पाहुणे निघाले..

By admin | Published: March 14, 2015 06:40 PM2015-03-14T18:40:50+5:302015-03-14T18:40:50+5:30

रस्ता न चुकता, न विसरता पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास कसा करतात? दिशाज्ञान त्यांना कसं होतं? ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या ठिकाणी अचूकपणे ते कसे काय पोहोचतात?

The guests went .. | पाहुणे निघाले..

पाहुणे निघाले..

Next

 

समीर मराठे
 
 
अलीकडे कधी आकाशात पाहिलंत तुम्ही?बर्‍याचदा शेकडोंच्या संख्येनं पक्ष्यांची वरात आपल्या डोक्यावरून जाताना दिसते.
कुठून आले होते हे पाहुणे? कुठे निघाले असतील?.
हिवाळा सुरू झाला की अनेक पक्षी आपलं स्वत:चं वसतिस्थान सोडून अतिदूरच्या प्रवासाला निघतात. सुरक्षित निवारा शोधतात. तिथे काही महिने राहतात. हिवाळा संपायला आला की पुन्हा परतीच्या प्रवासाला लागतात. भारताच्या वेगवेगळ्या भागात पाहुणे आलेले असेच अनेक पक्षी आता परत आपल्या घराकडे निघाले आहेत.
पण आपलं स्वत:चं घर, वसतिस्थान सोडून पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास कसा करतात? या सार्‍या प्रवासात ते आपला रस्ता चुकत, विसरत कसा नाहीत? त्यांना दिशाज्ञान कसं होतं? अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानंही जे जमणार नाही अशी अचूकता पक्षी कशी साधतात? अगदी ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या ठिकाणी, ठरलेल्या वेळी दरवर्षी न चुकता ते कसे काय पोहोचतात?
- सारं काही कमालीचं आश्‍चर्यकारक आणि आपल्या कल्पनेच्याही पलीकडचं. पण या तरंगत्या दूतांनी ते प्रत्यक्षात आणलं आहे. 
खरंच कशी घडते ही ‘जादू’? 
यासंदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरं शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहेत. तरीही काही प्रश्न अजूनही गूढ आहेत आणि अनेक प्रश्नांचं एकच एक, ठाम असं उत्तर देणं केवळ अशक्य आहे. कारण सारेच पक्षी ठरावीक ‘नियम’ पाळतात असं नाही.
खाद्याच्या शोधासाठी, आपला वंश टिकवण्यासाठी सुरक्षित जागी पक्षी स्थलांतर करतात, हे तर खरंच; पण याशिवायही अनेक कारणं आहेत. एकाच जातीचे काही पक्षी स्थलांतर करतात, काही करत नाहीत, काही एका ठिकाणी जातात, तर काही दुसर्‍याच ठिकाणी. काही पक्षी हजारो किलोमीटरचं अंतर कापत एका खंडातून पार दुसर्‍या खंडापर्यंत प्रवास करतात, तर काही पक्षी काहीही झालं तरी शक्यतो आपली जागा न सोडता प्रतिकूलतेवर मात करण्याचा कसोशीनं प्रयत्न करतात. काही पक्षी दक्षिणोत्तर स्थलांतर करतात, तर काही जगभरात कुठेही जातात. काही दिवसा प्रवास करतात, तर काही रात्री. काही पक्षी आपल्या परिसरात मुबलक खाद्य असूनही स्थलांतर करतात, तर काही पक्षी खायला काही नसलं तरी स्थलांतर करीत नाहीत. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, पक्षी ‘स्थलांतर’ करतात हे अगदी १९ व्या शतकापर्यंत मानवाला जवळजवळ ठाऊकच नव्हतं. ‘हिवाळ्यात आपल्याकडचे पक्षी अचानक गायब होतात, तेव्हा ते शीतनिद्रा घेतात’ अशी समजूत अगदी जगभर होती. तंत्रज्ञानाच्या प्रगतीनंतर यातलं तथ्य समोर आलं.
त्यातलीच ही काही तथ्यं!..
 
 
पक्षी स्थलांतर का करतात?
१- खाद्याचा तुटवडा.
२- कमालीचं शीत तपमान.
३- विणीसाठी, वंशवाढीसाठी सुरक्षित प्रदेश.
४- हिमरेषेतील चढउतार. 
५- परिसराचं तपमान आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी.
ैकशी करतात तयारी?
हजारो किलोमीटरचा प्रवास सोबत काहीही न घेता स्वबळावर करायचा तर त्यासाठी तयारी करावीच लागते.
१- ‘इंधनसाठा’ करण्यासाठी प्रवासाच्या काही दिवस आधी पक्षी भरपूर खातात.
२- आपल्या चरबीचा साठा भरपूर प्रमाणात वाढवतात.
३- ही चरबीच इंधनासारखी वापरतात.
४- काही पक्ष्यांचं वजन प्रवासापूर्वी अगदी दुप्पटही झालेलं असतं.
 
