कलकलाट आणि चिवचिवाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 06:04 AM2019-03-31T06:04:00+5:302019-03-31T06:05:08+5:30

उन्हाळा सुरू झालाय. पक्ष्यांना प्यायला पाणी नाही. मुलं डोकं खाजवायला लागली. काय करायचं? त्यांना एक आयडिया सुचली. आता त्यांच्या गच्चीत पक्षी रोज पाणी प्यायला येतात. चिऊताईनं बाल्कनीत घरटंही बांधलंय..

Children's unique experiment for birds in summer | कलकलाट आणि चिवचिवाट !

कलकलाट आणि चिवचिवाट !

Next
ठळक मुद्देधड ना लहान, धड ना मोठे अशा ‘मधल्या’ मुलांसाठी नवी ‘विण्डो’

- गौरी पटवर्धन

‘‘आई मला एक ताटली दे गं.’’
१० वर्षांच्या अस्मीने खेळून आल्या आल्या मागणी केली.
‘‘ती तिकडे आहे बघ रॅकमध्ये. घे तिथून’’ आईने कोथिंबीर निवडत टीव्ही बघतांना वरसुद्धा न बघता सांगितलं.
पण रॅकमधल्या सगळ्या ताटल्या अस्मीला माहिती होत्या. त्यातली तिला नको होती. त्यामुळे ती म्हणाली, ‘‘त्यातली नकोय, वेगळी दे.’’
अजूनही आई एकीकडे हाताने कोथिंबीर निवडत टीव्ही बघत म्हणाली, ‘‘वेगळी म्हणजे काय? आपल्याकडे ज्या ताटल्या आहेत त्या सगळ्या तिथेच आहेत.’’
‘‘त्या नकोत.’’
‘‘का पण?’’ जाहिरात लागल्यामुळे आईने टीव्ही म्यूट केला आणि अस्मीकडे बघत विचारलं, ‘‘त्यातली ताटली का नकोय?’’
‘‘त्या फार उथळ आहेत.’’
‘‘मग? ताटल्या उथळच असतात अस्मी.’’
‘‘मग मला मोठ्ठा बाऊल दे.’’
‘‘तुला ताटली हवीये का बाउल?’’ आईने आता जरा इरिटेट होऊन विचारलं.
‘‘अ‍ॅक्च्युअली ना मला खोल ताटली किंवा मोठा बाउल पाहिजे आहे.’’
‘‘कशासाठी?’’ आता आईचं पूर्ण लक्ष अस्मीकडे होतं.
‘‘गच्चीत ठेवायला.’’
यावर आईने काही विचारायचे कष्टच घेतले नाहीत. नुसतंच अस्मीकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं.
‘‘अगं उन्हाळा सुरू झालाय ना? मग पक्ष्यांसाठी पाणी नको का ठेवायला???’’ अस्मीने शिष्टपणे विचारलं.
‘‘अस्मी, पक्ष्यांसाठी पाणी ठेवायला तुला मी महिन्याभरापूर्वीच एक बाउल दिलाय. त्याचं काय केलंस?’’
‘‘अगं तो पक्ष्यांना पुरत नाही.’’
‘‘असा कसा पुरत नाही? आपल्या गच्चीत काय मोर किंवा गरुड येतात का पाणी प्यायला? नाही ना? मग? चिमण्या कावळ्यांना तेवढा बाउल पुष्कळ झाला. आता पटकन हातपाय धू आणि अभ्यासाला बस.’’ आईच्या सिरिअलमधला ब्रेक संपून सिरिअल सुरू झाली आणि अस्मीची मोठ्या बाउलची मागणी निकालात निघाली.
दुसऱ्या दिवशी अस्मीने तिच्या मित्रमैत्रिणींना विचारलं तर त्यांच्या कोणाच्याच घरून त्यांना परातीसारखी ताटली मिळाली नव्हती. आता काय करायचं? सगळ्यांनी एकमेकांकडे बघितलं. सगळ्यांच्या घरच्यांनी त्यांना सांगितलं होतं, की पक्ष्यांना पाणी प्यायला तेवढा बाउल पुरेसा आहे.
