मलिकांवरून पुन्हा महायुतीत तणावाचे वातावरण; विरोधकांनी भाजपाला कोंडीत पकडलं

By दीपक भातुसे | Published: December 9, 2023 09:53 AM2023-12-09T09:53:53+5:302023-12-09T09:54:43+5:30

फडणवीसांच्या पत्रावर राष्ट्रवादी नेत्याची खंत; मलिक महायुतीत नकोत : मुख्यमंत्र्यांची भूमिका

Tension in the Mahayuti again from Malik; The opposition caught the BJP in a dilemma | मलिकांवरून पुन्हा महायुतीत तणावाचे वातावरण; विरोधकांनी भाजपाला कोंडीत पकडलं

मलिकांवरून पुन्हा महायुतीत तणावाचे वातावरण; विरोधकांनी भाजपाला कोंडीत पकडलं

नागपूर : हिवाळी अधिवेशाच्या पहिल्या दिवशी आमदार नबाव मलिक यांच्यावर महायुतीत तापलेले वातावरण दुसऱ्या दिवशीही कायम होते. याप्रकरणी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी विधानभवनात येऊन फडणवीसांची भेट घेऊन चर्चा केली. या दरम्यान विधानभवनात आलेले नबाव मलिक दुसऱ्या दिवशीही सत्ताधारी बाकावर बसले होते. फडणवीसांच्या पत्रानंतरही मलिक यांनी शुक्रवारी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतल्याने महायुतीतील तणाव चिघळण्याची चिन्हे आहेत.

नवाब मलिक आपल्या पक्षात नाहीत किंवा महायुतीत नाहीत अशी स्पष्ट भूमिका जाहीर न करता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने याबाबत नरोवा कुंजरोवा भूमिका घेतली. उद्धव ठाकरे गटाने भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असून नवाब मलिक यांच्याबाबत आपल्या ज्या तीव्र भावना आहेत, तशाच भावना पटेल यांच्याबाबत आहेत काय ? असा सवाल शिवसेना गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फडणवीसांना पत्र लिहून केला आहे

भूमिका तर जाहीर करू द्या : पवार मलिक सभागृहात कुठे बसले, ते तुम्ही पाहिले, त्यांर्ची भूमिका काय आहे, हे ऐकल्यानंतर मी माझी आणि पक्षाची भूमिका मांडेन, असे अजित पवारांनी सांगितले.

पत्र जाहीर केले नसते तर बरे झाले असते : वळसे-पाटील मलिकांबाबत पक्षाला निर्णय घ्यावा लागेल, पण ज्याअर्थी ते सत्ताधारी बाजूने बसले, त्या अर्थी ते या बाजूला आहेत, ज्यांनी पत्र पाठवले त्यांना विचारायला पाहिजे की पत्र सार्वजनिक का केले. ते जाहीर झाले नसते तर बरे झाले असते, अशी खंत दिलीप वळसे- पाटील यांनी व्यक्त केली आहे.

मलिकांना कोर्टाने निर्दोष ठरविलेले नाही : मुख्यमंत्री मलिकांना कोटनि निदर्दोष ठरविलेले नाही. सत्ताधारी पक्षांच्या बाकावरील त्यांची उपस्थिती संकेतांना धरुन नाही. महायुतीमधील सर्व घटक पक्ष देशहित व जनहिताच्या ध्येयाने एकत्र आले आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेशी शिवसेना पूर्णतः सहमतच आहे, असे याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

त्यांचे देशप्रेम नकली : पटोले दाऊदशी संबंधित नवाब मलिक देशद्रोही मग इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रफुल्ल पटेल कोण, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांना विचारला आहे. फडणवीसांचे देशप्रेम नकली असल्याची टीका केली आहे.

मलिकांबरोबर राजकीय संबंध नाही : प्रफुल्ल पटेल

नवाब मलिक आमचे सहकारी आहेत, त्यामुळे दोन्ही बाजूंनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झालेली नाही. आम्ही निवडणूक आयोगात दिलेल्या आमदारांच्या यादीमध्येही मलिका यांचे नाव आम्ही दिलेले नाही. त्यांच्याबरोबर सध्या आमचा कुठल्याही प्रकारे राजकीय संबंध नाहीत, असे याप्रकरणी प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.

Web Title: Tension in the Mahayuti again from Malik; The opposition caught the BJP in a dilemma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.