कर्जमाफी न झाल्यामुळे मरण पत्करलेल्या पूजाच्या आत्महत्येची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का?- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 08:23 AM2017-10-06T08:23:03+5:302017-10-06T08:24:50+5:30

नांदेडच्या एका शेतकऱ्याची मुलगी पूजा शिरगिरेने वडिलांच्या कर्जबाजारीपणाने अस्वस्थ होऊन आत्महत्या केली. याचंच उदाहरण देत सामनाच्या अग्रलेखातून भाजपा सरकारवर टीका करण्यात आली आहे.

Will you be responsible for the death of Pooja's death due to non-debt waiver? - Uddhav Thackeray | कर्जमाफी न झाल्यामुळे मरण पत्करलेल्या पूजाच्या आत्महत्येची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का?- उद्धव ठाकरे

कर्जमाफी न झाल्यामुळे मरण पत्करलेल्या पूजाच्या आत्महत्येची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का?- उद्धव ठाकरे

googlenewsNext
ठळक मुद्देसरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली पण त्याचा कुठलाही फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाहीये. राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच असलेलं पाहायला मिळतं आहे. नांदेडच्या एका शेतकऱ्याची मुलगी पूजा शिरगिरेने वडिलांच्या कर्जबाजारीपणाने अस्वस्थ होऊन आत्महत्या केली. याचंच उदाहरण देत सामनाच्या अग्रलेखातून भाजपा सरकारवर टीका करण्यात आली आहे.

मुंबई- सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली पण त्याचा कुठलाही फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाहीये. राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच असलेलं पाहायला मिळतं आहे. इतकंच नाही तर शेतकऱ्याच्या डोक्यावर असलेल्या कर्जामुळे अस्वस्थ झालेली त्यांची मुलंही आत्महत्या करत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. नांदेडच्या एका शेतकऱ्याची मुलगी पूजा शिरगिरेने वडिलांच्या कर्जबाजारीपणाने अस्वस्थ होऊन आत्महत्या केली. याचंच उदाहरण देत सामनाच्या अग्रलेखातून भाजपा सरकारवर टीका करण्यात आली आहे. कर्जमाफी न झाल्यामुळे मरण पत्करलेल्या पूजाच्या आत्महत्येची जबाबदारी तुम्ही घेणार का असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे. 

कर्जमाफीची घोषणा झाली. या तारखेपासून आतापर्यंत एकट्या मराठवाड्यात तब्बल २६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याचा अर्थ काय? कर्जमाफीने शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा मिळेल व आत्महत्या थांबतील ही त्यामागची भावना होती, पण शेतकऱ्यांचा सरकार जणू सूड घेताना दिसत आहे. नांदेडच्या पूजावरसुद्धा सूडच उगविण्यात आला आहे. कर्जमाफीची सरकारी घोषणा होताच लगेच भाजपने जाहिरातबाजी करून श्रेय लाटण्याचा घाणेरडा प्रकार केला. मग आता कर्जमाफी न झाल्यामुळे मरण पत्करलेल्या कु. पूजाच्या आत्महत्येची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का?, असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