अथांग म्हणाला, ‘‘पण पक्ष्यांना काय फक्त प्यायला पाणी लागतं का? त्यांना अंघोळीलापण पाणी लागतं. आमच्या शाळेत शिकवलं की पक्ष्यांनी जर अंघोळ केली नाही तर त्यांचे पंख तेलकट होतात. त्यावर धूळ बसते आणि त्यांना उडताना जास्त कष्ट पडतात. मग ते जास्त दमतात आणि त्यांना लांब जाता येत नाही. त्यांना पुरेसं खायला गोळा करता येत नाही. असा सगळा प्रॉब्लेम होऊन जातो त्यांचा.’’
‘‘हो की नाही?’’ अस्मी म्हणाली, ‘‘आमच्या पण शाळेत असंच शिकवलंय. आमच्या शाळेत सांगितलं की, पक्ष्यांना परातीसारखी, पण मातीची बशी भरून पाणी ठेवायचं. त्यात मध्ये मध्ये पक्ष्यांना बसायला विटांचे तुकडे ठेवायचे. ते पाणी सावलीत ठेवायचं आणि ते पाणी रोज बदलायचं. जुनं पाणी झाडांना घालून टाकायचं. कारण पक्ष्यांना स्वच्छ आणि गार पाणी आवडतं. म्हणून मी आईला विचारायला गेले, तर ती म्हणाली, आपल्या गच्चीत काय मोर येणार आहे का? चिमणीला छोटा बाउल पुरेल.’’
‘‘आमच्याकडे छोटा प्लॅस्टिकचा टब आहे; पण तो माझ्या वडिलांनी नाही दिला.’’
‘‘आता आपण काय करायचं?’’ या प्रश्नावर सगळ्यांनी एकमेकांकडे बघितलं. अस्मी म्हणाली, ‘‘आयडिया!’’
तिची आयडिया ऐकून सगळेजण आपापल्या घराकडे पळाले. सगळ्यांनी त्यांचे खाऊचे पैसे साठवलेले डबे आणले. सगळ्यांच्या डब्यातले सगळे पैसे एकत्र केले तर साडेतीनशे रुपये जमले.
मग ते सगळेजण ते पैसे घेऊन झेलमताईकडे गेले. झेलमताई आता बारावीत होती आणि तिच्याकडे स्कूटर होती. त्या सगळ्यांनी तिला त्यांचा प्लॅन सांगितला आणि तिच्याकडे साडेतीनशे रुपये देऊन टाकले. झेलमताईने त्यात तिच्या पॉकेटमनीमधले दीडशे रुपये घातले आणि ती बाजारात गेली. सगळी मुलं झेलमताईची वाट बघत बसली होती. त्यांना वाटत होतं की ती प्लॅस्टिकचा टब घेऊन येईल. पण झेलमताईने जे आणलं ते बघून तर ते नाचायलाच लागले. कारण तिने जवळ जवळ दोन फूट व्यासाची आणि पाच इंच उंच अशी मातीची छान भाजलेली परात आणली होती आणि शिवाय चिऊताईला घरटं करायला एक लाकडी खोकं पण आणलं होतं. सगळ्या मुलांना घेऊन तिने पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी पाण्याच्या टाकीच्या जवळची सावलीची जागा शोधली. सगळ्या मुलांनी सांगितलं की, चिऊताईचं घरटं झेलमताईच्याच घरी ठेवायचं.
आता सगळी मुलं खूश आहेत, कारण त्यांच्या गच्चीत रोज पक्षी पाणी प्यायला येतात आणि झेलमताईच्या बाल्कनीत चिऊताईने घरटं बांधलंय.
हा सगळा उद्योग आईबाबांना समजला तेव्हा त्यांनी मुलांचे खाऊचे पैसे त्यांना परत देऊन टाकले. कारण लहान मुलांचं उदाहरण बघून मोठ्या माणसांना पण त्यांचं म्हणणं पटलं आणि त्यांनी अशा अजून दोन पराती आणून ठेवून दिल्या.
आता अस्मीच्या सोसायटीच्या अंगणात मुलांचा कलकलाट आणि गच्चीत पक्ष्यांचा चिवचिवाट सतत चालू असतो !

(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)

lpf.internal@gmail.com

Web Title: Children's unique experiment for birds in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.