...अन् तो पुन्हा एकदा आकाशात झेपावला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:05 PM2018-12-10T12:05:10+5:302018-12-10T12:09:07+5:30

निसर्गाच्या कुशीत : काही क्षणात तो आमच्यापासून लांब गेला होता आणि पुन्हा एकदा निसर्गाच्या कुशीत एकरूप झाला होता.  

... and again he flies into the sky | ...अन् तो पुन्हा एकदा आकाशात झेपावला 

...अन् तो पुन्हा एकदा आकाशात झेपावला 

googlenewsNext

- सिद्धार्थ सोनवणे 

नेहमीप्रमाणे त्या दिवशी सकाळी मी आणि सृष्टी सर्पराज्ञीतील प्राण्यांच्या पिंजऱ्यांची साफसफाई करत असताना आष्टी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी गिते यांचा फोन आला. सिद्धार्थ, तुमच्याकडे वनरक्षक धसे यांना एक जखमी पक्षी घेऊन पाठवतोय. त्यानंतर दुपारी दोन वाजता धसे व शिवाजी आघाव हे त्या पक्ष्यास घेऊन सर्पराज्ञीत आले. 
तो राखाडी बगळा होता. याला शहाणा बगळाही म्हणतात. त्याची तपासणी केली. त्याचा डावा पाय दोरीने घट्ट आवळून बांधलेला होता. त्या पायाला जखम आणि सूज होती. दोरी घट्ट आवळून बांधल्यामुळे पायातील रक्तपुरवठा बंद झाला होता आणि त्याच्या पायांची हालचाल एकदम मंदावली असल्याचे आमच्या लक्षात आले. त्यामुळे आम्ही ताबडतोब पायाला बांधलेली दोरी सोडून त्याला मोकळ्या पिंजऱ्यात सोडले. त्याला त्याच्या पायावर उभे राहता येत नव्हते. तो शांत बसून राहिला. काही वेळानंतर आम्ही त्याला उपचारासाठी पकडले. डॉ. शशिकुमार सवाई यांनी त्यास इंजेक्शन देऊन जखमेवर मलमपट्टी केली आणि पुन्हा पिंजऱ्यात सोडले.

उपचारानंतर त्याला खाद्य देणे महत्त्वाचे होते. शिरूरवरून मासे आणले व त्याला खाऊ घालण्याचा प्रयत्न केला. त्याने एकही मासा खाल्ला नाही. दुसऱ्या दिवशी मात्र सृष्टीने त्याला तिच्या हातानं एक एक घास भरवत पोटभर मासे खाऊ घातले. त्यानंतर मात्र त्याला हाताने मासे खाऊ घालावे लागले नाहीत. त्याच्या पिंजऱ्यात असलेल्या पाण्याच्या कुंडीत लहानलहान मासे आम्ही टाकून देत असू. तोही भूक लागली की नदी, तलावातील पाण्यातील जसे मासे पकडून खातो असे तसे तो पाण्याच्या कुंडीतील मासे पटापट पकडून खात असे. त्याच्यासाठी ती पाण्याची कुंडी तलावाची भूमिका पार पाडत होती. 

पाच-सहा दिवसांनंतर त्याची जखम भरून आली. सूजही कमी झाली. तो हालचाल करू लागला होता. स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करायचा. प्रयत्न करता करता जमिनीवर पडायचा. चोच जमिनीवर टेकून पुन: पुन्हा उठण्याचा प्रयत्न करायचा. पंख फैलावून उडण्याचा प्रयत्न करायचा. या काळात मी आणि सृष्टी त्याला दररोज जवळच असलेल्या उथळा तलावात सायंकाळी घेऊन जात असत. तेथे पाण्याच्या कडेला तो मोकळ्या मनाने उभे राहून उडण्याचा, खाद्य मिळवण्याचा प्रयत्न करत असे, आम्ही त्याच्या या हालचालींवर बारीक नजर ठेवून असत. सात आठ दिवसांनंतर तो चांगलाच स्वत:च्या पायावर उभा राहिला होता. पंख फडकून चांगली ३०-४० फूट लांब अंतरावर उडानही घेतली होती. त्याची ही प्रकल्पात आणल्यानंतर घेतली पहिलीच यशस्वी उडान.

दहाव्या दिवशी दररोजच्या प्रमाणे मी आणि सृष्टी त्याला सायंकाळी सहा वाजता उथळा तलावात घेऊन गेलोत. तेथे त्याला पाण्याच्या कडेला सृष्टीने सोडले. काहीवेळ गेल्यानंतर बगळ्याने तलावात इकडे तिकडे नजर फिरवली. पंख फडकवीत अचानक आभाळात झेप घेतली. काही क्षणात तो आमच्यापासून लांब गेला होता आणि पुन्हा एकदा निसर्गाच्या कुशीत एकरूप झाला होता.  

( लेखक सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र तागडगाव. जि. बीड येथे संचालक आहेत  )

Web Title: ... and again he flies into the sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.