चित्रभूषण इसाक मुजावर

By Admin | Published: August 2, 2014 02:49 PM2014-08-02T14:49:27+5:302014-08-02T14:49:27+5:30

इसाक मुजावर म्हणजे हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीचा चालता बोलता इतिहासच! सिनेपत्रकारितेला वेगळी प्रतिष्ठा व दर्जा मिळवून देणार्‍या मुजावर यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने ‘चित्रभूषण’ पुरस्कार जाहीर केला. त्या निमित्ताने...

Cinematography Isaac Mujawar | चित्रभूषण इसाक मुजावर

चित्रभूषण इसाक मुजावर

googlenewsNext

- अशोक उजळंबकर 

 
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने या वर्षी आपल्या नेहमीच्या परंपरेला फाटा देत ‘चित्रभूषण’ हा पुरस्कार ज्येष्ठ सिनेपत्रकार इसाक मुजावर यांना दिला. त्यांच्या सोबतच एकेकाळच्या कृष्णधवल चित्रपटांच्या नायिका रेखा कामत यांनादेखील सन्मानित केले. सिनेपत्रकार म्हणून फिल्म इंडिया मासिकाचे संपादक बाबूराव पटेल यांनी १९४0 च्या दरम्यान चित्रपटावर प्रकाश टाकला. त्यांचा बराच दबदबा होता; परंतु मराठी आणि हिंदी चित्रपटांनी खरी गती घेतली ती १९५0-६0 या काळातच. या काळात आलेले चित्रपट पाहिलेली पिढी आज सुवर्णक्षण आठवत दिवस कंठीत आहे. इसाक मुजावर यांचे मामा, भालजी पेंढारकर यांच्याकडे तबलावादक म्हणून काम करीत होते. वडिलांचे निधन झाल्यावर इसाक यांचे शिक्षण मामांकडेच झाले. त्यांची आई शिक्षिका होती. जेमतेम १0 वीपर्यंत शालेय शिक्षण घेतल्यानंतर इसाक यांनी फिल्मी दुनियेत मामासोबत वावरत असतानाच १९४६ ला ‘तारका’ या चित्रपटविषयक मासिकात आपल्या लिखाणाचा श्रीगणेशा केला. 
कोल्हापूर येथे त्या काळी प्रकाशित होणार्‍या ‘लोकशक्ती’मध्ये त्यांनी लिखाण केले. इसाक यांनी त्या काळी मुक्त पत्रकार म्हणून चित्रपटविषयक लिखाण अनेक ठिकाणी केले. गावकरी दैनिकातर्फे १९५८ मध्ये ‘रसरंग’ या साप्ताहिकाची सुरुवात झाली. यामध्ये चित्रपट, रंगभूमी, क्रीडा असा तिहेरी मसाला होता. ९ जानेवारी १९५९ रोजी इसाक मुजावर यांची निवासी संपादक म्हणून तेथे नेमणूक झाली. रसरंग या साप्ताहिकाने अल्पावधीत गती घेतली होती. नाशिक येथूनच ‘रसरंग’चा कारभार चालत असल्यामुळे इसाक मुजावर यांना नाशिक येथेच म्हणजे दादासाहेब फाळके यांच्या गावीच यावे लागले. इसाक यांनी ‘गॉसिप’ पत्रकारिता कधीच केली नाही. फ्लॅशबॅक हे त्यांचे सदर जुन्या कलावंतांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारे होते. त्याच काळात त्यांनी सवाल-जवाब, यादे, हमारी याद आयेगी अशी नवी स्तंभलेखनाची मालिकाच सुरू केली.
हिंदीप्रमाणे मराठी चित्रपटांवर त्यांनी प्रकाश टाकला. मराठी चित्रपटांचे मान्यवर व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर, राजा परांजपे या सर्वांसोबत त्यांचा स्नेह होता. हिंदीमधीलदेखील राज कपूर, देव आनंद, बी. आर. चोप्रा यांच्यासह अनेक कलावंतांसोबत त्यांनी प्रत्यक्ष सेटवर जाऊन त्या काळी लिखाण केले. हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक, नायक, नायिका, संगीतकार, गीतकार, विनोदी कलावंत, खलनायक या सर्वांसोबत त्यांची बातचीत आजही त्यांच्या ध्यानात आहे. 
