अकाली एक्झिट - कर्तृत्वसंपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:53 AM2018-12-23T00:53:37+5:302018-12-23T00:54:25+5:30

जी. जी. भोसले ‘डाळिंबी’ नावाचा चित्रपट करीत होते. ते १९८१ साल असावं. मी त्यांचा प्रमुख सहाय्यक होतो. मला माझ्या हाताखाली आणखी एका सहाय्यकाची गरज होती. एरवी सतीश रणदिवे किंवा आणखी कुणीतरी माझ्याबरोबर काम करीत असत.

 Akali Exit - Career | अकाली एक्झिट - कर्तृत्वसंपन्न

अकाली एक्झिट - कर्तृत्वसंपन्न

Next
ठळक मुद्देजी. जी. भोसले ‘डाळिंबी’ नावाचा चित्रपट करीत होते. ते १९८१ साल असावं. मी त्यांचा प्रमुख सहाय्यक होतो. मला माझ्या हाताखाली आणखी एका सहाय्यकाची गरज होती. एरवी सतीश रणदिवे किंवा आणखी कुणीतरी माझ्याबरोबर काम करीत असत.

-भास्कर जाधव

जी. जी. भोसले ‘डाळिंबी’ नावाचा चित्रपट करीत होते. ते १९८१ साल असावं. मी त्यांचा प्रमुख सहाय्यक होतो. मला माझ्या हाताखाली आणखी एका सहाय्यकाची गरज होती. एरवी सतीश रणदिवे किंवा आणखी कुणीतरी माझ्याबरोबर काम करीत असत. द्वितीय सहाय्यक घेण्याचा विषय निघाल्यानंतर जी. जी. भोसलेंनी मला बाजूला घेऊन विचारलं की, ‘‘तुमचं यशवंत भालकरबद्दल काय मत आहे? त्याला आपण संधी देऊया काय?’’
आणि मी त्वरित हो म्हणून टाकलं. मला क्षणभरही विचार करावा लागला नाही. त्याला कारण तसंच होतं. यशवंत भालकरांना मी कॉलेज जीवनापासून ओळखत होतो. एक उत्साही, तडफदार आणि कष्टाळू तरुण म्हणून त्यांची प्रतिमा माझ्या मनावर कोरली होती.

बी. ए. पर्यंत शिकूनही कसलाही कमीपणा न बाळगता हाती इस्त्री घेऊन वडिलोपार्जित व्यवसायात भालकरांनी आपल्या आई-वडिलांना मदत करायला सुरुवात केली होती. त्याबद्दल मला त्यांचा नेहमीच अभिमान वाटत आला. पुढे त्यांचा चित्रपटसृष्टीकडे झालेला प्रवास म्हणजे एक चमत्कारच होता. जयप्रभा स्टुडिओच्या प्रांगणात आपल्या आजोबांचे कै. महालिंगाअप्पा यांचं बोट पकडून प्रवेश करणारा किशोरवयातील यशवंतही मी पाहिलेला होता. तिथून यशवंत भालकर यांनी मारलेली गरुडभरारी विलक्षणच म्हणावी लागेल.

आधी चित्रपटातील कलाकारांचे कपडे इस्त्री करता करता ते विठ्ठल इंगवले या जुन्या जाणत्या वेशभूषाकाराचे मदतनीस झाले आणि पुढे स्वकर्तृत्वाने ते प्रमुख वेशभूषाकारही झाले. एक उत्कृष्ट वेशभूषाकार म्हणून त्यांची ख्याती झाली.पण यशवंत भालकरांचं विजिगीषू मन त्यांना गप्प बसू देत नव्हतं. आज नाही उद्या आपण चित्रपट दिग्दर्शक व्हायचंच, हे स्वप्न उराशी बाळगून ते प्रत्येक दिग्दर्शकाची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळेच त्या दिवशी मला जी. जी. भोसले विचारीत होते, यशवंतला आपण दिग्दर्शन विभागात संधी देऊया का?. यशवंतसारखा हरहुन्नरी, उत्साही, जिज्ञासू तरुण मला सहाय्यक म्हणून मिळणार असेल, तर मी त्याला हरकत घेण्याचा प्रयत्न उद्भवत नव्हता. मी लगेचच होकार देऊन टाकला.

