घराबाहेर

By Admin | Published: January 28, 2017 03:30 PM2017-01-28T15:30:41+5:302017-01-28T15:30:41+5:30

आम्ही दोघंही नागपूरचे. पण लग्नानंतर नवऱ्याच्या बदलीनिमित्त मुंबईला जावं लागलं. आमचं बिऱ्हाड मुंबईत स्थायिक होणार असं वाटत असतानाच पुण्यात बदली! पुण्याची सवय व्हायला लागली तोच एक दिवस नवऱ्यानं सांगितलं, आपल्याला राजधानीत शिफ्ट व्हायचंय. शंभर वर्षांतून एकदा येणाऱ्या ०७/०७/०७ या स्पेशल दिवशी आमच्या परदेश वास्तव्याचा श्रीगणेशा झाला..

Outdoors | घराबाहेर

घराबाहेर

googlenewsNext

 चांदणी चौक ते चायना व्हाया जर्मनी : लेखांक १


- अपर्णा वाईकर

९९ साली लग्न होऊन जेव्हा मी मुंबईला गेले तेव्हा मनातून जरा खट्टू झाले होते. कारण नागपुरातलाच नवरा असूनही नोकरीच्या निमित्ताने तो मुंबईला होता. नागपूरचं आरामशीर जीवन सोडून मुंबईच्या धकाधकीत आपला कसा निभाव लागणार या विचारांनी मी हैराण झाले होते. पण काहीच दिवसांत त्याची सवय झाली. मी बिनधास्तपणे पीक अवरमध्ये अगदी ९:३८ ची लेडीज स्पेशल लोकल घेऊन चचर्गेटला जायला लागले होते.. आणि आमचं बिऱ्हाड मुंबईत स्थायिक होणार असं वाटू लागलं. पण ४-५ वर्षांनीच पुणे नगरीत बदलीचा योग आला!! 
झालं, अस्सल नागपूरकरांना पुणे पचवायला जरा जडच होतं. पुणेकरांचा जाज्वल्य अभिमान आणि नागपुरी बेधडक मुजोरपण यांची भरपूर वेळा जुगलबंदी व्हायची, प्रामुख्याने ‘दुपारी १ ते ४ या दरम्यान दुकान बंद राहील’ यावरून.. पण मजाही यायची. पुण्यातल्या चिमण्या गणपती, खुन्या मारुती, नळ चौक, हडपसर, पिंपळे सौदागर यांसारख्या नावांची सवय व्हायला लागली होती. पुण्यनगरीत आम्ही राहिलो मात्र दोनच वर्षं. त्यानंतर नवऱ्याने एक दिवस डिक्लेअर केलं की आपल्याला आता राजधानीत शिफ्ट व्हायचंय.. 
बाप रे!! पोटात गोळा आला ते ऐकून... महाराष्ट्र सोडून एकदम दिल्ली कशाला? 
महाराष्ट्रात कुठेही जायला हरकत नव्हती माझी, पण दिल्लीला जायला नको वाटत होतं.. भाषेपासून राहणीमानापर्यंत सगळंच बदलणार.. शिवाय सेफ्टी नाही... पुण्यातच नाही का राहू शकत आपण किंवा मुंबईत जाऊयात परत... असे कितीतरी प्रश्न मी विचारले, सल्ले दिले... पण त्यांवर नवऱ्याने एका वाक्यात उत्तर दिलं आणि ते मला १०० टक्के पटलं.
तो म्हणाला, ‘आपण आपलं नागपूर सोडलं, घर सोडलं, त्यानंतर या जगात कुठेही जाऊन राहण्यात काय हरकत आहे? खरं आहे ना?’ तिथून खरी आमच्या प्रवासाची सुरुवात झाली.. दिल्ली हे शहर बऱ्याचदा पाहिलेलं होतं, पण ४-५ दिवसांसाठी जाणं आणि कायम राहण्यासाठी जाणं यात खूप फरक असतो.. तरी नागपूरकर आहोत म्हणून हिंदी भाषेची भीती नव्हती हे त्यातल्या त्यात बरं होतं... तरीसुद्धा दिल्लीतल्या पूर्णत: पंजाबी वातावरणाची सवय व्हायला जरा वेळ लागला.
खरं तर मी दिल्लीतून बाहेर पडायची वाट बघत होते, पण दिल्लीने आम्हाला भरपूर गोष्टी शिकवल्या. घरी आलेल्यांचं भरभरून आदरातिथ्य करायला, कायम मोठा विचार करायला, पंजाबी पदार्थ बनवायला.. अशा कितीतरी वेगळ्या गोष्टी मी शिकले. हिंदीसुद्धा किती वेगळी !! ‘सीताफल’ हे लाल भोपळ्याला म्हणतात आणि ‘छुहारे’ हे खारकेला म्हणतात हे पहिल्यांदाच कळलं... 
गंमत आहे, नाही का!! 