 
प्रवास कसा?
१- बहुतांश पक्षी एका दमात लांबचा प्रवास करीत नाहीत.
२- प्रवासादरम्यान वाटेत थांबत थांबत ते आपल्या इच्छित स्थळी जातात.
३- लहान पक्ष्यांच्या शरीरातील अन्नाचा साठा लवकर संपतो. त्यामुळे मधे थांबून ते आपली शिदोरी पुन्हा भरून घेतात आणि परत आपल्या ध्येयाकडे कूच करतात.
४- गिधाडासारखे मोठे, ताकदवान पक्षी मात्र कित्येक तासच नाही, तर काही दिवस अन्नपाण्यावाचून उडू शकतात. टर्की गिधाड तब्बल दहा दिवस काही न खाता-पिता साडेपाच हजार किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास करू शकतं.
 
रात्री निघायचं की दिवसा?
१- ‘पक्ष्यांना रात्री दिसत नसल्यानं ते दिवसा प्रवास करत असावेत’ असा आपला समज, पण प्रवास केव्हा करायचा हे अनेक घटकांवर ठरतं. 
२- पक्ष्यांच्या पंखांतील ताकद, त्यांच्या सवयी, स्वभाव यानुसार लांबचा प्रवास दिवसा करायचा की रात्री हे ठरतं.
३- ताकदवान, चपळ आणि हिंमतवान पक्षी दिवसाच प्रवास करणं पसंत करतात.
४- जे पक्षी लहान, भित्रे, लाजाळू, स्वत:चं संरक्षण करण्यास असर्मथ आहेत, गटाऐवजी एकट्यानं राहतात असे पक्षी रात्रीचा प्रवास पसंत करतात.
 
फ्लेमिंगो
 
 प्रवासादरम्यान ताशी ५७ कि.मी. वेगानं हा पक्षी प्रवास करू शकतो.
 फ्लेमिंगोंचं आयुर्मान साधारणपणे २0 ते ३0 वर्षे आहे, मात्र पाळीव फ्लेमिंगो ८३ वर्षांपर्यंत जगल्याची नोंद आहे.
 फ्लेमिंगोंमधील ‘ग्रेटर फ्लेमिंगों’ची उंची सर्वाधिक म्हणजे तब्बल पाच फुटापर्यंत असते, मात्र त्या तुलनेत त्यांचं वजन केवळ आठ पाऊंड इतकंच असतं. 
 पूर्ण वाढ झालेल्या फ्लेमिंगोंच्या पायाची लांबी ३0 ते ५0 इंच असते, जी त्यांच्या संपूर्ण शरीरापेक्षाही अधिक असते.
 
किती उंचीवरून उड्डाण?
 
१- स्थलांतर करताना पक्षी दहा- बारा हजार मीटर उंचीवरून प्रवास करीत असावेत असं पूर्वी मानलं जायचं. अभ्यासांती हा समज खोटा ठरला आहे.
२- बहुसंख्य पक्षी बर्‍याच खालून म्हणजे ४00 मीटरपेक्षाही कमी उंचीवरून प्रवास करतात. 
३- वारा जर विरुद्ध दिशेने असेल तर पक्षी खूपच खालून उडतात. 
४- काही पक्षी तर समुद्राच्या केवळ काही फूट उंचीवरून उडतात.
५- हिमालयासारख्या उंच पर्वतराजी ओलांडताना मात्र पक्षी सहा-साडेसहा हजार मीटरपेक्षाही अधिक उंची गाठतात. 
 
हळूहळू जायचं की वेगात?
 
बरेच पक्षी उड्डाणादरम्यान थांबत असल्यानं त्यांच्या उड्डाणाचा प्रत्यक्ष वेग मोजणं तसं कठीण आहे. तरीही काही थोड्या अंतरापर्यंतचा त्यांचा वेग सांगता येऊ शकतो.
१- ससाणे- ताशी ६४ ते ७६ किमी.
२- बदक- ताशी ७0 ते ९४ किमी.
३- कबुतर- ताशी ४८ ते ५७ किमी.
४- झाडांवरचे लहान पक्षी- ताशी ३२ ते ५९ किमी.
 
महाराष्ट्रात दरवर्षी येणारे पाहुणे
 
बदके- कॉमन टील, गार्गनी, नॉर्दन पिंनटेल, नॉर्दन शॉव्हलर, कॉमन पोचार्ड, रेड क्रेस्टेड पोचार्ड, टफ्टेड डक
चिखलपायटे (वेडर्स)- युरेशियन वुडकॉक, पिंनटेल स्नाइप, कॉमन स्नाइप, ब्लॅकटेल्ड गॉडविट, कॉमन रेडश्ॉंक, मार्श सॅँडपायपर, कॉमन सॅँडपायपर, ग्रीन सॅँडपायपर, वुड सॅँडपायपर, रफ, पॅसिफिक गोल्डन प्लव्हर, केंटिश प्लव्हर,
शाखारोही (पॅसरिन)- ब्लू थ्रोट  ब्लॅक रेड स्टार्ट, रोझी स्टार्लिंग (भोरड्या), बार्न स्वॅलो, लेसर व्हाइट थ्रोट, व्हाइट वॅगटेल,येलो वॅगटेल, ग्रे वॅगटेल, कॉमन रोझ फिंच, ब्लॅक हेडेड बंटिंग
शिकारी पक्षी- मार्श हॅरिअर, पॅल्लीड, हॅरिअर, मॉँटेग्यु हॅरिअर, स्टेपी इगल, कॉमन केस्ट्रल
 
 पूरक माहिती - डॉ. उमेश करंबेळकर, सातारा

Web Title: The guests went ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.