डॉ. सायरस पूनावाला यांचा नोबेल मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 03:00 AM2018-08-12T03:00:00+5:302018-08-12T03:00:00+5:30

भारतीय लसीकरणाचे प्रणेते म्हणून जगविख्यात असणारे डॉ. सायरस पूनावाला यांचे यंदाच्या वर्षी ‘नोबेल पारितोषिका’साठी नामांकन झाले आहे. त्यानिमित्ताने.

Nobel ways of Dr Cyrus Poonawala | डॉ. सायरस पूनावाला यांचा नोबेल मार्ग

डॉ. सायरस पूनावाला यांचा नोबेल मार्ग

googlenewsNext

-अविनाश थोरात 

देशातील पहिल्या दहा लक्ष्मीपुत्रांपैकी एक, मुंबईतील तब्बल 750 कोटी रुपये किमतीच्या घरात राहणारे उद्योजक, अश्वशर्यतीतील देशातील बडे नाव, सिरम इन्स्टिट्यूट या देशातील सर्वात मोठय़ा लस उत्पादन करणा-या कंपनीचे संस्थापक-अध्यक्ष, आलिशान मोटारींचा ताफा बाळगणारे रईस.. यापलीकडे जाऊन डॉ. सायरस पूनावाला यांची ओळख आहे ती त्यांच्या सामाजिक कामाची!
जगविख्यात नोबेल पुरस्कारासाठी त्यांचे नामांकन झाल्यावर डॉ. पूनावाला यांच्या कामाचे वेगळेपण पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

उद्योग व्यवसायातील यशानंतर प्रचंड संपत्ती मिळविल्यावर सामाजिक क्षेत्रासाठी योगदान देणा-या अनेक उद्योजकांची नावे सांगता येतील. पण या सगळ्यापेक्षा डॉ. सायरस पूनावालांचे वेगळेपण असे, की व्यवसाय करतानाही त्यांनी सामाजिक जाणीव सतत जागी ठेवली. 

अगदी त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर ते म्हणाले होते, ‘‘मी एरवी व्यवसायातून प्रचंड पैसे कमावूही शकलो असतो; पण मला ते नको होते. मला समाजासाठी उपयोगी कार्य करायचे होते.’’

सुमारे 30 वर्षांपूर्वीची देशातील आरोग्य स्थिती भयानक होती. गोवरासारख्या विषाणूजन्य रोगासाठी प्रतिबंधक किंवा उपचारक लसी उपलब्ध होत नव्हत्या.  विविध रोगांवरील लसींच्या अभावामुळे भारतासह जगभरातील कोट्यवधी बालकांचा मृत्यू होत असे. या भीषण परिस्थितीवर दुर्दैवाने काहीही उपाय नव्हता.

यावेळी डॉ. पूनावाला यांनी सिरम इन्स्टिट्यूटची स्थापना केली. सिरम इन्स्टिट्यूटने बीसीजी, फ्लूसारख्या आजारावरील जीवनावश्यक लसी तयार करायला सुरुवात केली. आतापर्यंत  वर्षाला तब्बल अडीच कोटी बालकांचे प्राण वाचणे शक्य झाले आहे, ते या इन्स्टिट्यूटच्या कामामुळे !

खरे तर सायरस पूनावाला यांना लस उत्पादनाच्या क्षेत्रात येण्याचे कारणही नव्हते. त्यांच्या कुटुंबांचा अश्वपालनाचा व्यवसाय होता. देशातील मोठय़ा स्टड फार्ममध्ये पूनावाला यांचे स्टडफार्म गणले जाते. पुण्यातील बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली. कुटुंबाच्या व्यवसायात लक्ष घालण्यास सुरुवात केल्यावर त्यांना जाणवले अश्वशर्यती आणि अश्वपालनाच्या व्यवसायाला देशात मर्यादा आहे. त्यामुळे त्यांनी मोटारव्यवसायाचा विचार केला. जग्वारसारख्या स्पोर्ट्स कारच्या क्षेत्रात काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. परंतु, व्यापारी तत्त्वावर या आलिशान मोटारींचे उत्पादन करण्यासाठी फार मोठय़ा भांडवलाची गरज होती. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी मोटार बनविण्याचा उद्योग सुरू करावा, असा विचार त्यांनी केला. या काळात त्यांनी आपल्याकडील घोडे मुंबईतील सरकारी मालकीच्या हाफकिन इन्स्टिट्यूटला दान केले. हाफकीनकडून घोड्यांच्या सिरमपासून लसींचे उत्पादन सुरू होते. 

