नाते सुशोभित करायला हवे..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 07:00 AM2019-05-26T07:00:00+5:302019-05-26T07:00:10+5:30

टीव्ही सीरियलप्रमाणे नातलगांमध्येही शह-काटशहचे खेळ दिसून येत आहे. एकूण काय तर मोठं कुटुंब आणि नातीगोती म्हणजे ‘दर्द का रिश्ता’ असतो की काय ? असा नव्या पिढीचा समज होऊन बसला आहे.

Relationships should be decorated.... | नाते सुशोभित करायला हवे..

नाते सुशोभित करायला हवे..

Next

- सत्येंद्र राठी-  
‘एकत्र या, एकत्र राहा, संयुक्त कुटुंबाचे फायदेच आहेत.’ कुटुंब व्यवस्थेची भलामण करणारी अशी वडीलकीची वाक्यं कानावर येत असतातच. पण आजच्या आपल्या राहणीमानामध्ये हे कितपत सयुक्तिक आहे, याबद्दलच खरी साशंकता आहे. सध्या तर संयुक्तच काय तर विभक्त परिवार या  व्यवस्थेची चाकं ही खिळखिळी होऊन निखळण्याच्या मार्गावर आहेत. सगळीकडेच मुक्त, स्वच्छंद राहण्याचा सोस वाढीला लागल्याने कोणताही पाश, कशाचीही मर्यादा, काहीही बंधनं कोणालाही नको आहेत. याचे कारण म्हणजे त्यागावर केंद्रित असलेले भारतीय जीवन स्वार्थकेंद्रित होऊ लागले आहे,  किंबहुना तसे झालेही आहे. संयम आणि त्याग हे शब्द आता विस्मृतीत गेले आहेत. घरातील ज्येष्ठांना सांभाळण्यात ही ढकलाढकल होताना दिसतेय, तिथं अन्य नात्यांच्या बाबतीत न बोललेलं उत्तम! 
जिव्हाळा, लवचिकता, तडजोड, कुटुंबव्यवस्थेची मूळं धरून ठेवणाऱ्या भावना आता नात्यातून हद्दपार होतायत आणि त्यांची जागा चढाओढ, इर्षा, आकस आदींने व्यापली जात आहे. टीव्हीवरच्या सीरियलप्रमाणे नातेवाइकांमध्येही शह-काटशहचे खेळ दिसून येत आहे. नको त्या मंडळींचे हस्तक्षेप व त्यांच्या उफराटे सल्ले नात्यातील अंतर आणि अविश्वास वाढवत असल्याचे निदर्शनास येत आहे. एकूण काय तर मोठं कुटुंब आणि नातीगोती म्हणजे ‘दर्द का रिश्ता’ असतो की काय? अशी समज नव्या पिढीची होऊन बसली आहे.
एका लेखकाने उपरोधिक मांडणी करत देवाधिदेव महादेवाच्या कुटुंबाचा उल्लेख करत ही बाब समजाविण्याचा छान प्रयत्न केलाय तो असा, की गणपतीचे वाहन उंदराला शंकराचा भुकेला नाग खाऊ इच्छितो, तर शंकराच्या नागाला कार्तिकेयचा मोर भक्ष्य करू पाहतो. गजमुख असलेल्या गणेशाला पार्वतीचा वाहन सिंह मारण्यास उद्युक्त आहे तर शंकराच्या ललाटावरील अग्नी त्याच्याच माथ्यावरील चंद्राची असूया धरून आहे. तिकडं जटेत वाहणारी गंगा त्याच अग्नीला शमविण्यास उसळत आहे. एकूणच घरातील सर्व सदस्य खुद  मुख्त्यार, कोणी कोणाला जुमानत नाही, प्रत्येकाची वेगळी चूल.
हे वाचून हसू येणं स्वाभाविक आहे, पण आपल्या सभोवार घराघरांत याहून वेगळी परिस्थिती नाही, हेही प्रांजळपणे कबूल करायला हवे. आजची एकूण समाज मानसिकता बघता एकत्र कुटुंबव्यवस्था आता कालबाह्य ठरत असल्याचे विदारक पण सत्य उभे ठाकले आहे. याला पर्याय म्हणून नात्यातील सर्व नजीकच्या मंडळींनी अंतरावर राहूनही आपसात नीट संपर्क ठेवला तर विभक्त कुटुंबाचा संयुक्तपणा जपला जाऊ शकेल. वेळोवेळी समक्ष वा फोनद्वारे संवाद साधत राहणे, दुखल्या खुपल्यावर मदत व विचारपूस करणे, ठराविक दिवशी एकत्र येणे, नात्यात आर्थिक व्यवहार न आणणे, एकमेकांच्या चहाड्या चुगल्या न करणे, अशी काही पथ्ये पाळली तर आवश्यक तेवढी जवळीक ठेवत नात्यातील सौजन्य जपता येईल, अशा संतुलित व्यवहाराने परस्परांची काळजी घेणे जिकिरीचे व त्रासदायक ठरणार नाही, असे अंतर कधी कधी नात्याला एक वेगळेच सौष्ठव प्रदान करते, मर्यादित असलेला प्रेम, जिव्हाळाही नात्यातील वीण सैल न होण्यास पूरक ठरतो. सख्ख्या, समवयीन भावांतही राहणीमान, जगण्याची पद्धत, जीवनाकडे बघण्याचे दृष्टिकोन यांच्यात मोठे अंतर असल्याने आजच्या परिस्थितीला अनुसरून नात्यांची जपणूक करायला हवी. 
आपल्या कामात केलेली लुडबुड कोणालाही चालत नाही, तसे केल्यास नाती खुंटतात, एका अंतरावर राहून नाते निभावणे हेच आता नात्याच्या यशस्वीपणाचे गमक झाले आहे. जवळीक साधल्याने कटुता निर्माण होत असेल तर फारकत असलेली बरी. दुसºयांनी आपल्यासाठी केलेल्या चांगल्या कामांची जाण तसेच दुसºयांच्या चुकांकडे शक्य तितके दुर्लक्ष केल्याने नात्यांची बूज राखली जाऊ शकेल. गुंतागुंत न होता एकसूत्र राहणे शक्य आहे मात्र, यावर सगळ्यांनीच काम करायला हवे. 
...आपले नातेसंबंध आपणच सुशोभित करायला हवे. पुरेशी मोकळीक आणि अंतर राखत केलेल्या या समांतर प्रवासातच संयुक्तपणाचे सुख सामावलेले आहे .

Web Title: Relationships should be decorated....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे