आकाशाला गवसणी घालणारा

By admin | Published: May 24, 2014 12:57 PM2014-05-24T12:57:17+5:302014-05-24T12:57:17+5:30

गोपाळ बोधे सरांचे ब्रीदवाक्य म्हणजे our country needs documentation. त्यामुळेच एका पक्ष्याच्या नजरेतून देशातील भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक सौंदर्य टिपण्याचे अनोखे काम बोधे सरांनी केले.

The sky is decorating the sky | आकाशाला गवसणी घालणारा

आकाशाला गवसणी घालणारा

Next

- बिभास आमोणकर

गोपाळ बोधे सरांचे ब्रीदवाक्य म्हणजे our country needs documentation. त्यामुळेच एका पक्ष्याच्या नजरेतून देशातील भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक सौंदर्य टिपण्याचे अनोखे काम बोधे सरांनी केले. 

नौदलाच्या सेवेत छायाचित्रकार म्हणून बोधे सर रुजू झाले. त्यांना तिथेच हवाई छायाचित्रणाची संधी मिळाली; मात्र हवाई छायाचित्रणासाठी महत्त्वाच्या असणार्‍या परवानगीसाठी नौदलाच्या सेवेतही असूनही त्यांना ११ वर्षे झगडावे लागले. भारताच्या ८,५00 किलोमीटर किनारपट्टीचे हवाई छायाचित्रण व लडाखचे टोपोग्राफिक डॉक्युमेन्टेशन करणारे ते पहिले छायाचित्रकार ठरले. सन १९९६मध्ये त्यांनी हवाई छायाचित्रणावरील देशातील पहिले प्रदर्शन भरविले. राज्याच्या वन्यजीव बोर्डाचे सदस्य म्हणून त्यांनी अनेक प्रश्नांवर आवाज उठविला. नौदलातील सेवाकाळात त्यांनी नौसैनिकांसाठी नेचर क्लब स्थापन केला. विश्‍व प्रकृती निधी, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडिया आदी संस्थांसाठी त्यांनी कार्यशाळा घेतल्या. फिल्मच्या कॅमेर्‍यापासून छायाचित्रणाला सुरुवात केलेल्या बोधे सरांनी प्रवाहाचा स्वीकार करीतच डिजिटल तंत्रज्ञान स्वीकारले. डिजिटल तंत्रज्ञानाचा, सामग्रीचा अभ्यास करून त्यातही ते निष्णात झाले.
आकाशाएवढी उंची लाभलेल्या ऐतिहासिक कालखंडाचे, शिवकालीन कालखंडाचे साक्षीदार म्हणजे भुईकोट, गडकिल्ले, जलदुर्ग. त्यांचे तेवढेच आकाशाएवढे महत्त्व, वैभव त्यांनी आपल्या छायाचित्रणातून अधोरेखित केले. निसर्ग आणि वन्यजीवनाच्या फोटोग्राफीतही त्यांचे मन रमत होते; पण त्यांनी पूर्ण लक्ष हवाई छायाचित्रणावर केंद्रित केले. हवाई छायाचित्रणाला लोकाश्रय आणि प्रतिष्ठा मिळवून देत असतानाच त्यांनी इन्फ्रारेड आणि पॅनोरमा छायाचित्रणाचीही सुरुवात केली. त्यांचे मरीन ड्राइव्हचे १0 बाय ६२ फुटांचे पॅनोरमा छायाचित्र गाजले.
बोधे सरांनी देशभरातील दीपगृहांचे केलेले छायाचित्रण, त्याविषयीचे पुस्तक विशेष गाजले. मात्र, त्यासाठी बोधे सरांनी या दीपगृहांच्या अक्षांश, रेखांशांपासून प्रत्येक सूक्ष्म गोष्टींचा अभ्यास केला. हेलिकॉप्टर, विमानाच्या दरवाजांचे पॅनल्स उघडून तिथे बसून छायाचित्रण करण्याचे धाडसी तंत्र बोधे सरांनी अवलंबिले. आकाशात गेल्यावर हवेचा वेग, प्रकाशाची दिशा, धूलिकण या बारीकसारीक गोष्टींचा तपशील बोधे सरांकडे असायचा. त्यानुसार ते पायलटलाही बर्‍याच वेळा मार्गदर्शन करीत असत. काही वेळा तर विशिष्ट अँँगल किंवा फ्रेमसाठी हेलिकॉप्टर एका बाजूला झुकवण्याची ऑर्डर बोधे सर अगदी निर्धास्तपणे देत असत. त्यामुळे त्यांनी केलेले देशातील दीपगृहांचे छायाचित्रण हा सर्वोच्च सौंदर्याचा नमुनाच जणू.
भारतात हवाई छायाचित्रणाची मुहूर्तमेढ बोधे सरांनी रोवली. देशातील बहुतांश हवाई छायाचित्रणाचा अमूल्य दस्तऐवज बोधे सरांकडे आहे. हा ठेवा पर्यावरण आणि भौगोलिक कारणांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मात्र, बोधे सरांनी हवाई छायाचित्रण क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले, ही सल त्यांच्या मित्रपरिवारामध्ये कायमच राहील. ६४ कलांमध्ये छायाचित्रण कलेला आजही स्थानही नाही, याची खंतही बोधे सरांना कायमच होती. बोधे सरांनी केलेले दस्तऐवजीकरण प्रशासनाकडेही उपलब्ध नाही; मात्र इतिहासाच्या दृष्टिकोनातून ही देशाची संपत्ती आहे. बोधे सरांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. त्यांनी त्सुनामी झाल्यानंतर चौथ्या दिवशी त्या ठिकाणी जाऊन छायाचित्रण केले होते. त्यामुळे बोधे सरांकडे त्सुनामीपूर्व आणि त्सुनामीनंतरची तेथील छायाचित्रे आहेत. त्सुनामीनंतर त्यांनी केलेल्या छायाचित्रणात एका छायाचित्रात तेथील संपूर्ण एक बेटच गायब आहे. ही भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची बाब असून तिची नोंद फक्त बोधे सरांच्या छायाचित्रणातच आढळते.
मी नशीबवान असल्याने बोधे सरांसारखा अमूल्य सहवास मला लाभला. (शब्दांकन : स्नेहा मोरे)

Web Title: The sky is decorating the sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.