संवेदनशील पुत्र

By Admin | Published: August 2, 2014 02:32 PM2014-08-02T14:32:27+5:302014-08-02T14:32:27+5:30

विख्यात चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक ‘गुरुदत्त’ यांचे द्वितीय चिरंजीव ‘अरुणदत्त’ यांचे नुकतेच निधन झाले. गुरुदत्त यांची कामगिरी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविणार्‍या अरुणदत्त यांच्या कामगिरीचा हा संक्षिप्त मागोवा..

Sensitive son | संवेदनशील पुत्र

संवेदनशील पुत्र

googlenewsNext

 - कृपाशंकर शर्मा 

 
गुरुदत्त यांचं निधन १0 ऑक्टोबर १९६४ रोजी झालं, तेव्हा अरुण ८ वर्षांचा होता. गुरुदत्त यांचा थोरला मुलगा ‘तरुणदत्त’ हा दहा वर्षांचा होता. गुरुदत्त यांची ही दोन्ही मुलं वयात येईपर्यंत ‘गुरुदत्त फिल्म्स’चे बॅनर गुरुदत्त यांचे बंधू ‘आत्माराम’ यांनी सुरू ठेवलं. सन १९८0 ला ‘तरुणदत्त’ आणि ‘अरुणदत्त’ या दोन्ही पुत्रांनी मिळून आपल्या वडिलांच्या चित्रपटांचे ‘कलामूल्य’ आणि ‘सांस्कृतिक मूल्य’ जाणून, दिल्लीमध्ये ‘गुरुदत्त फिल्म्स’चा महोत्सव आयोजित केला. त्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. निष्ठावान रसिकांची गर्दी पाहून अनेक वितरक अचंबित झाले आणि वितरकांनी गुरुदत्त यांचे चित्रपट ‘मॉर्निंग शो’ला जोमात दाखवायला सुरुवात केली. या दरम्यान फ्रेंच समीक्षक हेन्री मिचिलो यांनी मुंबईच्या वास्तव्यात गुरुदत्त यांचा ‘प्यासा’ चित्रपट मॉर्निंग शोला पाहिला. त्यांना थोडेफार हिंदी समजत होते. सबटायटल्स नसतानाही ‘प्यासा’ने ते हेलावून गेले. त्यानंतर त्यांनी गुरुदत्त यांच्या चित्रपटांचा अभ्यास करून फ्रेंच भाषेत एक पुस्तिका लिहिली. या पुस्तिकेमुळे गुरुदत्त यांची युरोपला खर्‍या अर्थाने ओळख झाली. हेन्री मिचिलो यांनी एन.एफ.डी.सी.कडे गुरुदत्त यांच्या फिल्म्सची मागणी केली आणि पॅरीसमध्ये ‘गुरुदत्त फिल्म्स’चा महोत्सव आयोजित केला. त्यानंतर ‘प्यासा’ आणि ‘कागज के फूल’ हे चित्रपट पॅरीसच्या सिनेमागृहांतून व्यवसायिकरीत्या प्रदर्शित करण्यात आले. पाठोपाठ इटली आणि अमेरिकेतही गुरुदत्त यांच्या चित्रपटांचे महोत्सव साजरे केले गेले. अशाप्रकारे गुरुदत्त यांच्या कामगिरीची आंतरराष्ट्रीय पातळीवर योग्य दखल घेतली गेली. या पाठीमागे ‘अरुणदत्त’ आणि ‘तरुणदत्त’ यांचे परिश्रम मोलाचे होते.
गुरुदत्त यांचे बंधू ‘आत्माराम’ यांनी गुरुदत्त फिल्म्सची सर्व सूत्रे ‘तरुणदत्त’ यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर, तरुणदत्त यांनी ‘बिंदीया चमकेगी’ नावाचा चित्रपट निर्माण केला आणि दिग्दर्शितही केला; पण तो फार चालला नाही. नंतर वयाच्या ३४व्या वर्षी ‘तरुणदत्त’ यांचं अकाली निधन झालं. यानंतर गुरुदत्त फिल्म्सची जबाबदारी ‘अरुणदत्त’ यांच्यावर पडली. त्यांनीदेखील ‘खुलेआम’ नावाचा एक चित्रपट निर्माण केला आणि दिग्दर्शितही केला. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडली गेली. देशभरात दंगे उसळले, नेमके त्या आठवड्यातच ‘खुले आम’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे चित्रपट अनेक ठिकाणी नीट प्रदर्शित होऊ शकला नाही आणि नुकसान झालं. 
