत्रज्ञानाचा उपयोग डॉक्टर रिचर्ड डॅनिअल करतात. माणूस ध्यानाचे वेगवेगळे प्रकार अनुभवत असताना त्याच्या मेंदूत काय घडत असते याचे संशोधन ते गेली वीस वर्षे करीत आहेत. या संशोधनाची माहिती देणारे पुस्तक ‘सायन्स आॅफ मेडिटेशन’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. भावनिक बुद्धी ही संकल्पना लोकप्रिय करणारे डॉ. गोलमन हे या पुस्तकाचे सहलेखक आहेत. असे संशोधन करीत असतानाच या संशोधकांना मेंदूत विचारांची दोन प्रकारची नेटवर्क आढळून आली आहेत.
ध्यान करणारी व्यक्ती श्वासाच्या स्पर्शावर मन एकाग्र करीत असते त्यावेळी तिच्या मेंदूतील डॉर्सो लॅटरल प्री फ्रंटल कॉर्टेक्स आणि अँटेरिअर सिंग्यूलेट या भागात अधिक सक्रि यता असते. या दोन भागांना व्यवस्थापकीय कार्य करणारे नेटवर्क म्हटले जाते. मन विचारात भरकटते त्यावेळी पोस्टेरीअर सिंग्यूलेट आणि मेडिअल प्री फ्रंटल कॉर्टेक्स सक्रिय होतात. याला डीफॉल्ट मोड नेटवर्क म्हणतात. ठरवलेल्या फोकसपासून मन भरकटले आहे हे ध्यान करणाऱ्या माणसाच्या लक्षात येते त्यावेळी पुन्हा डॉर्सो लॅटरल प्री फ्रंटल कॉर्टेक्स काम करू लागते. म्हणूनच हा भाग अटेन्शन सेंटर आहे असे म्हटले जाते. मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करणाºया, एकाग्रता ध्यान करणाºया माणसाच्या मेंदूत असे सतत होत असते हे रिचर्ड डॅनिअल यांनी दाखवून दिले आहे. या दोन्ही नेटवर्कमध्ये खोखोचा खेळ सतत चालू असतो.
माणसाच्या मेंदूतील प्री फ्रण्टल कॉर्टेक्स हा भाग पृथ्वीतलावरील अन्य सर्व प्राण्यांपेक्षा अधिक विकसित आहे. याला वैचारिक मेंदू असे म्हणता येईल. मेंदूच्या या भागात विचारांशी संबंधित दोन यंत्रणा, दोन व्यवस्था आहेत. त्यातील एक व्यवस्था डिफॉल्ट मोड नेटवर्क आहे आणि दुसरी व्यवस्था एक्झिक्यूटिव्ह फंक्शन म्हणजे व्यवस्थापकीय कार्य करणारी आहे. ही विचारांची दोन्ही नेटवर्क भावना आणि स्मृती यांच्याशीही जोडलेली असतात असे संशोधनात दिसत आहे. आपल्या मेंदूत आता कोणते नेटवर्क काम करते आहे याची सजगता असणे चांगले असते असे आजचे संशोधन सांगते. मनात विचार येत असतात त्यावेळी डिफॉल्ट मोड नेटवर्क सक्रि य असते आणि माणूस ठरवून एखाद्या समस्येवर विचार करीत असतो. त्यावेळी एक्झिक्यूटिव्ह फंक्शन म्हणजे व्यवस्थापकीय कार्य करणारे भाग काम करीत असतात. ओर्बिटो फ्रण्टल कॉर्टेक्स हा भाग या दोन्ही नेटवर्कमध्ये सहभागी असतो. त्यामुळे त्याला या दोन नेटवर्कचा दुवा म्हणता येईल.
