वाशिम: तहसील कार्यालयासमोर सोयाबीनची ‘होळी ’, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 14:18 IST2017-11-09T14:18:12+5:302017-11-09T14:18:37+5:30
नाफेडद्वारे सोयाबीन खरेदी सुरू नसल्याने शेतक-यांची आर्थिक लुट होत असल्याचा आरोप, हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने

वाशिम: तहसील कार्यालयासमोर सोयाबीनची ‘होळी ’, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
वाशिम: नाफेडद्वारे सोयाबीन खरेदी सुरू नसल्याने शेतक-यांची आर्थिक लुट होत असल्याचा आरोप करीत हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता मालेगाव तहसील कार्यालयासमोर सोयाबीनची होळी करण्यात आली.
यावर्षी शेतक-यांना विविध संकटातून जावे लागत आहे. खरिपात पावसात सातत्य नसल्याने तसेच शेंगा धरण्याच्या ऐन कालावधीत पाऊस गायब झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आली. आता सोयाबीनला हमीभावदेखील मिळत नसल्याने शेतक-यांची आर्थिक लूट होत आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांनी केला. नाफेडद्वारे सोयाबीनची खरेदी सुरु केल्यास शेतक-यांना ३०५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळणार आहे .परंतु मालेगाव येथे नाफेडची खरेदी बंद असल्याने व्यापारी १८०० ते २२०० रुपये क्विंटल दराने सोयाबीन खरेदी करीत आहेत. यामुळे नाफेडने सोयाबीन खरेदी २ दिवसात सुरु करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली. तसेच सोयाबीनच्या अनुदानाचे पैसे त्वरीत अदा करण्याची मागणीदेखील करण्यात आली. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सोयाबीनची होळी करण्यात आली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश आंधळे, जिल्हा मार्गदर्शक दत्ता जोगदंड, युवा आघाडीचे शहराध्यक्ष योगेश काळे, जिल्हा संघटक ओम गायकवाड, गजानन बाजड, सुभाष बाजड, श्रीकांत शेवाळे, एकनाथ महाजन, सदाशिव भोयर आदी उपस्थित होते.