हम बचेंगे भी और लडेंगे भी! छगन भुजबळांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 06:45 AM2018-06-11T06:45:27+5:302018-06-11T06:45:27+5:30

अडीच वर्षांपूर्वी माझ्यावर हल्लाबोल झाला. मला निष्कारण अटक झाली. एकाच ठिकाणी सात वेळा धाडी टाकून कुटुंबीयांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला; पण न्यायदेवतेमुळे बाहेर आलो आहे.

We will survive and also fight! Chhagan Bhujbal attack | हम बचेंगे भी और लडेंगे भी! छगन भुजबळांचा हल्लाबोल

हम बचेंगे भी और लडेंगे भी! छगन भुजबळांचा हल्लाबोल

Next

पुणे : अडीच वर्षांपूर्वी माझ्यावर हल्लाबोल झाला. मला निष्कारण अटक झाली. एकाच ठिकाणी सात वेळा धाडी टाकून कुटुंबीयांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला; पण न्यायदेवतेमुळे बाहेर आलो आहे. आता लढाई रस्त्यावर होईल. पानिपतच्या लढाईत दत्ताजी शिंदे जसे म्हणाले, बचेंगे तो और भी लढेंगे. तसे ‘हम बचेंगे भी और लढेंगे भी!’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते छगन भुजबळ यांनी पुनश्च हरी ओम करीत सरकारविरोधात एल्गार पुकारला.
राष्ट्रवादी काँग्रेसचा २०वा वर्धापन दिन व हल्लाबोल आंदोलनाची सांगता पुण्यात झाली. तुरुंगातून सुटल्यानंतर भुजबळ पहिल्यांदाच जाहीर सभेत बोलणार असल्याने त्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष होते़ भुजबळ यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलने उपरोधिक शब्दांत केंद्र आणि राज्य सरकारचा चांगलाच समाचार घेतला.
सध्या शेतकरी रडत आहेत, व्यापारी रडत आहेत, सगळ्याच क्षेत्रातील नागरिकांचे सध्या हाल चालू आहेत. पण सरकारला पाकिस्तानची साखर गोड लागत आहे. भुजबळ म्हणाले, दोन वर्षांपूर्वी माझ्यावर हल्लाबोल करण्यात आला. सगळीकडे छापे टाकण्यात आले. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून चांगले महाराष्ट्र सदन बांधणे माझी जबाबदारी होती. ज्यावेळी घोटाळ्याचे आरोप झाले, तेव्हा लाचलुचपत खात्याने मी दोषी नसल्याचा अहवाल दिला होता.
मात्र, त्याच खात्याने वर्षानंतर आपला निर्णय फिरवला.
माझ्यावर अनेक घोटाळ्याचे
खोटे आरोप करण्यात आले.
परंतु, लोकांचे प्रेम ते हिरावून घेऊ शकले नाहीत, असे त्यांनी निक्षून सांगितले़
माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या विधानाचा दाखला देत भुजबळ म्हणाले, इंदिरा गांधींची आणीबाणी ही संविधानाला धरून होती. आताची आणीबाणी ही त्यापेक्षा भयंकर आणि बेकायदा आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष,जाती धर्मांनी एकत्र यायला हवे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. आपापसातील वाद दूर करून सर्वांनी एकत्र यायला हवे. यापुढे मी नुसता बोलणार नाही, तर लोकशाही मार्गाने रस्त्यावर आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
व्यासपीठावर पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे-पाटील,माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष वंदना चव्हाण आदी नेते उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाने लोकांना नुसते फसविले असून, त्यांच्या पापाचा घडा आता भरला आहे. हे नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकीत सिद्ध झाले आहे.
मतदान यंत्र खरे की खोटे, याची शंका आता तुमच्या मनात येत आहे. त्यासाठी ‘ईव्हीएम’ नको म्हणून सर्व विरोधक एकत्रित निवडणूक आयोगाकडे जाऊ, असे आवाहनही खा. पवार यांनी शिवसेनेसह इतर सर्व विरोधी पक्षांना केले.

‘कोरेगाव-भीमा’मागे कोण हे जगजाहीर

कोरेगाव-भीमा प्रकरणात नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंबेडकरी चळवळीतील ५ जणांना
अटक केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी
राज्य सरकारला लक्ष्य केले. पुणे शहरात पुरोगामी विचारांचे
लोक एकत्र आले आणि त्यांनी एल्गार परिषद भरवली. तर त्यांना नक्षलवादी ठरवतात. कोरेगाव-भीमामध्ये कोणी उद्योग केला, हे सगळ्या जगाला माहीत आहे. तरी सत्तेचा वापर करून विनाकारण लोकांना गोवले जात आहे. मात्र, आता या सरकारला लोकांचा पाठिंबा राहिलेला नाही. धमकीचे पत्र कोणी जाहीर करीत नाही. केवळ लोकांची सहानभूती मिळविण्याचा हा प्रयत्न असल्याचा टोलाही पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

परिवर्तनासाठी सर्वांनी एकत्र यावे : मी देशाच्या सर्व राज्यात जातो. आता देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्यास तयार आहेत. सगळ्यांची एकत्रित येण्याची मानसिकता आहे. ही शक्ती उभी करून देशातील जनतेला पर्याय देऊ, असे आवाहन खा. पवार यांनी केले.


 

Web Title: We will survive and also fight! Chhagan Bhujbal attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.