"अजित पवारांचं बंड स्वार्थासाठी..."; शालिनीताई पाटील यांनी अजितदादांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 10:09 AM2023-12-25T10:09:41+5:302023-12-25T10:10:40+5:30

२०२४ मध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीस येतील. जो माणूस सख्ख्या चुलताचा, ज्याने तुम्हाला लहानाचं मोठं केले त्याचा विश्वासघात केला त्याच्यावर विश्वास का ठेवावा? असं शालिनीताई पाटील यांनी म्हटलं.

Vasantdada Patil's wife Shalinitai Patil criticizes Ajit Pawar | "अजित पवारांचं बंड स्वार्थासाठी..."; शालिनीताई पाटील यांनी अजितदादांना सुनावलं

"अजित पवारांचं बंड स्वार्थासाठी..."; शालिनीताई पाटील यांनी अजितदादांना सुनावलं

मुंबई - शरद पवार आणि अजित पवार यांच्या बंडामध्ये जमीन आस्मानाचं अंतर आहे. शरद पवारांचे बंड पक्षातील आमदार दुसरीकडे जाऊ नयेत यासाठी होते. तर अजित पवारांचे बंड स्वार्थासाठी होते. उपमुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी होते अशी टीका शालिनीताई पाटील यांनी केली आहे.

शालिनीताई पाटील म्हणाल्या की, २०२४ मध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीस येतील. जो माणूस सख्ख्या चुलताचा, ज्याने तुम्हाला लहानाचं मोठं केले त्याचा विश्वासघात केला त्याच्यावर विश्वास का ठेवावा?, अजित पवारांवर कुणीही विश्वास ठेवणार नाही.अजितदादांसोबत गेलेली माणसं कोणत्या लायकीचे आहेत हे मी आधीच सांगितले. त्यात बाकी जे आमदार आहेत ते पुन्हा शरद पवारांकडे जातील. त्यानंतर जी दुर्दशा होईल. तुरुंगात आजीवन कारावास भोगून आलेल्या व्यक्तीसोबत जे होते. त्याला निवडणूक लढवता येत नाही. तसे होईल. १०५ कोटींचा भ्रष्टाचार केलेला हा माणूस आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत अंतुलेसारखी अवस्था होईल. इंदिरा गांधींसमोर अंतुलेचा काय थरथराट झाला मला माहिती आहे. मुख्यमंत्री असताना स्वत:च्या नावावर ट्रस्ट उभा केला. वैयक्तिक ५ कोटींचा फायदा घेतला. मी हे सविस्तर हकीकत इंदिरा गांधींना सांगितल्यानंतर अंतुलेंना पायउतार होण्याचे आदेश दिले. त्यानंतर कोर्टात अंतुलेविरोधात खटला उभा झाला. मी हे सर्व केले आहे. ५ कोटींसाठी एका मुख्यमंत्र्यांची वाट लावलेली आहे. हा तर १०५ कोटींचा भ्रष्टाचार आहे. सिंचनातील हा घोटाळा आहे असा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला आहे.  

तसेच मी सातारा मतदारसंघातून यशवंतराव चव्हाण यांच्याविरोधात निवडणुकीला उभी राहिलेली आहे. त्यावेळी ते उपपंतप्रधान होते. त्यांच्यासमोर उभे राहायला कुणी तयार नव्हते. आम्ही काँग्रेसमध्ये होतो आणि ते काँग्रेससोडून बाहेरून लढत होते. त्यांच्याविरोधात उभे राहण्याचा माझ्या पक्षाने आदेश दिला. सातारा जिल्ह्यात त्यांच्याविरोधात कुणी अर्ज केला नाही. वसंतदादांना पक्षाने उभे राहण्यास सांगितले. परंतु मी सांगलीतून उभा राहतोय. तुम्ही शालिनीताई ज्यांचे माहेर सातारा आहे. माहेरची लोक त्यांना प्रेम करतात. पक्षाने शालिनीताईंना उमेदवारी द्यावी अशी शिफारस त्यांनी केली. त्यानंतर पक्षाने मला उमेदवारी दिली. आम्ही समोरासमोर निवडणूक लढवली. कुणाविरोधात कारस्थान केले नाही. हा माझा आणि माझ्या पतीचा स्वभाव नाही असं शालिनीताईंनी म्हटलं. 
 

Web Title: Vasantdada Patil's wife Shalinitai Patil criticizes Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.