परंतु, देशातील आरोग्याची एकंदर स्थिती आणि लसीकरणाच्या अभावामुळे होत असलेले मृत्यू पाहून डॉ. पूनावाला व्यथित होत होते. सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात लसी पुरविण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यामुळे 1966 साली लसींचे उत्पादन करण्यासाठी त्यांनी लघुउद्योगाची उभारणी केली. यासाठी आपल्याकडील घोडे विकण्यासाठीही त्यांनी वडिलांना तयार केले. केवळ दोन वर्षांतच त्यांनी धनुर्वात प्रतिबंधक लसीचे उत्पादन सुरू केले. त्यानंतर 1974 मध्ये सिरमने घटसर्प, डांगया खोकला आणि सर्पप्रतिबंधक लस तयार केली. 1989 मध्ये गोवर प्रतिबंधक लसीचे उत्पादन केले. या सगळ्यामुळे सिरम ही देशातील लस उत्पादनातील सर्वात मोठी कंपनी बनली होती.

डॉ. पूनावाला यांनी ही भूमिका केवळ देशापुरती र्मयादित ठेवली नाही. त्याला वैश्विक परिमाण दिले. त्यामुळेच सिरम इन्स्टिट्यूटला जागतिक आरोग्य संघटनेने नामांकन दिले आणि ‘युनिसेफ’च्या माध्यमातून जगातील 100हून अधिक देशांत सिरम इन्स्टिट्यूटकडून लस पुरविली जाऊ लागली.

 लस उत्पादनाच्या क्षेत्रात काम करत असतानाच विविध क्षेत्रांत डॉ. सायरस पूनावाला यांची समाजोपयोगी कामे सुरू असतात. अनेक संस्थांचे ते आर्शयदाते आहेत. विशेष म्हणजे त्यांचे संपूर्ण कुटुंबच सामाजिक बांधिलकी मानणारे आहे. मुलगा आदर पूनावाला यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या फाउण्डेशनच्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशन प्रकल्पांतर्गत ‘पूनावाला क्लीन सिटी’ हा प्रकल्प तब्बल शंभर कोटी रुपये खर्च करून राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले आहे. 

पद्मर्शी किताबासोबतच डॉ. पूनावाला यांना अमेरिकेतील बोस्टन येथील जगविख्यात मॅसेच्युसेट्स विद्यापीठाच्या (बोस्टन) मेडिकल स्कूलतर्फे  ‘ऑनररी डॉक्टर ऑफ ह्युमन लेटर्स या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ‘जगातील सर्वात प्रभावी 7 व्हॅक्सिन अग्रणींपैकी एक’ अशा शब्दात बिल गेट्स यांनी पूनावाला यांची ओळख करून दिली आहे. अश्व शर्यती आणि अश्व उत्पादन क्षेत्रात डॉ. पूनावाला हे टर्फ  ऑॅथॉरिटीज ऑफ इंडियाचे दीर्घकाळ अध्यक्ष होते. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे जगभरातील विविध सेवाभावी संस्थांना आजवर 100 दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक रकमेच्या देणग्या दिल्या गेल्या आहेत.

पण हा तपशील आणि ही आकडेवारी ही डॉ. पूनावाला यांची खरी ओळख नाही. त्यांच्या व्यग्र मनाला सातत्याने झपाटून टाकणारा एकच विचार असतो : कोवळ्या मुलांचे जीव अवेळी खुडणार्‍या आजारांविरुद्ध लढण्यासाठी प्रभावी लसीची शस्त्रे!
ते म्हणतात, ‘सिरम इन्स्टिट्यूटच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासूनच सर्वसामान्यांना परवडणार्‍या दरांत जीवनावश्यक लसी उपलब्ध व्हाव्यात, असा माझा मानस होता.  भारतातील आणि जगातील शेवटच्या बालकापर्यंत आवश्यक त्या लसी पोहोचेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही !’ 

पैशाआधी सेवा
1  सिरम इन्स्टिट्यूटचे वैशिष्ट्य म्हणजे व्यापारी तत्त्वावर कंपनी चालवितानाही डॉ. पूनावाला यांनी कधीही केवळ पैसे कमाविणे हेच ध्येय ठेवले नाही. 

2  डॉ. सायरस पूनावाला याबाबत आपली भूमिका मांडताना नेहमी म्हणतात, ‘‘अनेक लसींवर संशोधन केले. कित्येकांचे पेटंटदेखील मिळवले. परंतु या पेटंटमधून आम्हाला खोर्‍याने पैसा कमवायचा नाही. सर्वसामान्य जनतेला त्या लसी परवडणा-या दरात उपलब्ध करून देण्यासाठी हे पाऊल आम्ही उचलले आहे. मी स्वत: आरोग्याच्या क्षेत्रात पेटंट मिळवण्याच्या विरुद्ध आहे. पण, उद्या परदेशातील कुठल्या व्यापारी कंपनीने हे करून औषधांवर एकाधिकारशाही मिळवू नये आणि सर्वसामान्य लोकांची आर्थिक पिळवणूक करू नये, यासाठी आम्ही हे करतो आहोत.’’ 

(लेखक 'लोकमत'च्या पुणे आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)

avinash.thorat@lokmat.com


 

Web Title: Nobel ways of Dr Cyrus Poonawala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.