सामनामध्ये म्हंटलं आहे की, 

कर्जबाजारी शेतकरी आजही आत्महत्या करतो आहे. कर्जमाफीची सरकारी घोषणा होऊनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. आता शेतकऱ्यांची निरागस पोरेबाळेही बापाच्या कर्जाने अस्वस्थ होऊन आत्महत्या करीत आहेत. नांदेडची शेतकरी कन्या पूजा शिरगिरेने आत्महत्या केली आहे. नांदेडातील फक्त १७ वर्षांच्या पूजाने आत्महत्या करताच जो भावनांचा स्फोट केला आहे, त्या शापाने सध्याचे निर्दयी राज्यकर्ते मातीत मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. कर्जमाफी न देता त्याचे राज्यभर बॅनर लावणारे भाजप सरकार खुनी असल्याचा आक्रोश तिने आत्महत्या करताना केला आहे. पूजाच्या आक्रोशाने सरकारचे मन द्रवणार नाही व डोळ्यांच्या कडा ओलावणार नाहीत. कारण त्यांच्यासाठी पूजासारख्या पोरी जगल्या काय किंवा मेल्या काय, राजकीय पटावरील प्यादी हलवून सत्तेच्या खुर्च्या टिकवणे हेच त्यांचे महत्कार्य आहे. पोकळ घोषणांचे आणि आश्वासनांचे डोलारे कोसळताना दिसत असतानाही हिंदुस्थानची अर्थव्यवस्था एकदम मजबूत असल्याचा ढोल वाजवला जातो व देशाच्या रिझर्व्ह बँकेलाही खोटे पाडण्यासाठी आटापिटा केला जातो. अर्थव्यवस्था इतकी मजबूत असेल तर मग पूजा शिरगिरेसारख्या असंख्य लेकी मरणाचा मार्ग का स्वीकारत आहेत? 
दोन -अडीच महिन्यांपूर्वी नांदेड जिह्यातीलच मुखेड तालुक्यातील होकर्णा येथे व्यंकटी लुट्टे यांचे आजारापणात निधन झाल्यामुळे बँक कर्जाच्या विवंचनेत असलेल्या नागनाथ या त्यांच्या मुलानेही विजेची तार हातात धरून स्वतःला संपवले. एकाच चितेवर वडील आणि मुलाचे अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबीय आणि ग्रामस्थांवर आली. दीड महिन्यापूर्वी अमरावती जिल्ह्यांच्या तारखडे गावात मीनल डाहे या तरुणीने कीटकनाशक प्राशन करून आपले जीवन संपवले. मीनलला बी.कॉम. द्वितीय वर्षात प्रवेश घेण्यासाठी एक हजार रुपये हवे होते. अडचणीत असलेल्या कुटुंबीयांनी दोन दिवस थांबायला सांगितले. एकीकडे शिक्षणाची ओढ आणि दुसरीकडे घरची दैन्यावस्था यामुळे निराश झालेल्या मीनलने विष घेऊन मृत्यूस जवळ केले. लातूर जिल्हय़ाच्या भिसे वाघोली गावातील शीतल वायाळचीही हीच कथा. या तरुणीचे लग्न पैशांअभावी दोन वर्षांपासून अडले होते. हुंडा आणि लग्नाचा खर्च यामुळे आधीच हलाखीत जगणाऱया कुटुंबावर भार नको म्हणून शीतलने विहिरीत उडी घेऊन स्वतःला संपवले. परभणी जिल्हय़ाच्या जवळा झुटा गावात सारिका नावाच्या मुलीनेही ‘तुमचे हाल बघवत नाहीत’ असे पत्र वडिलांना लिहून आत्महत्या केली. सारिकाने जीवन संपवण्यापूर्वी सहा दिवस आधीच तिच्या काकांनी आत्महत्या केली होती. कर्जबाजारी असलेले आपले वडीलही उद्या हाच विचार करतील या भयातून सारिकाने टोकाचे पाऊल उचलले. मराठवाडा, विदर्भातून सातत्याने अशा हृदय पिळवटून टाकणाऱ्या बातम्या येत आहेत. त्या थांबवायच्या कुणी? एका बाजूला ‘बेटी बचाव’ ‘लेकी वाचवा’सारख्या सरकारी मोहिमांची जाहिरातबाजी करायची व त्याच वेळी उमलून फूल झालेल्या असंख्य पूजांना ठार मारायचे हा तर  निर्दयपणाचा कळसच झाला आहे. पूजाने मरण पत्करताना तिच्या बाबांना जे पत्र लिहिले आहे ते ग्रामीण महाराष्ट्रातील असंख्य लेकी-सुनांची ‘मन की बात’ आहे. ‘हुंडाबळी’ असे लिहून पूजाने पत्राची सुरुवात केली आहे. 

‘‘बाबा मला माफ करा. आर्थिक अडचणीमुळे मी जीवन संपविण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही माझ्यासाठी एवढे कष्ट घेता, पण तुम्ही तरी काय करणार? मला वाटते, माझ्या घरच्यांनी तरी सुखात राहावे म्हणून मी माझे जीवन संपविण्याचा निर्णय घेतला आहे.’’ कर्जमाफीचा जो तमाशा सरकारने चालवला आहे त्याचा हा बळी आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकऱयांवर ज्या जाचक व किचकट अटी लादून सरकारने चालढकल चालविली आहे ती फसवेगिरी आहे. 

Web Title: Will you be responsible for the death of Pooja's death due to non-debt waiver? - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.