पुढे ‘अरुणदत्त’ १९९४ मध्ये पुण्यात स्थायिक झाले. पुण्यातील कोंढवा भागात राहू लागले. आपल्या अबोल आणि अंतर्मुख स्वभावामुळे ते लोकांत फार मिसळत नसत. फारसे कार्यक्रमांनाही जात नसत. वडिलांचा वारसा टिकून राहावा; म्हणून त्यांनी पुण्यातील कोरेगाव भागात ‘गुरुदत्त फिल्म्स’ अँक्टिंग अँकॅडमी’ २0११ मध्ये सुरू केली. काही अनुभवी प्राध्यापकांना घेऊन अरुणदत्त स्वत: विद्यार्थ्यांना सिनेमा माध्यमाचे आणि अभिनयाचे धडे देत.
आपल्या वडिलांच्या- गुरुदत्त यांच्या सर्व फिल्म्स पुढच्या पिढय़ांसाठी उत्तम अवस्थेत उपलब्ध व्हाव्यात म्हणून अरुणदत्त यांनी जातीने लक्ष घालून, खर्चिक बाब असतानाही रिलायन्सच्या मदतीने डिजिटलायझेशन करण्याचे काम सुरू केले होते. त्याद्वारे देशाचा महत्त्वपूर्ण सांस्कृतिक ठेवा जपला जाणार होता. आता अर्धवट राहिलेले हे काम कसे पूर्ण होणार, हा प्रश्नच आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईतील चित्रपट नगरीतील एक निर्माते ‘शीतल तलवार’ गुरुदत्त यांच्या जीवनावर चित्रपट करणार होते; परंतु त्या चित्रपटाच्या पटकथेत काही आक्षेपार्ह गोष्टी अरुणदत्त यांना नजरेस आल्या तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये; म्हणून पैशांच्या प्रलोभनांना बळी न पडता, त्या निर्मितीला त्यांनी जोरकस विरोध केला. प्रसंगी कोर्टात आव्हान देण्याची तयारी केली. हे आजच्या काळात लक्षणीयच म्हणावे लागेल.
पाच फूट अकरा इंच उंच असलेले, आपल्या वडिलांप्रमाणे अबोल, मृदुभाषी आणि संवेदनशील असलेले ‘अरुणदत्त’ मी लिहिलेल्या गुरूदत्त यांच्यावरील पुस्तकाच्या प्रकाशनाला उत्साहाने प्रमुख पाहुणे म्हणून आले, तेव्हा उपस्थित असलेल्या असंख्य प्रेक्षकांना, त्यांच्या तेजस्वी चेहर्‍यात प्रत्यक्ष ‘गुरुदत्त’ यांचे दर्शन घेतल्याचा आनंद मिळाला. प्रकाशनानिमित्त केलेल्या आपल्या भाषणात, त्यांनी गुरुदत्त यांच्या अनेक रम्य आठवणी सांगितल्या तसेच त्यांनी निर्माण केलेल्या कलाकृतींचा अभिमानपूर्वक आढावा घेतला. 
आपल्या वडिलांविषयी ते म्हणाले, ‘‘अनेक विरोधाभासाने युक्त असं ज्यांचं व्यक्तिमत्त्व होतं अशा माणसाचं सारांशाने शब्दांत वर्णन करणं खरं अवघड आहे. त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचं आकलन त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तींनाही झालं नाही, किंबहुना माझा आईला ‘गीतादत्त’लाही झालं नाही. ‘प्यासा’ मधील ‘विजय’ आणि ‘कागज के फूल’ मधील ‘सुरेश सिन्हा’ यांच्या मधलं जीवन ते प्रत्यक्षात जगत होते. वास्तवता आणि स्वप्नसृष्टी या दोन बिंदूच्यामध्ये त्यांचं मन कायम दोलायमान होत असे. या वास्तव जगात जरी ते जगत होते, तरी त्यांचं मन मात्र गूढ अशा स्वप्नभूमीत वावरत होतं.
गुरुदत्त यांची कामगिरी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी अरुण दत्त यांनी केलेले प्रयत्न निश्‍चितच स्पृहणीय आहेत. 
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)

Web Title: Sensitive son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.