त्यांच्याशी बोलताना एखाद्या विषयावर त्यांना विचारल्यावर संपूर्ण इतिहास ते आपल्यासमोर ठेवतात. पडद्यावर काय चित्रित झाले आहे, यावर त्यांचा भर असायचा. रुपेरी पडद्यामागे चालत असलेल्या भानगडीवर त्यांनी कधीच प्रकाश टाकला नाही किंवा चटपटीत लिखाण केले नाही.
जुन्या पिढीसोबत नाळ जुळल्यांतर आलेल्या नव्या कलावंतासोबत देखील त्यांनी तशीच मैत्री केली. ‘रसरंग’मध्ये काम करीत असताना त्यांनी केलेल्या लिखाणाच्या मालिका रसिकांनी आवडीने वाचल्या आहेत. १९५९ ते १९७८ या आपल्या २0 वर्षांच्या कालावधीत ‘रसरंग’ला त्यांनी दर्जा मिळवून दिला होता. १९७८ नंतर मात्र त्यांनी ‘रसरंग’चा निरोप घेतला व मुंबईत ‘चित्रानंद’ नावाचे नवे साप्ताहिक सुरू केले. ‘चित्रानंद’चा गाडा त्यांनी १९८७ पर्यंत पेलला. त्यानंतर हे साप्ताहिक बंद झाले. त्यानंतर इसाक मुजावर यांनी ‘माधुरी’, ‘जी’ या साप्ताहिकांत लिखाण केले. ‘चित्रानंद’चे सर्वच दिवाळी अंक वाचनीय असायचे. त्यांची ग्रंथसंपदा ५0 च्या वर गेली आहे. 
चित्रमाऊली, मुखवटा, सप्तरंग, माय नेम इज खान, मा. भगवान, रफीनामा, सिनेमाचे तीन साक्षीदार, मुस्लिम सिनेमा समाज : बुरख्यातला, बुरख्याबाहेरचा या सर्वच पुस्तकांना लोकप्रियता मिळाली. आपल्या प्रवासामधील अनुभवाचे यथार्थ चित्रण त्यांनी या लिखाणात केले आहे. मराठी चित्रपटांचा इतिहासाचा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. सखोल माहिती असलेले हे लिखाण आहे. या लिखाणाला कोठेही मराठी भाषेतील साहित्यिक अलंकार पाहायला मिळत नाहीत, तरीदेखील त्यांची लेखणी लोकप्रिय ठरली.
कलावंतांशी मैत्री करून त्यांच्या अंतरंगाचा ठाव घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हिंदी व मराठी चित्रपट इतिहासाचे ‘भीष्माचार्य’ असे जर त्यांना संबोधले, तर ते चुकीचे ठरणार नाही. १९३१ पासूनचा हिंदी सिनेमा व १९३२ पासून सुरू झालेला मराठी चित्रपटाचा प्रवास त्यांनी अनेक वेळेला वाचकांसमोर ठेवला आहे. या लिखाणात त्यांनी गायक, गायिका, संगीतकार, नायक, नायिका, दिग्दर्शक व चरित्र अभिनेते यांच्यावर लिखाण केले. अशा या भीष्माचार्याची आठवण अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला आली व त्यांनी त्यांचा गौरव केला. चित्रपट पत्रकारितेत चित्रभूषण पुरस्कार मिळवून त्यांनी सिनेपत्रकारितेला उंचीवर नेऊन ठेवले. चित्रपटविषयक लिखाण हे केवळ ‘टाइमपास’ स्वरूपाचे असते, असे विधान त्यांनी खोटे ठरवले. सिनेपत्रकारितेला त्यांनी दर्जा मिळवून दिला आहे. आपल्या पत्रकारितेला व्यावसायिकतेचा स्पर्श त्यांनी होऊ दिला नाही. 
सिनेपत्रकारिता करीत असताना त्यांनी कलावंतांचा लेखाजोखा मांडताना वाचकांशी जवळीक केली व वाचक निर्माण केले. चित्रपटाकरिता आयुष्य खर्ची घालणार्‍या एका पत्रकाराला ‘चित्रभूषण’ या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल चित्रपट महामंडळाच्या सर्वच पदाधिकार्‍यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.  
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)

Web Title: Cinematography Isaac Mujawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.