‘डाळिंबी’ला तृतीय क्रमांकाचे सहाय्यक म्हणून आलेल्या यशवंत भालकर यांनी परत कधी मागं वळून बघितलंच नाही. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे आणि कष्ट करण्याच्या प्रवृत्तीमुळे त्यांनी मराठीतील मोठमोठ्या दिग्दर्शकांकडे सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले. सहाय्यक दिग्दर्शक ते प्रमुख दिग्दर्शक हा त्यांचा प्रवास सहज सोपा मुळीच नव्हता. अनेक नामवंतांकडे सहाय्यक म्हणून काम केल्यावरहीे त्यांना स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून संधी द्यायला कुठलाच निर्माता तयार नव्हता. याउलट काही मातब्बर निर्मात्यांनी तर स्वत:च्या नावावर त्यांना घोस्ट (ॠङ्म२३) डायरेक्शन करायला लावलं आणि पारितोषिकही घेतली.

अखेर जे. के. पाटलांच्या ‘जगावेगळी पैज’ने ती संधी त्यांना मिळवून दिली आणि त्या संधीचं त्यांनी अक्षरश: सोनं केलं. या चित्रपटाने त्यावर्षीच्या चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासह अनेक पारितोषिके पटकावली आणि यशवंत भालकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीच्या नकाशावर ठळकपणे झगमगू लागले.

यशवंतरावांची आणि माझी मैत्री, साथ-सोबत ही सुमारे चाळीस वर्षांची. भास्कर जाधव, सतीश रणदिवे आणि यशवंत भालकर हे त्रिकूट त्या काळी खूपच प्रसिद्ध होते. १९८१ ते १९८५-८६ या काळातील अनेक मराठी चित्रपटांची श्रेयनामावली पाहिली तर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आम्हा तिघांची एकत्र नावं दिसतील.
पुढे मी व सतीश रणदिवे दिग्दर्शक झाल्यानंतरही यशवंतनं आमची साथ सोडली नाही, तर आम्हालाही दिग्दर्शनात सहकार्य केले. जणू भास्कररावांचा आणि सतीशचा चित्रपट आपलाच आहे, असे म्हणून ते तनामनानं राबले. मला वाटतं हा त्यांचा प्रामाणिकपणा त्यांना पुढे यशाच्या शिखरावर घेऊ न गेला.

काम असो वा नसो, रोज सकाळी मी व यशवंत सतीश रणदिवेंच्या घरी जात असू आणि आम्ही तिथे एकत्र असतो हे कळल्यावर अनेक तंत्रज्ञ कलावंतही तिथं येऊ लागले. सुमारे दहा वर्षे तरी हा आमचा फिल्मी कट्टा अव्याहतपणे चालू होता. अपवाद शुटींग असेल तरच. या फिल्मी कट्ट्यावर होणाऱ्या चर्चांची पुढे दिग्दर्शक होण्यासाठी आम्हा तिघांनाही चांगलीच मदत झाली.

स्वभावधर्म जुळल्याशिवाय एवढी अखंड मैत्री टिकूच शकत नाही; परंतु त्याहूनही यशवंतच्या स्वभावात दुसºयाशी जुळवून घेणाºया महत्त्वाचा गुण होता. त्यामुळेच आमची मैत्री टिकली, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही.
कुशल संघटन, माणसांशी जुळवून घेण्याची मनोवृत्ती, आपल्या कामावर संपूर्ण श्रद्धा या त्रिसूत्रीमुळेच यशवंत भालकर नावाचा एक सामान्य कुटुंबातील मुलगा यश आणि प्रसिद्धीच्या शिखरावर चढला.

जीवनाकडे बघण्याचा आदर्शवादी दृष्टिकोन, सामाजिक बांधीलकीची जाणीव या सर्व गोष्टी त्यांनी भालजी पेंढारकरांच्याकडून घेतल्या होत्या. ते त्या बाबतीत बाबांना आपला गुरू मानीत आणि म्हणूनच यशवंत भालकर यांनी त्यांच्या प्रत्येक चित्रपटामधून काही ना काही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. साधा ड्रेसमन ते मराठी चित्रपट महामंडळाचं अध्यक्षपद असा देदीप्यमान प्रवास करणाºया या माझ्या लहान बंधूची अकाली एक्झिट मनाला चटका लावून गेली.

Web Title:  Akali Exit - Career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.