‘वनवासी’ला आदिवासींचा नाशिकमध्ये आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 06:34 AM2018-10-15T06:34:34+5:302018-10-15T06:35:00+5:30

नाशिकमध्ये नोंदविला विरोध : संघाच्या कल्याण आश्रम संकल्पनेला छेद

Tribal residents objection in Nashik | ‘वनवासी’ला आदिवासींचा नाशिकमध्ये आक्षेप

‘वनवासी’ला आदिवासींचा नाशिकमध्ये आक्षेप

Next

- संजय पाठक

नाशिक : देशातील मूळ रहिवासी असलेल्यांना ‘वनवासी’ संबोधून सेवा कार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित वनवासी कल्याण आश्रमाच्या संकल्पनेला आता काही आदिवासींकडूनच आक्षेप घेतला जात आहे.


वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते दिंडोरी तालुक्यात मुलांना खाऊ वाटण्यासाठी जात असताना त्यांची गाडी आदिवासी युवक कार्यकर्त्यांनी कोशिंबे येथे अडवली आणि वनवासी शब्दावरून आक्षेप नोंदवला. बिरसा मुंडा किंवा तत्सम आदिवासी क्रांतिकारकांची नावे का वापरत नाही, असा जाब विचारला आणि गाडीवरील वनवासी हे नाव खोडून टाकले. याप्रकरणी आश्रमाने लखन पवार याच्यासह अन्य कार्यकर्त्यांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


वनवासी नाव खोडत असल्याचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. शासनाच्या टीआरटीआयचे अशासकीय सदस्य प्रा. अशोक बागुल यांनी वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून काम करणाºया एका वैद्यकीय व्यावसायिकाला दूरध्वनी करून वनवासी शब्द तसेच आदिवासींच्या निसर्ग देवतेपलीकडे अन्य देवांच्या सुरू असलेल्या प्रसाराविषयी आक्षेप नोंदवला आहे.


वनवासी कल्याण संस्थेचे काम वाढल्याने त्याची पुनर्रचना करण्यात येत असून पुणे, नाशिक, सातारा, सांगली या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पश्चिम महाराष्ट्र कार्यक्षेत्रासाठी वनवासी कल्याण आश्रम नाव बदलून जनजमाती कल्याण आश्रम करण्यात येणार आहे. धुळे - नंदुरबार क्षेत्राचा समावेश असलेल्या देवगिरी प्रांतासाठी देवगिरी कल्याण आश्रम असे नाव धर्मदाय आयुक्तांकडे नोंदविण्यात येणार आहे. आश्रमाला वनवासी नावात स्वारस्य नाही तर सेवा प्रकल्पात असल्याचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सचिव शरद शेळके यांनी सांगितले.

१९५२ पासून काम
आदिवासींच्या क्षेत्रात १९५२ पासून संघाची वनवासी कल्याण आश्रम शाखा काम करते. महाराष्ट्रात १९७८ पासून या पद्धतीचे काम करण्यात येते. विदर्भासह अनेक भागात वनवासी या शब्दाला विरोध केला जात असतानाच नाशिकमध्ये मात्र त्याला कृतिशील विरोधही होऊ लागला आहे.



शहरात राहणारे शहरवासी तसेच वनात राहणारे म्हणून वनवासी असा शब्द वापरला जातो. तथापि, गैरसमज पसरविले जात असतील तर ते दूर करण्यासाठी आश्रम कधीही तयार आहे.
- शरद शेळके, प्रांत सचिव, पश्चिम महाराष्ट्र प्रांत

मूळ निवासींसाठी आदिवासी
शब्द रूढ असताना वनवासी शब्द रूजवणे चुकीचे आहे. गिरीवासी, वनबंधू
या शब्दांतून वेगळेच आशय निर्माण होतात. कामाला विरोध नाही तर शब्दाला आक्षेप आहे. मी यापूर्वीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात पत्र पाठवून आमच्या भावना कळविल्या आहेत.
- प्रा. अशोक बागुल, आदिवासी बचाव समिती

Web Title: Tribal residents objection in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक