कुणी घर देतं का रे घर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 09:11 AM2018-12-02T09:11:01+5:302018-12-02T09:15:01+5:30

हरवलेली माणसं  : एक वृद्धापकाळानं जर्जर झालेली म्हातारी... हातात दोन पिशव्या... त्या पिशव्यांत आयुष्याच्या चिंध्या आणि त्यात गुंडाळलेला कोरा तुकडा... काही विटलेला; तर काही आटलेला...! या आजीला माडी आठवते... शाळा आठवते... मंदिर आठवते... देव आठवतो... गाव आठवतो... पण स्वत:च्या अस्तित्वाचा मात्र तिला कधी विसर पडला याची मात्र या मावळतीला चाललेल्या म्हाताऱ्या जिवाला अजिबातच जाणीव नव्हती...!

anyone give me house ? | कुणी घर देतं का रे घर ?

कुणी घर देतं का रे घर ?

googlenewsNext

- दादासाहेब थेटे.

म्हातारपणाच्या सुरकुत्यांनी तिचं जखडून गेलेलं बेवारस शरीर रस्त्यावरच्या ऊन, वारा, पाऊस खाऊन भेगाळलेल्या भुईसारखं वखवखल्यागत झालं होतं. अगदी बंजर झालेल्या फाटलेल्या शेतागत! धुळीनं मळकटलेले कपडे, अंगावर गळा भरून पोती अन् फुटक्या मण्याचं माळाचं जंजाळ... हातभरून वेगवेगळ्या रंगा-ढंगाच्या बांगड्या. कुजलेली नाटी तरी डोईभरून पदरानं व्यापलेली...! झाडाचा निवारा... दिलं-भेटलेलं अन्न हीच तिची ऊर्जा...! असं असलं तरी माझी थैली... माझं भांडं... माझी दागिने... या आपली संपत्ती मानलेल्या तिच्याजवळच्या सहित्याची देखभाल मात्र जणू तिच्या शहाणपणाची आठवण करून देत होती. कितीही माझं-माझं केलं तरी आपण एकटेच आहोत, ही एकटेपणाची जाणीव मात्र या थकलेल्या जीर्ण मुखातल्या शब्दाशब्दांतून बाहेर पडत होती. या आजीला या जगाच्या कोप-यात कुठेना कुठे तरी नातेवाईक असतील, कदाचित मुलं, नातवंडंही असतील; पण तरीही या अफाट जगाच्या एका छोटुशा कोप-यात एकाकी अस्तव्यस्त होऊन विनातक्रार ती म्हातारी आजही जगतच होती. एखाद्या बेवारस जनावरासारखी...!


माणसाचं माणसाशी असलेलं संवेदनांचं नातं माणसाला माणसांशी जोडून ठेवत असतं. त्यावरच हे जग अजून जिवंत आहे. याच भावनेतून माणुसकीचा धर्म पाळणारे काही तरुण या आजीला पाहून पाणावून गेले. त्यांच्या मनातला हाच ओलावा या आजीच्या तहान भुकेला काही दिवस जगवत होता. पोरं मेसमधून आणलेला घासातला घास काढून आजीच्या पोटाला ठिगळं लावत होती. दोन वेळच्या अन्नाव्यतिरिक्त आणखी काही करण्याची इच्छा असूनही ही पोरं काही करू शकत नव्हती. हे समजताच सकाळी लवकरच या आजीच्या अंगणात आम्ही सर्व दाखल झालो. आजीशी बातचीत केली. तिच्या असंबद्ध बोलण्यावरून आजीची मानसिक अवस्था लक्षात येत होती. आजीला घरी येतेस का म्हटल्यावर ती नकार देऊ लागली. मोठ्या मुश्किलीनं मनधरणी करून आजीला गाडीमध्ये बसवलं आणि प्रवास सुरू झाला एका नव्या जगण्याचा.

आजी गाडीत उलट्या करीत होती, घाण करीत होती तरी आमच्यातल्या कुणालाही तिच्या उलटीची किळस येत नव्हती. उलट प्रत्येकाला तिची काळजी वाटत होती. या काळजीपोटी औरंगाबादला जात असणारा आमचा समाजभान दोस्त डॉ. संदीप डोंगरे या आजीच्या उपचारासाठी हातचं काम सोडून जालन्याच्या रस्त्यावर धावत आला. पत्नीला बसस्थानकावर बसवून एका बेवारस रुग्णाची सेवा करायला धावून येणारा संदीप आम्हाला देवदूतासारखा वाटला. त्यानं दिलेल्या सल्ल्याप्रमानं आजीची देखभाल घेत आम्ही आजीला तिच्या हक्काच्या घरी घेऊन आलो...!

एकीकडं आपल्याच माणसांना नकोशी झालेली आजीबाई आणि दुसरीकडं काही संबंध नसून, अवतीभोवती छत धरून काळजी घेणारी पोरं पाहून, माणूस जिवंत असल्याची भावना आजीच्या चेहºयावर आम्हाला दिसत होती. नंदूभाऊ आणि आरतीतार्इंच्या मायेच्या स्पर्शानं ही भावना अधिकच खुलून दिसत होती. आज कित्येक दिवसांनी आजी मनमोकळी हसली होती. हे घर माझं आहे, असं म्हणत होती. मी इथंच राहते, असं हक्कानं बोलत होती. तिला सगळं काही आपलंसं वाटतं होतं...! स्पर्शाची भाषा किती बोलकी असते, ते आजीच्या डोळ्यांत आलेल्या निरागस जाणिवेतून कळत होतं.
सेवासंकल्पाच्या गेटमधून बाहेर पडताना पुन्हा एक विचार मात्र पुन्हा मनात घर करीत होता... असे अनेक अनुत्तरित बेवारस जगणे ‘टू बी आॅर नॉट टू बी’च्या प्रश्नामध्ये कुठंतरी रस्त्याच्या कडेला, मंदिराच्या पायºयांवर, गटाराच्या किना-यावर, कच-याच्या ढिगारावर लोळत पडलेली असतील. माणूसपणाच्या जाणिवा हरवून... आला दिवस ढकलण्यासाठी...!

 

( Sweetdada11@gmail.com ) 

Web Title: anyone give me house ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.