"बाळासाहेब मनमानी करत होते, शिंदेंच्या आमदारांची साक्ष"; ठाकरेंच्या शिवसेनेचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 03:17 PM2023-12-12T15:17:59+5:302023-12-12T15:31:59+5:30

बाळासाहेबांबद्दल शिंदे गटाला कोणतंही प्रेम नसून ते स्वत:च्या स्वार्थासाठीच गेले होते, हे आता उघड झालं आहे, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

shivsena uddhav thackeray alligation against eknath shinde faction mla deepak kesarkar | "बाळासाहेब मनमानी करत होते, शिंदेंच्या आमदारांची साक्ष"; ठाकरेंच्या शिवसेनेचा गौप्यस्फोट

"बाळासाहेब मनमानी करत होते, शिंदेंच्या आमदारांची साक्ष"; ठाकरेंच्या शिवसेनेचा गौप्यस्फोट

नागपूर : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबद्दल सध्या विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटातील काही आमदारांची उलटतपासणी झाल्यानंतर आता शिंदे गटातील आमदारांची उलटतपासणी सुरू आहे. शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची उलटतपासणी झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने नागपुरात पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत.

शिंदे गटावर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "सध्या आमदार अपात्रतेबाबत सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या पक्षांतर्गत निवडणुकांबाबत आरोप केले जात आहे. मात्र आमच्याकडे  २००३, २००८, २०१३, २०१८ साली झालेल्या अशा सगळ्या निवडणुकांचे पुरावे आहेत. पण जे बाळासाहेबांवर श्रद्धा आहे, असं म्हणतात तेच लोक आरोप करत आहेत," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. तसंच बाळासाहेबांवर असणाऱ्या गद्दारांच्या निष्ठा कशा उघड झाल्या आहेत, हे तुम्ही सांगा म्हणत अपात्रता सुनावणीत काय घडलं, याबाबत माहिती देण्याची सूचना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचे आमदार अनिल परब यांना दिली.

अनिल परब म्हणाले की, "आज सकाळी जी सुनावणी झाली त्या सुनावणीदरम्यान उलटतपासणीवेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बाळासाहेबांबाबत जे उद्गार काढले, ते अतिशय संतापजनक होते. त्याचं कारण असं आहे की, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत, असं सांगून त्यांनी गद्दारी केली आहे. मात्र आता ते असं म्हणत आहेत की, बाळासाहेबांनी लोकशाहीची कोणतीही तत्त्वे कधीही पाळली नाहीत, बाळासाहेब मनमानी करत होते. बाळासाहेबांनी निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही निवडणुका घेतल्या नाहीत, असे आरोप केसरकरांनी उलटतपासणीवेळी केले आहेत."

दरम्यान, "ज्यांचा बाळासाहेबांशी कधीही संबंध आला नाही, जे शिवसेनेत २०१४ साली आले. मात्र आता ते आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवत होते आणि आता साक्षीपुराव्यांच्या निमित्ताने त्यांचे खरे स्वरूप समोर आलं आहे. त्यांना बाळासाहेबांबद्दल कोणतंही प्रेम नसून ते स्वत:च्या स्वार्थासाठीच गेले होते, हे आता उघड झालं आहे," अशा शब्दांत अनिल परब यांनी शिंदे गटाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: shivsena uddhav thackeray alligation against eknath shinde faction mla deepak kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.