दोन वर्षात दिल्लीत मराठी मंडळ, भगिनी समाज यात ओळख करून वेगवेगळ्या कार्यक्रमात मी भाग घ्यायला लागले होते... आता जरा कुठे मैत्रिणींबरोबर सेटल व्हायला लागले होते, मुलाला कुठल्या एरियाच्या नर्सरी स्कूलला घालायचं यांचे अंदाज घेत होते... आणि मला हळूच, मिस्कीलपणे हसत नवऱ्यानं विचारलं, मुलाला जर्मनीतल्या किंडर गार्टनमध्ये घालायला कसं वाटेल? माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून जास्त न ताणता त्यानं कंपनीने दिलेली बदलीची आॅफर सांगितली... हेड आॅफिसला जाण्याची संधी मिळणं हे खूपच छान आणि एक्साइटिंग होतं... आणि तेही जर्मनीसारख्या सुंदर देशात जायला मिळणार म्हणून मी तर हवेतच तरंगत होते! महाराष्ट्रातून दिल्लीला शिफ्ट होणं हे बाळबोध मराठी संस्कृतीच्या जरा बाहेर नेणारं पहिलं पाऊल होतं, तर जर्मनीत शिफ्ट होणं हे भारतीय संस्कृतीशिवाय इतर देशांची ओळख करून घेण्यास भाग पाडणारं होतं. तिथे नुसता भाषेचाच नाही, तर आचार, विचार, कपडे, खानपान या सगळ्याच गोष्टींचा प्रश्न येणार होता..
या सगळ्या गोष्टींची जाणीव हळूहळू व्हायला लागली. त्यामुळे मी त्या देशाची थोडीफार माहिती काढायला लागले. माझ्या आणि मुलाच्या व्हिसासाठी ३-४ महिने लागणार होते. तोवर मी भाषा शिकायला सुरुवात केली. शेवटी एकदाचा व्हिसा आला आणि जड मनाने सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही विमानात बसलो. परदेशवारीची जरी ती पहिली वेळ नसली, तरी तीन वर्षांच्या वास्तव्यासाठी 'परभाषेच्या परदेशात' जाण्याची मात्र ती पहिलीच वेळ होती. त्यामुळे आनंद, उत्साह, भीती आणि हुरहुर अशा सगळ्यांचं मिश्रण मनात घेऊन फ्रॅँकफर्ट विमानतळावर पहिलं पाऊल टाकलं. तो दिवस आणि ती तारीख माझ्या कायम लक्षात राहील.. ०७/०७/०७ !! 
शंभर वर्षांतून एकदा येणाऱ्या अशा ह्या स्पेशल तारखेला आमच्या परदेश वास्तव्याचा श्रीगणेशा झाला!!
१-२ दिवस जरा घरातल्या विविध उपकरणांची तोंडओळख करण्यात गेले.. डिश वॉशर, व्हॅक्यूम क्लीनर, १०० टक्के क्लॉथ ड्रायर ही उपकरणं माहिती असली तरी स्वत: कधी वापरली नव्हती.. त्यामुळे ते करायला मजा येत होती. सगळ्यात अवघड जर काही असेल तर ते होतं इलेक्ट्रिक कॉईलच्या काचेच्या शेगडीवर पदार्थ न करपवता, न उतू घालवता स्वयंपाक करणं... त्याचा अंदाज यायला जरा वेळ लागला. आयुष्यात कधी स्वयंपाक करताना माझी इतकी त्रेधा उडेल असं वाटलं नव्हतं. खरेदीसाठी घराबाहेर पडल्यावर मला एका गोष्टीची जाणीव झाली की भारतात शिकलेली जर्मन भाषा लिहायला, वाचायला छानच उपयोगी पडतेय, पण बोलताना मात्र त्यांचे उच्चार आणि माझे उच्चार यांच्यात खूपच फरक होता. त्यामुळे सुरुवातीला खूप वेळा खुणा करून बोलणं जास्त सोपं वाटायचं... 
'झुकर' म्हणजे शुगर हे वाचूनही त्याच्या आधी लिहिलेल्या शब्दाचा अर्थ न कळल्यामुळे घरी आणून चहात घातल्यावर सारखा चहा नासायला लागला. तेव्हा लक्षात आलं की ती सायट्रिक अ‍ॅसिड मिसळलेली झुकर होती; जी जॅम, जेली वगैरेंसाठी वापरतात.. 
अशा कितीतरी गमतीदार प्रसंगांमधून शिकत शिकत आम्ही आल्सबाख नावाच्या त्या सुंदर आणि टुमदार गावात सेटल झालो. माझा एक फार मोठा गैरसमज दूर झाला, तो म्हणजे सगळ्याच गोऱ्यांना इंग्रजी भाषा बोलता येते हा. मला आपलं वाटायचं की गोऱ्या रंगांची आणि सोनेरी केसांची सगळीच माणसं इंग्रजी बोलू शकतात, नव्हे तेच बोलतात... पण तसं नाहीये हे मला जर्मनीत राहायला गेल्यामुळे समजलं. आपण एकाच देशातले असूनही एकमेकांपासून किती वेगळे असतो!! आणि त्या वेगळेपणाचा आपण उगाच फार त्रास करून घेतो.. 
अर्थातच हेही मला जर्मनीला पोचल्यावरच लक्षात आलं! एकूणच जर्मनीतल्या वास्तव्यात वेगळं काही समजून घेण्याची, शिकण्याची सुरुवात झाली होती..

(लेखिका शांघायमध्ये वास्तव्याला आहेत.)

aparna.waikar76@gmail.com

Web Title: Outdoors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.