मेंदूच्या व्यवस्थापकीय कार्यात अटेन्शन हे महत्त्वाचे कार्य आहे. माणूस गणितातील प्रॉब्लेम सोडवत असतो त्यावेळी तो लक्ष देऊन मुद्दाम विचार करीत असतो. असे करीत असताना मेंदूच्या पुढील भागातील डॉर्सोलॅटरल प्री फ्रण्टल कॉर्टेक्स हा भाग उत्तेजित असतो. हा भाग व्यवस्थापकीय कार्याशी संबंधित नेटवर्कचा महत्त्वाचा अवयव आहे. तुम्ही हा लेख वाचत असताना तुमचे लक्ष या वाचनात असेल त्यावेळी तुमच्या मेंदूतील एक्झिक्यूटिव्ह फंक्शन म्हणजे व्यवस्थापकीय कार्य करणारी व्यवस्था सक्रिय असते. ती व्यवस्था सक्रि य असेल तरच वाचलेल्या मजकुराचा अर्थ समजत असतो. हे वाचत असताना अचानक तुम्हाला क्रि केटची मॅच किंवा टीव्हीवरील मालिका आठवते त्यावेळी तुमच्या मेंदूतील एक्झिक्यूटिव्ह फंक्शन करणारे नेटवर्क काम करणे थांबवते आणि डिफॉल्ट मोड नेटवर्क काम करू लागते. माणूस तंद्रीत असतो, दिवास्वप्नं पाहत असतो किंवा भूतकाळातील आठवणीत रमलेला असतो त्यावेळी त्याच्या मनात विचार येत असतात.. हे विचार बहुधा भूतकाळातील किंवा भविष्याचे असतात. यावेळी मेंदूत डिफॉल्ट मोड नेटवर्कसक्रि य असते. आपलं लक्ष विचलित झाले आहे याची जाणीव होणे हे एक्झिक्यूटिव्ह फंक्शन आहे. सजगता ध्यानाच्या म्हणजेच माइंडफुलनेसच्या सरावात आपण याच भागाला व्यायाम देत असतो. त्यामुळे लक्ष विचलित होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. म्हणून शरीराच्या स्नायूंना जसा व्यायाम द्यायला हवा तसाच मेंदूतील अटेन्शन सेंटरलादेखील व्यायाम देणे आवश्यक आहे. हा व्यायाम म्हणजेच फोकस्ड मेडिटेशन आहे.
आपल्या मनात मी, मला, माझे याविषयी विचार येत असतात त्यावेळी पोस्टेरीअर सिंग्यूलेट हा भाग सर्वाधिक उत्तेजित असतो. हा भाग डिफॉल्ट मोड नेटवर्कमधील आहे. आपण तंद्रीत असताना, दिवास्वप्ने पाहत असताना किंवा स्वत:चे अनुभव आठवत असताना ‘मी’शी निगडित विचार मनात येत असतात. आपल्या मेंदूतील हिप्पोकाम्पस नावाच्या भागात स्मृती साठवलेल्या असतात. माणसाच्या बºयाचशा भावना आणि स्मृती या ‘मी’शीच संबंधित असतात. त्यासाठी या पोस्टेरीअर सिंग्यूलेटचे कार्य खूप महत्त्वाचे असते. हा भाग डिफॉल्ट मोड नेटवर्कमधील महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे आपला सेल्फ टॉक, स्वसंवाद हा स्वत:विषयी अधिक असतो.
तुम्ही पुन्हा तुमचे अटेन्शन, तुमचे लक्ष वाचनात आणले की तुमच्या मेंदूतील एक्झिक्यूटिव्ह फंक्शन पुन्हा सक्रि य होते. स्वत:ला थांबवणे म्हणजेच सेल्फ रेग्युलेशन हे मेंदूचे व्यवस्थापकीय कार्य आहे. आपले भरकटणारे मन थांबवणे हे असेच काम आहे. आपले ध्येय लक्षात घेऊन नियोजन करणे हेदेखील व्यवस्थापकीय कार्य आहे. वर्किंग मेमरी हेही मेंदूचे महत्त्वाचे व्यवस्थापकीय कार्य आहे.
एखादा विद्यार्थी गणिताचा अभ्यास करीत असतो त्यावेळी गणिते सोडवत असताना त्याला काही सूत्रे, काही फॉर्म्युला वापरावा लागतो. समोरील प्रॉब्लेमनुसार योग्य फॉर्म्युला आठवणे हे वर्किंग मेमरी चांगली असेल तर शक्य होते. हिप्पोकंपासमध्ये माणसाच्या सर्व स्मृती साठवलेल्या असतात, सर्व फॉर्म्युले तेथेच असतात. त्यातील योग्य तो फॉर्म्युला आठवणे आणि तो उपयोगात आणणे हे अँटेरिअर सिंग्यूलेट हा प्री फ्रंटल कॉर्टेक्स आणि हिपोकंपास यांना जोडणारा भाग करीत असतो. माइंडफुलनेसचा सराव हा वर्किंग मेमरी विकसित करतो असे अनेक संशोधनांमध्ये दिसून येत आहे.
आपण फोकस्ड अटेन्शनचा सराव करतो, म्हणजे एखादा बिंदू, आवाज किंवा शब्द यावर मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी एक्झिक्यूटिव्ह फंक्शन करणाºया मेंदूतील भागाला सक्रि य करीत असतो. याउलट आपण ओपन अटेन्शन ठेवतो म्हणजे मनात येणारे विचार, भावना तटस्थपणे जाणत असतो त्यावेळी डीफॉल्ट मोड नेटवर्कदेखील काम करीत असते. एखादी नवीन कल्पना सुचण्यासाठी त्याचे काम आवश्यक आहे. त्यामुळेच ओपन अटेन्शनने सर्जनशीलता विकसित होऊ शकते.

(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे अभ्यासक आहेत.)
 

Web Title: Thinking Gunt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य